आटपाट नगराची कथा

एक आटपाट नगर असतं ! आटपाट नगरच का ? कारण काहीच नाही. पण सगळ्या जुन्या गोष्टींमध्ये ऐकलेलं असतं, म्हणून आटपाट नगर. इथे जे घडलंय, ते फक्त आटपाट नगरातच घडतं असं नाही तर ते सर्वत्र घडत असतं. फक्त तऱ्हा वेगळ्या. तर संपन्न, कीर्तिवान असं हे नगर. अनेक थोरमोठे ह्या नगराने घडवलेले असतात, किंवा ती लोकं त्यांच्या त्यांच्या कर्तृत्वाने मोठी झालेली असतात. पण यश नेहमी वाटून घ्यावं म्हणून, इथल्या थोरामोठ्यांनी आपल्या कर्तृत्वात या नगराला पण वाटेकरी बनवून टाकलं. ह्या नगराबद्दल, इथल्या थोरामोठ्यांबद्दल सर्वत्र एक कुतूहल. इथली माणसं अनेक क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी केलेली, पण त्या उत्तुंगतेकडे घेतलेली झेप ही मात्र अस्तित्वाच्या संघर्षातून आलेली, आणि जे कसब पदरात आलंय त्याच्या जोरावर सर्वस्व झोकून देऊन करायचं ह्यातून घेतलेली झेप. काळ पुढे सरकतो. त्यातील अनेक मान्यवरांचा पंथ निर्माण होतो, तर काही दैवतं बनून जातात. हे दैवतीकरण ह्या थोरामोठ्यांच्या नकळत घडत जातं पण ते थांबवण्याची शक्ती उतारवयात कमी झाली होती आणि त्यांना पण ते काहीसं आवडू लागलं होतं. अर्थात ह्या दैवतांवर पहिला अधिकार कोणाचा...