‘आदित्यपर्वात’ तरी शिवसेनेची ‘फ्रेंडलिस्ट’ वाढणार का?

(हा लेख 'महापंच' ह्या वेबपोर्टलसाठी लिहिला आहे )
शिवसेनेची स्थापना १९६६ची. तेव्हापासून आजपर्यंत ह्या संघटनेची बांधणी आणि मिळवलेलं यश हे जितकं विस्मयकारक आहे तितकंच अनेकदा पराभव होऊन, प्रचंड टीका होऊन देखील शिवसेना हा पक्ष देशातील इतर राजकीय पक्षांसारखा एखाद्या निवडणुकीत एकदम रसातळाला गेलाय असं कधी झालं नाही. देशातील इतर प्रादेशिक पक्षांपेक्षा ह्या पक्षाला मिळालेलं यश हे काहीसं उशिरा मिळालं आणि इतर प्रादेशिक पक्षांसारखं त्यांना महाराष्ट्रात एकहाती सत्तेत येता आलं नसलं तरी शिवसेना नावाच्या फोर्सची यशाची भाजणी ही चढती आहे हे नाकारता येणार नाही.
शिवसेनेने जे मिळवलं आणि टिकवलं ह्याचं कौतुक करताना शिवसेनेला जे मिळवता आलं नाही, त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही-
१) शिवसेनेला स्वतःची वेगळी ओळख, ताकद आणि एक प्रचंड करिष्मा असलेला नेता प्रमुख म्हणून लाभला तरी त्याला इतर पक्षांसारखं दिल्लीत स्वतःचा जम बसवता आला नाही.
२) त्यांना राजकीय लवचिकता आणता आली नाही.
शिवसेना स्थापनेपासून संघटनाच राहिली, तिचा कधी पक्ष होऊ शकला नाही. जवळपास ५३ वर्ष एक विचार, संघटना म्हणून टिकवणं ही जरी कला असली तरी तिचा कार्यकर्ता आणि नेते हे राजकीय कार्यकर्ते आणि नेते होत नाहीयेत, हे वरवर दिसायला उत्तम वाटत असलं तरी शिवसेनेच्या वाढीतील हाच मोठा अडथळा आहे.
ह्या सगळ्याचं महत्वाचं कारण म्हणजे-
१) शिवसेनेला दिल्लीचं महत्व जाणवलं नाही.
२) शिवसेनेला दिल्लीत मित्र जोडता येत नाहीत, कारण मुत्सद्दीपणाची पण एक जागा असते, हे त्यांना उमगत नाही किंवा मान्य नाही.
हे म्हणत असताना दिल्लीपासून २२०० किलोमीटर दूर असलेल्या तामिळनाडूमधल्या राजकीय पक्षांच्या केसस्टडीपासून सुरुवात करूया. बरं हे अंतर भौगोलिक अंतर आहे, संस्कृती आणि राजकीय विचारसरणीतील अंतर हे जवळपास दक्षिण आणि उत्तर गोलार्धांइतकं आहे हे विसरून चालणार नाही.
१९९७-९८च्या काळात वृत्तवाहिन्यांचं प्रमाण अतिशय कमी होतं. आत्ताची एनडीटीव्ही तेंव्हा स्टार न्यूजला कन्टेन्ट पुरवायची आणि त्याला जोडून एखादी खाजगी वृत्तवाहिनी असेल. मुख्यतः सगळा भर हा दूरदर्शनच्या बातम्यांवरून घडामोडी समजून घेण्याचा तो काळ होता. त्यावेळेस दोन तमिळ राजकीय नेते दिल्लीच्या वर्तुळात, म्हणजेच दिल्लीच्या माध्यम पटलांवर वावरताना दिसायचे, त्यातले एक जी. के. मूपनार, ज्यांचं इंग्रजी मला तरी अगम्य वाटायचं. कारण ते एकतर अतिशय वेगाने बोलायचे आणि त्यात इंग्रजी उच्चारांवर भयंकर तमिळ पगडा. १९९६पर्यंत ते काँग्रेसचामध्ये होते. पुढे त्यांनी तमिळ मनिला काँग्रेस नावाचा पक्ष काढला आणि मी जर चुकत नसेन तर चिदंबरम हे देखील तमिळ मनीला काँग्रेसमध्ये होते. १९९७मध्ये जेंव्हा तिसऱ्या आघाडीची सरकारं बनत होती, तेंव्हा असं म्हणतात की मूपनार ह्यांना पंतप्रधानपदाची संधी होती, पण डीएमकेने त्याला विरोध केला.
