
सोनिया गांधी पंतप्रधान झाल्या तर मी केशवपन करेन' अशी घोषणा सुषमा स्वराज ह्यांनी केली होती, आक्रस्ताळ्या घोषणांच पर्व सुरु होण्याचा काळ नुकताच सुरु झालेला. मुळात असं आक्रस्ताळंपण हे सुषमाजींचं व्यक्तिमत्व नव्हतं. पण अर्थात चुका होत राहतात पण ह्या चुकांना देखील डोक्यावर घेऊन नाचणाऱ्यांचा वर्ग असतो आणि त्यांच्या बिनडोक उत्साहाला बळी पडायचं नसतं ह्याचं पक्क भान सुषमाजींना होतं आणि म्हणूनच इतकं टोकाचं विधान त्यांना चिकटलं नाही आणि पुढे सोनियाजी आणि सुषमाजी ह्या दोघींच्यातला स्नेह कायम राहिला. इतकंच काय दोघी संसदेत एकमेकींशी नजरानजर करू शकल्या, ह्याला कारण सुषमाजी मुळात कमालीच्या सालस आणि सुसंस्कृत होत्या. टीव्ही न्यूज माध्यमांच्या सुरुवातीच्या टप्प्यात भाजपची आघाडी ज्या नेत्यांनी लावून धरली त्यात सुषमाजी अग्रेसर होत्या, पण टीव्हीवर झळकण्यातून मिळणारी प्रसिद्धी ही उथळ असते हे त्यांच्या 'स्मृती'तून त्यांनी कधी जाऊ दिलं नाही. पुढे टीव्ही न्यूज चॅनेल्सची संख्या वाढत गेली आणि देदणादण टीव्ही चर्चा स्टार्स जन्माला आले, किसने किसको धोया अशा शीर्षकांचे ह्या स्टार्सचे व्हिडीओज सोशल मीडि...