‘आदित्यपर्वात’ तरी शिवसेनेची ‘फ्रेंडलिस्ट’ वाढणार का?

(हा लेख 'महापंच' ह्या वेबपोर्टलसाठी लिहिला आहे ) शिवसेनेची स्थापना १९६६ची. तेव्हापासून आजपर्यंत ह्या संघटनेची बांधणी आणि मिळवलेलं यश हे जितकं विस्मयकारक आहे तितकंच अनेकदा पराभव होऊन, प्रचंड टीका होऊन देखील शिवसेना हा पक्ष देशातील इतर राजकीय पक्षांसारखा एखाद्या निवडणुकीत एकदम रसातळाला गेलाय असं कधी झालं नाही. देशातील इतर प्रादेशिक पक्षांपेक्षा ह्या पक्षाला मिळालेलं यश हे काहीसं उशिरा मिळालं आणि इतर प्रादेशिक पक्षांसारखं त्यांना महाराष्ट्रात एकहाती सत्तेत येता आलं नसलं तरी शिवसेना नावाच्या फोर्सची यशाची भाजणी ही चढती आहे हे नाकारता येणार नाही. शिवसेनेने जे मिळवलं आणि टिकवलं ह्याचं कौतुक करताना शिवसेनेला जे मिळवता आलं नाही, त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही- १) शिवसेनेला स्वतःची वेगळी ओळख, ताकद आणि एक प्रचंड करिष्मा असलेला नेता प्रमुख म्हणून लाभला तरी त्याला इतर पक्षांसारखं दिल्लीत स्वतःचा जम बसवता आला नाही. २) त्यांना राजकीय लवचिकता आणता आली नाही. शिवसेना स्थापनेपासून संघटनाच राहिली, तिचा कधी पक्ष होऊ शकला नाही. जवळपास ५३ वर्ष एक विचार, संघटना म्हणून टिकवणं ही जरी कला अस...