युरोपातील 'लिटिल चायना'

नोव्हेंबर २०२३ च्या पहिल्या आठवड्यात, ऑस्ट्रियातल्या हेलस्टॅट ह्या एका छोट्याशा खेडेगाववजा शहरांत एक दिवसाच्या प्रवासाला गेलो होतो. बस सकाळी ७:१५ वाजता व्हिएन्नातल्या स्टेट ऑपेरा सेंटरपासून सुटणार होती. बस जरी ७:१५ ला सुटणार असली तरी तुम्ही ७ ला येणं अपेक्षित आहे असा इमेल आधी दोन दिवस रोज येत होता. आणि तुम्ही जर ७ वाजता नाही पोहोचलात तर बसच्या चालकापासून ते टूरच्या गाईडच्या नापसंतीच्या कटाक्षाची तयारी ठेवायची. तर बसपाशी ७ वाजता पोहचलो, आत शिरलो. आणि थोडासा धक्काच बसला कारण बसध्ये पहिल्या ३ रांगा सोडल्या तर पूर्ण बस ही चिनी प्रवाशांनी भरलेली होती. व्हिएन्नातला प्रवास सुरु व्हायच्या आधी नेदरलँड्सच्या शिपोल एअरपोर्टपासूनच चिनी माणसांचे जथ्थेच्या जथ्थे बघायची सवय लागली होती. पण हे दृश्य जरा अतीच वाटलं. प्रवासात एका ठिकाणी बस खाण्यापिण्यासाठी थांबली होती. त्या रेस्टोरंटमध्ये चिनी लोकं कामाला. काही पदार्थांची नावं जर्मन आणि मँडरिनमध्ये दिली होती. इथे मात्र जाणवायला लागलं की चिनी लोकांनी फक्त चंचुप्रवेश नाही तर इथे चांगलाच जम बसवला आहे. जसं हेलस्टॅट जवळ यायला लागलं तसं आमच्या गाई...