सोनिया गांधी पंतप्रधान झाल्या तर मी केशवपन करेन' अशी घोषणा सुषमा स्वराज ह्यांनी केली होती, आक्रस्ताळ्या घोषणांच पर्व सुरु होण्याचा काळ नुकताच सुरु झालेला. मुळात असं आक्रस्ताळंपण हे सुषमाजींचं व्यक्तिमत्व नव्हतं. पण अर्थात चुका होत राहतात पण ह्या चुकांना देखील डोक्यावर घेऊन नाचणाऱ्यांचा वर्ग असतो आणि त्यांच्या बिनडोक उत्साहाला बळी पडायचं नसतं ह्याचं पक्क भान सुषमाजींना होतं आणि म्हणूनच इतकं टोकाचं विधान त्यांना चिकटलं नाही आणि पुढे सोनियाजी आणि सुषमाजी ह्या दोघींच्यातला स्नेह कायम राहिला. इतकंच काय दोघी संसदेत एकमेकींशी नजरानजर करू शकल्या, ह्याला कारण सुषमाजी मुळात कमालीच्या सालस आणि सुसंस्कृत होत्या. 


टीव्ही न्यूज माध्यमांच्या सुरुवातीच्या टप्प्यात भाजपची आघाडी ज्या नेत्यांनी लावून धरली त्यात सुषमाजी अग्रेसर होत्या, पण टीव्हीवर झळकण्यातून मिळणारी प्रसिद्धी ही उथळ असते हे त्यांच्या 'स्मृती'तून त्यांनी कधी जाऊ दिलं नाही. पुढे टीव्ही न्यूज चॅनेल्सची संख्या वाढत गेली आणि देदणादण टीव्ही चर्चा स्टार्स जन्माला आले, किसने किसको धोया अशा शीर्षकांचे ह्या स्टार्सचे व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल व्हायला लागले आणि ही चर्चा आहे नळावरची भांडणं नाहीत हे भान 'विस्मृतीत' गेलं. 


असो, एकदा लोकसभेत काँग्रेसचे खासदार आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुड्डा ह्यांचे सुपुत्र दीपेंदरसिंग हूड्डा ह्यांनी अनावधानाने एक विधान केलं की हरियाणात तर आम्ही २ फूट आकाराचे बटाटे पिकवतो. त्यावर आपल्या भाषणात सुषमाजींनी अगदी खेळकरपणे दीपेंदर हुड्डा ह्यांच्या विधानाची खिल्ली उडवली, त्या म्हणाल्या की दीपेंदर उत्साहात जरा जास्तच बोलला बहुदा त्याला दुधीभोपळा आणि बटाटा ह्यातला फरक कळला नसेल आणि ह्यावर आख्ख सभागृह मनापासुन हसलं. पण हे करताना सुषमाजींच्या चेहऱ्यावरचे भाव, आवाज ह्यात कुठेही तुच्छता नव्हती. अर्थात मागच्या दशकात तुच्छतेचं राजकारण सुरु झाल्यावर सुषमाजींनी स्वतःला परराष्ट्रमंत्रीपदाच्या कामात गुंतवलं आणि माध्यमांपासून काहीसं लांब ठेवलं. 


अशी सालस व्यक्ती पुन्हा पहायला मिळेल का? इच्छा तर खूप आहे पण कधी पहायला मिळेल माहित नाही. सोशल मीडिया स्टार्सच्या काळात हे जरा कठीण दिसतंय. पण इच्छा मनी बाळगायला काय हरकत आहे. 

आज सुषमाजींच्या पुण्यस्मरणाचा दिवस. त्यांच्या स्मृतीस अभिवादन. 


ketanalytics


Comments

Popular posts from this blog

तर्कबुद्धीचा उतारा

ट्रम्प आणि देशीवाद

मराठी जगाची खिडकी युट्युब व्हावी