सिनेमाचं मंदिर

अगदीच महिना-वर्ष सांगायचं झालं तर ऑगस्ट २००२. पुण्यात मी मास्टर्सला शिकायला होतो, तेंव्हाची गोष्ट. आम्हाला सिनेमा हा विषय शिकवायला एक प्रोफेसर होते. सिनेमाच काय पण जवळजवळ सगळ्या कलाप्रकारांचा गाढा अभ्यासक. पण फक्त अभ्यासक नाही तर स्वतःचा अभ्यास शिकवण्याची/उलगडून दाखवण्याची कमालीची क्षमता असलेले हे आमचे प्रोफेसर. तर असंच ऑगस्ट महिन्यातल्या एका रविवारी संध्याकाळी, रिमझिम पाऊस पडत होता. आम्ही ४ मित्र ह्या प्रोफेसरांसोबत 'कमला नेहरू पार्क' येथे गप्पा मारत होतो. तेवढ्यात त्यांनी विचारलं की किती वाजले असतील. आम्ही म्हणलं ६. तर म्हणाले चला मला जावं लागेल, तुमचा काय प्लॅन आहे? काही विशेष नसेल तर चला माझ्यासोबत. त्यांनी एक पत्ता सांगितला, आमच्यापैकी एका मित्राला तो माहित होता. आमचे प्रोफेसर पुढे गेले आणि आम्ही चालत चालत त्यांनी सांगितलेल्या पत्त्यावर आलो. एक बैठी वास्तू.काहीशी जुनी दिसणारी, बाहेर लोकं रांगेत उभी होती. संस्थेचा बोर्ड पाहिला तर कळलं की ह्याला 'नॅशनल फिल्म आर्काइव्ह' म्हणतात. म्हणजे नक्की काय असेल कळलं नाही. पण गर्दीच्या सोबत आत गेलो. आमच्या सरांनी खूण केली की ...