आपणच नियती ह्या थाटात वावरणाऱ्यांना पराभव पचवता येत नाही, त्यांच्यासाठी 'विन्स्टन चर्चिल' उतारा

पराभव हा पचायला सगळ्यात कठीण पदार्थ. आणि पराभवानंतर देखील स्वतःची ग्रेस, मिश्कीलपणा जो कायम टिकवून ठेऊ शकतो तोच पुन्हा जेता होण्याची शक्यता असते. काल जे काही महाराष्ट्राच्या विधानसभेत घडलं त्यावर एक प्रसंग आठवला आणि ते लिहावंसं वाटलं. अर्थात आधीच डिस्क्लेमर टाकतो की सातत्याने 'बौद्धिकं आणि चिंतन शिबिरं' भरवणाऱ्या कुठल्याही वर्गाला कोणत्याही प्रकारे भान देण्याचा माझा कोणताही उद्देश नाही, तेवढी क्षमता देखील नाही. तर.... नेटफ्लिक्सवरच्या 'क्राऊन' ह्या सिरीयल मधल्या पहिल्यासिझनमधल्या एका एपिसोड मधला भाग. क्वीन एलिझाबेथ २ ह्यांचा विवाह सोहळ्याचा दिवस म्हणजेच २० नोव्हेंबर १९४७. तेंव्हाच्या ग्रेट ब्रिटन मध्ये सत्तांतर होऊन दोन वर्ष झाली आहेत. विन्स्टन चर्चिल ज्यांनी दुसरं महायुद्ध मित्र पक्षांना जिंकून दिलं आणि इतकंच नव्हे तर हिटलरच्या पाशवी हल्ल्यांनी गर्भगळीत झालेल्या ब्रिटनला ज्यांनी सावरलं ते दुसऱ्या महायुद्धानंतरच्या सार्वत्रिक निवडणुकात सपशेल पराभूत झाले होते आणि किमान विन्सटन चर्चिल ह्यांच्या तुलनेत फारच सुमार दर्जाचे वाटणारे क्लेमंट अॅटली हे देशाचे पंतप्रधान होते....