असेच दुसरे तमिळ गृहस्थ म्हणजे मुरासोली मारन, करुणानिधी ह्यांचे भाचे आणि दयानिधी मारन आणि कलानिधी मारन ह्यांचे वडील. ही दोन्ही माणसं पूर्णपणे उत्तर भारतीय पगडा असलेल्या दिल्लीच्या राजकारणात आणि माध्यमांमध्ये त्यांच्या त्यांच्या पक्षाची बाजू ‘साउंड बाइट्स’ च्या रूपात मांडताना दिसायचे आणि इतकंच नव्हे तर दोघांचाही उत्तरेतल्या नेत्यांसोबत चांगला स्नेहसंबंध दिसून यायचा.
दिल्ली म्हणजे ‘नॉर्थ इंडियन हेजिमनी’ला आव्हान देणारे दक्षिण भारतीय नेते मग ते द्रविडीयन चळवळीतून उदयाला आलेले नेते असोत की “दिल्ली आमची तेलगू अस्मिता चिरडते” असा आरोप करत राजकारणात बस्तान मांडणारे एन.टी. रामाराव असोत, ह्या सगळ्यांचं दिल्लीशी जणू भांडण होतं. पण एन.टी. रामराव ह्यांच्यानंतर त्यांच्या दुसऱ्या पत्नीचा, लक्ष्मीपार्वती ह्यांचा तेलगू देसमच्या मालकीवरचा दावा मोडून काढत पुढे आलेले चंद्राबाबू नायडू असोत, की मूपनार, ते मुरसोली मारन असोत, हे नेते दिल्लीशी भांडायला आले नव्हते. ह्या सगळ्यांचा वावर हा दिल्ली समजून घेण्यात आणि दिल्लीत आणि पर्यायाने उत्तर भारतातील राजकीय वर्तुळात मित्र जमवण्यासाठी होता असं जाणवत रहायचं.
तेलगू देसमची खासदारांची बॅण्डविड्थ ही कायम १५ ते १८ खासदारांची, तमिळ मनिला काँग्रेस कायम ४ ते ५ खासदारांमध्ये अडकलेला पक्ष, डीएमकेचं संख्याबळ हे १८ ते २०च्या आसपास, कधी जास्त कधी कमी, पण ह्या सगळ्यांनी दिल्लीत आपली माणसं पेरली, त्यांनी सर्वपक्षीय संबंध वाढवले आणि बेरजेच्या राजकारणात राहिले. ह्यातलं अजून एक उदाहरण म्हणजे नवीन पटनायक. सगळ्यांशी फक्त राजकीय स्नेह नाही तर गरजेला आयडियॉलॉजिकली विरुद्ध दिशेला जाऊन स्वतःचं राजकीय अस्तित्व वाचवताना त्यांनी हा स्नेह हुशारीने वापरला.
हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे महाराष्ट्राच्या सत्ताकारणात शिवसेनेची जी फरफट सुरु आहे, त्यावेळेस समजा पुन्हा भारतीय जनता पक्षाशी बोलायची वेळ आली तरी किंवा जुगार खेळत काँग्रेसशी जुळवून घ्यायची वेळ आली तर त्यासाठी पडद्यामागून बोलणी करणारी माणसं शिवसेनेने कधीच दिल्लीत घडवली नाहीत. किंवा शिवसेनेच्या नेतृत्वाचा कधीच देशव्यापी राजकीय पक्षांशी, वैयक्तिक-राजकीय स्नेह आहे असं दिसत नाही. मायावतींसाठी अनेकवेळा पडद्यामागून एच. डी. देवेगौडा हालचाली करत असतात किंवा नवीन पटनायकांना भाजपशी बोलताना काही अडलं नडलं तर मदत करताना वसुंधरा राजे सिंधिया दिसल्या आहेत. शिवसेनेच्या पाठीशी असं कोणी उभं राहिलंय असं कधीच जाणवलं नाही. खरं तर महाराष्ट्रासारख्या राज्यात ५५ ते ६० आमदार निवडणून आणणारा, आणि लोकसभेत १० ते १५ खासदार आणि राज्यसभेत साधारणपणे ३ ते ४ खासदार कायम असणारा हा पक्ष दिल्लीत कधीच रुजू शकला नाही.
कारण दिल्लीत तुमची माणसं असावी लागतात, त्यांना तुम्हाला ताकद द्यावी लागते हे शिवसेनेला कधीच उमजलं नाही किंवा त्यांना त्याचं महत्व वाटत नाही.
शिवसेना आणि त्यांच्या मुशीतून ‘बाहेर’ पडलेले हे कायम एका न्यूनगंडात राहिले आणि दिल्लीत स्वतःच प्रभावक्षेत्र निर्माण करू शकले नाहीत. दिल्लीत राज्यसभेचा खासदार पाठवताना तो खासदार पक्षाला दिल्लीत मोठं करेल का, शिवसेना नेतृत्वाला दिल्लीत वावरण्यासाठी जमीन तयार करेल का, हा विचार कधीच झाला नाही.
