सिनेमाचं मंदिर
अगदीच महिना-वर्ष सांगायचं झालं तर ऑगस्ट २००२. पुण्यात मी मास्टर्सला शिकायला होतो, तेंव्हाची गोष्ट. आम्हाला सिनेमा हा विषय शिकवायला एक प्रोफेसर होते. सिनेमाच काय पण जवळजवळ सगळ्या कलाप्रकारांचा गाढा अभ्यासक. पण फक्त अभ्यासक नाही तर स्वतःचा अभ्यास शिकवण्याची/उलगडून दाखवण्याची कमालीची क्षमता असलेले हे आमचे प्रोफेसर. तर असंच ऑगस्ट महिन्यातल्या एका रविवारी संध्याकाळी, रिमझिम पाऊस पडत होता. आम्ही ४ मित्र ह्या प्रोफेसरांसोबत 'कमला नेहरू पार्क' येथे गप्पा मारत होतो. तेवढ्यात त्यांनी विचारलं की किती वाजले असतील. आम्ही म्हणलं ६. तर म्हणाले चला मला जावं लागेल, तुमचा काय प्लॅन आहे? काही विशेष नसेल तर चला माझ्यासोबत.
त्यांनी एक पत्ता सांगितला, आमच्यापैकी एका मित्राला तो माहित होता. आमचे प्रोफेसर पुढे गेले आणि आम्ही चालत चालत त्यांनी सांगितलेल्या पत्त्यावर आलो. एक बैठी वास्तू.काहीशी जुनी दिसणारी, बाहेर लोकं रांगेत उभी होती. संस्थेचा बोर्ड पाहिला तर कळलं की ह्याला 'नॅशनल फिल्म आर्काइव्ह' म्हणतात. म्हणजे नक्की काय असेल कळलं नाही. पण गर्दीच्या सोबत आत गेलो. आमच्या सरांनी खूण केली की चपला काढा इकडे... चपला काढून आत गेलो, आत एक सिनेमाहॉल होता.
आजपर्यंतची जी सिनेमागृह पाहिली होती ती तद्दन व्यावसायिक होती, पण इथे काहीतरी भारदस्तपणा जाणवत होता. आसपास सहज मान वळवली तर सगळ्या वयोगटातील लोकं दिसत होती. त्यातली काही जरा जास्तच घरंदाज, गंभीर आणि इथे रुळलेली जाणवत होती. आमच्याकडे बघताना त्यांच्याकडे असे काहीसे भाव होते की, ह्या पोरांना इथले संकेत माहित तर असतील ना? आमचा रसभंग तर होणार नाही ना? त्यामुळे आम्ही जरा जास्तच बावचळलेलो.
आणि तितक्यात सिनेमागृहातील दिवे बंद झाले. आणि पडद्यावर एक सिनेमा सुरु झाला, तो एक फ्रेंच सिनेमा होता. नाव आठवत नाही अर्थात. पण सिनेमाच्या पडद्यावर जे काही घडत होतं ते आमच्यासाठी वेगळं होतं. तद्दन बॉलिवूड सिनेमे पाहिलेले आम्ही, त्या सिनेमाने भारावून गेलो होतो. बरं सिनेमा होता ९० मिनिटांचा. त्यामुळे ब्रेक, पॉपकॉर्न असलं काही नाही. सिनेमा संपला बाहेर आलो. लोकं शिस्तीने चपला घालून निघून गेली. कोणी सायकल, कोणी मोटरबाइक तर कोणी कारमधून तर कोणी चालत. सामाजिक, आर्थिक स्तर वेगळा होता प्रत्येकाचा पण त्यांना बांधून ठेवणारा एक धागा होता तो म्हणजे सिनेमा आणि नॅशनल फिल्म आर्काइव्ह.
आम्ही निघणार तेवढ्यात आमचे प्रोफेसर आले आणि म्हणाले ह्याची मेंबरशिप घेऊन टाका. आणि हो, हे सिनेमाचं मंदिर आहे हे भान मात्र कायम ठेवा. सिनेमाच्या हॉलमध्ये शिरताना चपला, बूट बाहेर काढून आत जाणं ह्यातच ह्या मंदिराचं पावित्र्य इथल्या सदस्यांनी कसं राखलं आहे हे कळतच होतं.
