आटपाट नगराची कथा


 एक आटपाट नगर असतं ! आटपाट नगरच का ? कारण काहीच नाही. पण सगळ्या जुन्या गोष्टींमध्ये ऐकलेलं असतं, म्हणून आटपाट नगर. इथे जे घडलंय, ते फक्त आटपाट नगरातच घडतं असं नाही तर ते सर्वत्र घडत असतं. फक्त तऱ्हा वेगळ्या. 


तर संपन्न, कीर्तिवान असं हे नगर. अनेक थोरमोठे ह्या नगराने घडवलेले असतात, किंवा ती लोकं त्यांच्या त्यांच्या कर्तृत्वाने मोठी झालेली असतात. पण यश नेहमी वाटून घ्यावं म्हणून, इथल्या थोरामोठ्यांनी आपल्या कर्तृत्वात या नगराला पण वाटेकरी बनवून टाकलं. ह्या नगराबद्दल, इथल्या थोरामोठ्यांबद्दल सर्वत्र एक कुतूहल. 
इथली माणसं अनेक क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी केलेली, पण त्या उत्तुंगतेकडे घेतलेली झेप ही मात्र अस्तित्वाच्या संघर्षातून आलेली, आणि जे कसब पदरात आलंय त्याच्या जोरावर सर्वस्व झोकून देऊन करायचं ह्यातून घेतलेली झेप.

काळ पुढे सरकतो. त्यातील अनेक मान्यवरांचा पंथ निर्माण होतो, तर काही दैवतं बनून जातात. हे दैवतीकरण ह्या थोरामोठ्यांच्या नकळत घडत जातं पण ते थांबवण्याची शक्ती उतारवयात कमी झाली होती आणि त्यांना पण ते काहीसं आवडू लागलं होतं. अर्थात ह्या दैवतांवर पहिला अधिकार कोणाचाहा प्रश्न आता उभा राहिला? त्यांच्या पुण्याईच्या पालखीचे भोई कोण?, तर अर्थात ह्या नगरवासियांची पुढची पिढी. ही पिढी काहीशी गोंधळलेली होती, आणि काहीशी शिथिल देखील. अस्तित्वाचा संघर्ष कधीच पाहिला नव्हता आणि तो पहावा लागणार नाही ह्याची खात्री देखील. पण 'पुढे काय...' हा प्रश्न कोणाला सुटला आहे, की तो ह्यांना सुटावा? मग नकळत ठरलं की आपल्या नगरातील सगळ्या मान्यवरांची देवळंच उभारायची, त्यांचे पंथ निर्माण झालेच आहेत, आपण त्या मंदिराचे वारस किंवा मठाधिपती असं स्वतःच मानायचं म्हणजे सगळेच हळूहळू मानतील. 

आता हालचाली वेगाने सुरु झाल्या. प्रत्येकाने गावाच्या वेशीवरच तंबू ठोकला आणि आपल्या आपापल्या देवतेची महती गायला सुरु केली. ज्यांच्याकडे ह्यातलं काहीच नव्हतं, ते थोडीच शांत बसणार होते. त्यांनी दगडाला शेंदूर फासला आणि ते देखील येऊन बसले. ह्या शेंदूर फासलेल्यांबद्दल कोणालाच आक्षेप नव्हता कारण आता पुढच्या काळात टोळीने नाही जगलो, तर आपलं अस्तित्व धोक्यात आहे ह्याची जाणीव प्रत्येकाला होती. पण टोळीला नेता हवाच, त्याशिवाय टोळीचं अस्तित्व ते काय? मग वाट पाहत असताना, अचानक वीज चमकावी तशी त्यांच्यातला एक चमकला. सर्वत्र आनंदाचं वातावरण पसरलं. आपल्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ह्या तारणहाराच्या रूपाने आला असं सगळ्यांना वाटू लागलं. 

हा देखील सगळ्यांच्यात उजवा, त्यामुळे ह्याचं नेतृत्व तर सगळ्यांनी मान्य केलंच, पण एक विचार त्यांच्या मनात चमकून गेला.  
ह्याच्या भोवती जितक्या लवकर वलय निर्माण होईल, ह्याचा पंथ निर्माण होईल तितकं आपलं ध्येय साध्य करणं सोपं होईल.  
हा  तारणहारपण नजरबंदीच्या खेळातील माहीर. दिसेल त्याला वश करत पुढे पुढे निघाला होता. जणू काही अश्वमेध यज्ञाचा चौफेर उधळलेला वारूच. त्याची दिग्विजयी घौडदौड पाहून अनेकांनी स्वतःला याला वाहून घ्यायचं ठरवलं. तारणहाराच्या रूपाने आयुष्यात येणारा 'टर्निंग पॉईंट' चुकायला नको हा व्यवहारी विचार अनेकांनी केला. 