आज शिवसेनेकडे संजय राऊत ह्यांच्यासारखा मुरलेला पत्रकार-कम-राजकारणी आहे. पण त्यांची लेखणी हे ते तलवारीसारखी वापरतात आणि म्हणूनच युद्धाच्या काळात ते ठीक असतील, पण शांततेच्या काळात एक वेगळा सरदार असावा लागतो, हे शिवसेनेला मान्य करावं लागेल.
बातमी खरी की खोटी, माहित नाही, पण शिवसेनेने गळ घातली म्हणून मुंबईतील एक उद्योगपती हा त्यांच्यासाठी दिल्लीत बोलत होता. पण एक गोष्ट विसरून चालणार नाही की, कोणताही उद्योगपती हा जास्तीत जास्त ‘सत्तेचा सौदा’ बसवून देईल, पण ‘राजकीय सौदा’ हा तुमचा तुम्हालाच करायचा असतो हे शिवसेनेला लक्षात घ्यावं लागेल.
दिल्लीचं राजकारण कोळून पिऊन देखील शरद पवारांनी अत्यंत धूर्तपणे उत्तर भारतातील डी.पी. त्रिपाठी ह्यांना अनेक वर्ष दिल्लीत खासदार म्हणून ठेवलं आणि प्रवक्ते देखील. हे करताना त्यांच्या मनात हा विचार नक्की असणार की दिल्लीतील अशी काही वर्तुळं असतील जिथे मराठी माणसाकडे शंकेच्या नजरेने बघितलं जाणार, तिथे त्यांच्यातलाच एक ‘आपला माणूस’ असलेला कधीही चांगला!
प्रत्येक पक्षाने अशी स्वतःची माणसं दिल्लीत पेरली. मुलायम सिंग यादव ह्यांच्यासाठी अमर सिंग, लालू यादव अधूनमधून जेलमध्ये असताना आरजेडीसाठी रघुवंश प्रसाद सिंग, नवीन पटनायक ह्यांच्यासाठी पिनाकी मिश्रा, मायावतींसाठी सतीश मिश्रा, ममता बॅनर्जींसाठी डेरेक ओब्रायन… मात्र, शिवसेनेचा दिल्लीतला माणूस कोण ह्यांचं उत्तर आजही मिळत नाही!
दक्षिणेतले पक्ष हे आपल्याहून (महाराष्ट्रातील राजकीय पक्षांहून) कडवट प्रादेशिक अस्मितेचं राजकारण करतात, तरी ते दिल्लीत आयसोलेटेड वाटत नाहीत. जातीचे राजकारण करणारे पक्ष म्हणजे उदाहरणार्थ, जाट ह्या जातसमूहाचं राजकारण करणारा आणि जास्तीत जास्त ४ ते ५ खासदार निवडून आणणारा अजित सिंग ह्यांचा पक्षही दिल्लीत एकटा वाटत नाही! पण शिवसेना वाटते!!
त्यामुळेच तर शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड ह्यांनी एका हवाई कर्मचाऱ्याला थप्पड मारल्यावर देशातील एकाही पक्षाला त्यांना त्यांच्या पाठी उभं नाही करता आलं, ना अवजड उद्योगाचं खातं मिळवण्यापलीकडे कधी उडी घेता आली. राजकीय स्वार्थासाठी तरी मित्र जोडायचे असतात हे शिवसेनेच्या लक्षात कधी येणार?
ज्या काँग्रेसच्या राजकारणाला विरोध म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली, त्या काँग्रेससोबत आज शिवसेना सत्तेचा संसार मांडायला निघाली आहे. ह्यातला तत्वाचा भाग बाजूला ठेऊन काही वेळेस प्राप्त परिस्थितीत स्वतःच्या अस्तित्वासाठी अशी पाऊलं उचलायला लागतात ते शिवसेना करतेय. पण मुत्सद्दीपणाचं महत्व शिवसेनेला जर आताही जाणवलं नाही आणि जर शिवसेनेला कधी ‘परतीच्या प्रवासा’ला निघायची इच्छा झालीच तर, त्यांचे परतीचे दोर कापलेले असतील हा धोका त्यांनी लक्षात घ्यायला हवा.
शिवसेनेत नेतृत्व बदलाला सुरुवात झाली आहे. शिवसेना ‘आदित्य’पर्वात प्रवेश करत आहे. ज्या काळात ‘फ्रेंडलिस्ट’ किती मोठी आहे ह्याला खूप महत्व आहे, अशा काळात आदित्य ठाकरे शिवसेनेचं नेतृत्व करत आहेत.
बदललेल्या काळाची पावलं ओळखून आता तरी शिवसेना आपली ‘फ्रेंडलिस्ट’ वाढवणार का?

Comments

Popular posts from this blog

तर्कबुद्धीचा उतारा

ट्रम्प आणि देशीवाद

मराठी जगाची खिडकी युट्युब व्हावी