'नागोर्नो-काराबाख' दीर्घकाळ किंवा कायम चालू राहील असं अजून एक युद्ध

दोन देशांच्या निर्मितीनंतर किंवा निर्मितीच्या आसपास, दोन देशांमध्ये शत्रुत्व निर्माण होणं आणि त्या भागावर नक्की कोणाचा हक्क आहे यावरून रक्तरंजित लढाया होणं, ही मागच्या शतकाची जगाला देण आहे. वसाहतवादाच्या काळात युरोपातील विविध सत्तांनी राजवटी निर्माण केल्या, आणि पूर्ण भिन्न असलेल्या प्रदेश किंवा त्यातील समूहांमध्ये एकजिनसीपणा आणण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न यशस्वी झाला असं वसाहतवाद्यांना वाटणं हे स्वाभाविक होतं, कारण जगाचं भलं करण्याची जबाबदारी आपल्या शिरावर आहे, असं वाटून घेऊन त्यांनी सर्व गोष्टी घडवल्या होत्या. अर्थात इंग्रजीत ज्याला व्हाईट मॅन'स बर्डन असं म्हणलं जातं, तो भार हा फक्त देखावा होता, कारण मूळ उद्देश व्यापारातून अफाट नफा कमावणे आणि तो कमावताना वाट्टेल तशी पिळवणूक करणे, हे ओघाने आलंच. मग मागच्या शतकात दोन महायुद्ध झाली, या दोन महायुद्धानी वसाहतवादी जग संपवलं, एक एक देश, प्रांत स्वतंत्र होऊ लागले. आणि स्वातंत्र्याची झुळूक आली आणि त्याने सुद्धा अस्मिता, हितसंबंध, पारंपरिक द्वेष आणि अर्थात भीती डोकं वर काढायला लागली आणि भूभागाच्या मालकी हक्कांवर...