ह्याच्या प्रयोगांना ह्या सगळ्या हवश्यागवश्यांचीच गर्दी. त्यांचा टाळ्यांचा कडकडाट आणि चित्कार इतके मोठे की प्रेक्षागृह दणाणून जाई. पण ह्यात हळूहळू बिचाऱ्या आपल्या तारणहाराचं नुकसान होत आहे हे कोणालाच कळलं नाही. कुठल्याही महापुरुषाचं नुकसान आणि त्याच्या विचारांची तोडमोड हे त्याचे अनुयायीच करतात, तो प्रत्यय इथेही येऊ लागला. आपल्या भोवतीच्या हवश्यागवश्यांच्या चित्कारात, त्याला हळूहळू इतरांच्या मौनाचा अर्थच समजेनासा झाला. 

आधीच्या पिढीतल्यांचे पण पंथ झाले. पंथ होणं ह्यासारखं दुर्दैव नाही. फक्त हे दुर्दैव त्यांच्या वाट्याला आलं ते आयुष्याच्या संध्याछायेला.   
चित्कारांपेक्षा मौनाकडे अधिक लक्ष द्यायच असतं हे ज्ञान ते बहुदा आईच्या गर्भातून घेऊन आले होते. इथे तसं काही नव्हतं, त्यामुळे जादूच्या प्रयोगात हात थरथरले तरी, त्याचं पण समर्थन करणारे भाट निर्माण झाले होते, कारण प्रत्येकाला त्याच्या रूपाने एक 'टर्निंग पॉईंट' हवा होता, बस ! एकदा तो आला, की मी सुटलो ही भावना. 

पण 'टर्निंग पॉईंट' हेच मृगजळ, हे लक्षात घेतं कोण. पुढे ह्या तारणहाराची शक्ती ओसरू लागली, खेळ काही पूर्वीसारखा रंगत नव्हता.  गर्दी आटली होती पण अजूनही आपलं काहीतरी घडेल, ह्या आशेने हवशेगवशे जमत होते, टाळ्या बडवत होते, पण त्या टाळ्यांच्यात पूर्वीची शक्ती राहिली नव्हती, जे होतं ते सवयीतून आलं होतं. 
हळूहळू 'त्याने' पण आपले चमत्कार दाखवणं कमी केलं, आणि तो आता गतवैभवाबद्दल बोलू लागला. गतवैभवाइतकी घातक नशा दुसरी कोणतीच नसते. 

आता त्याच्या अनुयायांची पण वयं उलटून गेलेली, काळाचा लंबक मागे फिरवून बघताना मजा यायची पण विषण्णता तितकीच घेरून टाकायची. गतवैभवाचं एक बरं असतं की ते सांगणाऱ्याला श्रोते नक्की मिळतात, तसे ह्या सगळ्यांना श्रोते मिळत होते. त्यामुळे वर्तमानाची चिंता तरी मिटली होती. पण वर म्हणल्याप्रमाणे 'पुढे काय...' ह्या सारखा भेसूर प्रश्न जगात कुठलाच नाही,आणि तो कोणाचंच मानगूट सोडत नाहीत.  

मग अध्येमध्ये काही अनुयायी गावाच्या वेशीवर येऊन  चक्कर मारून यायचे, बाहेरच्या वेगाने बदलणाऱ्या चित्राकडे नजर टाकून पुन्हा आत यायचे. जमेल तितका घट्टपणे दरवाजा बंद करायचे. पण बदलाचे बोचरे वारे हे फटींतून थोडे का होईना शिरायचेच. ह्या वाऱ्यांचा हवश्यागवश्याना सराव नव्हता आणि सराव करून घेण्याचे दिवस मागे पडले होते. 
मग सगळ्यांनी पुन्हा तारणहाराच्या मठाच्या दिशेने अगदी नित्यनेमाने जाणं सुरु केलं. कारण सोपं होतं. बदलाचे वारे कधीतरी आपण आपल्या परीने घट्ट बंद केलेला दरवाजा उन्मळून टाकणार ह्याची त्यांना खात्री होती. पण तशी वेळ आलीच तर तारणहाराचा आसरा घेता येईल आणि हा थोपवेल बदलाचे वारे, हा भाबडा आशावाद. 

पण आपण ज्याला तारणहार मानलं तो देखील बदलाच्या वाऱ्यांनी बिथरलाय आणि तो देखील 'टर्निंग पॉईंट'च्या शोधात असू शकतो हे कोणीच लक्षात घेतलं नाही. तारणहाराला ही पोकळ गर्दी कधीकधी नको वाटते, पण करतो काय ? शेवटी दोघांचं अस्तित्व एकेमकांत गुरफ़टलेलं, त्यामुळे दोघांचीही फरफट सुरूच आहे.  
तर ही आटपाट नगरातील कथा, वर म्हणलं तसं अशा कथा ही काही फक्त आटपाट नगराची मक्तेदारी नाही. जाल तिकडे हीच कथा, फक्त तऱ्हा वेगळी. 

Comments

Popular posts from this blog

तर्कबुद्धीचा उतारा

ट्रम्प आणि देशीवाद

मराठी जगाची खिडकी युट्युब व्हावी