पुढे मी आणि माझ्या मित्रांनी ह्या संस्थेची मेंबरशिप घेतली आणि इथल्या वाऱ्या नियमित सुरु झाल्या. जर देव असेल आणि देवळात गेल्यावर तो तुम्हाला कशाचीतरी अनुभूती देत नसेल, तर ते देऊळ म्हणजे फक्त इच्छा व्यक्त करणं आणि त्या पूर्ण व्हाव्यात म्हणून पाठपुरावा करण्याची जागा होते. आम्हा मित्रांसाठी नॅशनल फिल्म आर्काइव्हचं थिएटर मात्र 'अनुभूती' देणारं देऊळ ठरलं. सिनेमा हा जगाकडे बघण्याचा आणि नवीन दृष्टिकोन गोळा करण्याच एक माध्यम आहे हे ह्या वास्तूने शिकवलं.
जगाच्या नकाशावर जे देश पाहतो, त्यांचं सिनेमाचं एक जग आहे, तिथल्या आपल्यासारख्या सामान्य माणसांचं एक जग आहे, त्यात आपल्यासारखेच ताण आहेत, काहीवेळेला ते आपल्याहून गंभीर आहेत आणि ह्या ताणांना, त्यांच्या आनंदाना, सिनेमासारख्या तुलनेने नव्या कलाप्रकारातून मांडण्यासाठी असंख्य लोकांची धडपड सुरु असते, हा अनुभवच वेगळा होता. अर्थात तो ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा आधीचा काळ होता. सिनेमाचं जग अनुभवायला जागाच नव्हती. ती जागा ह्या वास्तूने दिली.
दर शनिवार-रविवारी एक मैफल जमत्ये असं वाटायला लावणारं वातावरण. माणसं कमी जास्त फरकाने तीच पण सिनेमा सुरु झाल्यावर स्वतःचं अस्तित्व विसरून त्या सिनेमाच्या पडद्याकडे नजर खिळवणारी. एकदा एकटाच सिनेमा पहायला गेलो आणि सिनेमा पाहता पाहता पायावर पाय ठेवून बसलो तर शेजारच्या माणसाने हलकीच चापटी मारली आणि म्हणाला, 'डोन्ट पॉईंट युअर लेग्स टू द स्क्रीन, इट इज द इंसल्ट ऑफ द मेकर ऑफ धिस फिल्म'. ह्या श्रद्धेने सिनेमाकडे बघणारी ही माणसं.
एका रविवारी एक अर्जेंटनियन सिनेमा बघून बाहेर पडलो. एका मोठ्या कुटुंबातल्या ताणावरचा सिनेमा. कधीकधी एखादं गाणं, चित्र, कादंबरी आत ओढून घेते तसं ह्या सिनेमाने केलं होतं. सिनेमा संपला, सगळे प्रेक्षक बाहेर पडले, सगळे सिनेमाच्या अंमलाखाली होते, इतके की पछाडलेला एक गट एकही शब्द न बोलता का वावरतोय असं बघणाऱ्याला वाटावं. मी तर त्यादिवशी वाट फुटेल तिथे चालत होतो. असा थरारून टाकणारा अनुभव ह्या जागेने दिला.
पुढे फिल्म फेस्टिवल्स बघितले, अनेकांच्या घरांमधले, बंगल्यांमधली प्रायव्हेट थिएटर्स अनुभवली, ४ डी स्क्रीन्स पाहिली पण फिल्म आर्काईव्हचा तो अनुभव परत कुठेच आला नाही. सिनेमाच काय पण कोणीतही गोष्ट आत ओढून घ्यायची, जितकी जमेल तितकी शोषून घ्यायची, शब्दशः मेडिटेट करायचं त्या गोष्टीवर आणि आत एक आनंदाचा झरा वाहू द्यायचा हे त्या वास्तूने शिकवलं. आजदेखील पुण्यात त्या वास्तूसमोरून जाताना नकळत हात जोडले जातात.
प्रत्येकाला कशावर तरी श्रद्धा ठेवावी, कशाचा तरी पूर्ण आनंद कसा घ्यावा हे शिकवणारं, तसं अनुभव देणारं त्याचं त्याचं मंदिर मिळायला हवं, मला हे सगळं माझ्या सिनेमाच्या मंदिरात मिळालं !
Comments
Post a Comment