Acceptance/ स्वीकार'
काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. भारतीय सैन्यावर एक डॉक्युमेंट्री बनवायला म्हणून आम्ही काश्मीरला गेलो होतो. चंदिगढ ते मीरपूर असा प्रवास कारने करत रात्री आम्ही उशिरा आर्मी गेस्टहाऊसला पोहचलो. कडक उन्हाळ्याचे दिवस होते. गेल्या गेल्या आर्मीतील काही अधिकाऱ्यांनी स्वागत केलं, आणि आणि आम्हाला जेवायचं आमंत्रण दिलं. जेवायला बसलो. जेवण वाढणारा अर्थात आर्मीतला एक जवान होता. सहा फुटापेक्षा जास्त उंची आणि पिळदार शरीर. अत्यंत प्रेमाने गरमगरम फुलके वाढत होता. मध्ये मध्ये आग्रह करत होता. दुसऱ्या दिवशी नाश्त्याच्या वेळेस पण तोच वाढायला. चेहऱ्यावर हास्य कायम. रात्री जेवायला बसलो तेंव्हा पुन्हा हसतमुख चेहऱ्याने आम्हाला जेवण वाढत होता. आग्रह करणं सुरूच होतं. जेवण झालं. मग बाहेर मोकळ्यावर फिरत होतो तेवढ्यात तो बाहेर आला, आम्ही दुसऱ्या दिवशी पुढच्या प्रवासाला निघणार होतो म्हणून त्याचे आभार मानले, तो ही छान गप्पा मारत होता. त्याला सहज विचारलं की "आर्मी मेसमे कितने सालों से काम कर रहें हो ". तर म्हणाला "३,४ सालों से." वयाचा अदमास घेतला तर हा तसा वयाने मोठा वाटत होता, माझ्या डोक्यात चक्र फ...