'नागोर्नो-काराबाख' दीर्घकाळ किंवा कायम चालू राहील असं अजून एक युद्ध
दोन देशांच्या निर्मितीनंतर किंवा निर्मितीच्या आसपास, दोन देशांमध्ये शत्रुत्व निर्माण होणं आणि त्या भागावर नक्की कोणाचा हक्क आहे यावरून रक्तरंजित लढाया होणं,
ही मागच्या शतकाची जगाला देण आहे. वसाहतवादाच्या काळात युरोपातील विविध सत्तांनी राजवटी निर्माण केल्या, आणि पूर्ण भिन्न असलेल्या प्रदेश किंवा त्यातील समूहांमध्ये एकजिनसीपणा आणण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न यशस्वी झाला असं वसाहतवाद्यांना वाटणं हे स्वाभाविक होतं, कारण जगाचं भलं करण्याची जबाबदारी आपल्या शिरावर आहे, असं वाटून घेऊन त्यांनी सर्व गोष्टी घडवल्या होत्या. अर्थात इंग्रजीत ज्याला व्हाईट मॅन'स बर्डन असं म्हणलं जातं, तो भार हा फक्त देखावा होता, कारण मूळ उद्देश व्यापारातून अफाट नफा कमावणे आणि तो कमावताना वाट्टेल तशी पिळवणूक करणे, हे ओघाने आलंच.
मग मागच्या शतकात दोन महायुद्ध झाली, या दोन महायुद्धानी वसाहतवादी जग संपवलं, एक एक देश, प्रांत स्वतंत्र होऊ लागले. आणि स्वातंत्र्याची झुळूक आली आणि त्याने सुद्धा अस्मिता, हितसंबंध, पारंपरिक द्वेष आणि अर्थात भीती डोकं वर काढायला लागली आणि भूभागाच्या मालकी हक्कांवरून संघर्ष सुरु झाले.
आपल्याकडचा काश्मीर संघर्ष असो की इस्रायल आणि पॅलेस्टिन संघर्ष असो की या लेखाचा जो विषय आहे तो म्हणजे अर्मेनिया आणि अझरबैजान या दोन देशांमधील
'नागोर्नो-काराबाख' या प्रांताच्या मालकी हक्कावरून सुरु असलेला संघर्ष. प्रत्येक संघर्षाला एक वेगळी किनारअसली तरी वर म्हणलं तसं अस्मिता, हितसंबंध, पारंपारिक द्वेष आणि भीती या पैकी किमान दोन ते तीन कारणांच्या भोवती जगातील सगळे संघर्षपेटत असतात आणि अर्मेनिया-अझरबैजान संघर्ष हा देखील त्याला अपवाद नाही.
हल्ली अझरबैजानच्या बाकूला भारतातून प्रचंड पर्यटक जायला लागलेत, पण अन्यथा या देशाबद्दल आपल्याला फारसं माहित नसतं. कॉकसेस पर्वतरांगांनी वेढलेला, कॅस्पियन समुद्राच्या सानिध्यातील हा देश. एकाच वेळेला आशिया आणि युरोपच्या सीमांना खेटून उभा असलेला हा देश. रशिया, जॉर्जिया, अर्मेनिया आणि इराण या देशांशी सीमा जुळलेला हा देश. आपल्याला नादेर शाह माहीत असतो, कारण इराणच्या अफशरीद राजवंशाच्या शाहने म्हणजेच राजाने १७३९ मध्ये भारतावर आक्रमण करत, मुघलांना जेरीस आणत, प्रचंड लूट केली होती. या नादेर शाहची एकेकाळी अझरबैजानवर एकेकाळी सत्ता होती. पुढे झाँड आणि कजार राजघराण्यांची सत्ता होती.
पुढे १८०४-१८१३ या दीर्घकाळात रशिया आणि पर्शियाच्या युद्धात जॉर्जियासकट, सध्याचा जो अझरबैजानचा भाग आहे तो देखील रशियाच्या झारच्याताब्यात आला. पण दीर्घकाळ पर्शियन राजवटीच्या प्रभावाखाली राहिलेला हा भूभाग, म्हणजे ज्याला आपण आज अझरबैजान म्हणून ओळखतो, त्या अझरबैजानी लोकांचा प्रभाव हा जसा अझरबैजानमध्ये जाणवतो तसाच तो इराणच्या वायव्य भागात पण जाणवतो. रशियाने जरी या भूभागावर ताबा मिळवला असला तरी इराणीयन संस्कृतीचा स्पष्ट प्रभाव १८१३ नंतर देखील टिकून राहिला. अझरबैजानचा मुख्य धर्म हा मुस्लिम राहिला आणि आजदेखील बऱ्यापैकी सेक्युलर मुस्लिम समाज म्हणून अझरबैजानकडे बघितलं जातं. पण इराणचा प्रभाव इतका खोलवर आहे की देशाच्या एकूण मुस्लिम लोकसंख्येपैकी जवळपास ६५% लोकसंख्या ही शिया मुस्लिम लोकसंख्या आहे. आणि उरलेली सुन्नी मुसलमान.
पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान अझरबैजानमध्ये 'ट्रान्सकॉकेशियन डेमोक्रॅटिक फेडरेटिव्ह रिपब्लिक' या नावाने आत्ताचा अझरबैजान, जॉर्जिया आणिअर्मेनियाला एकत्र करून स्वतंत्र प्रांत घोषित केला गेला. पण त्याचं अस्तित्व एकच महिना टिकलं. कारण एका महिन्यातच जॉर्जियाने स्वतःच स्वातंत्र्यघोषित केलं, पुढे अर्मेनियाने आणि लगोलग अझरबैजानने देखील. दीर्घकाळ स्वतःच अस्तित्व शोधत असलेल्या भूभागांना संधी मिळाली आणि त्यांची कोंडलेली वाफ बाहेर उफाळून आली. मुळात या प्रांतांचा जीव जेमतेमच होता, त्यामुळे ऑटोमन साम्राज्याने या भूभागावर हल्ले सुरु केले.
ऑटोमन साम्रज्याच्या सुलतानामध्ये आणि रशियन साम्रज्यात लढाया सुरु होत्या आणि तो काळ होता १९१५, १६ च्या आसपासचा. आता या भागातील बहुसंख्य जनता ही मुस्लिम आणि ऑटोमन साम्रज्याचा सुलतान मेहमूद ५ हा इस्लामचा खलिफा होता, त्यामुळे इथे स्वतःच राज्य हवं असेल तर या पूर्ण प्रांतात पसरलेल्या अर्मेनियन लोकांना हाताशी धरलं पाहिजे असं रशियन झारला पण वाटत होतं आणि अर्मेनियन लोकांना हाताशीधरल्या शिवाय आपल्याला तरणोपाय नाही हे ऑटोमन साम्राज्याला पण वाटत होतं. पण लढाईत ऑटोमन साम्रज्याचा पराभव झाला आणि जाताना त्यांनी जवळपास १० लाख आर्मेनियन लोकांचा नृशंस नरसंहार केला. आज जरी अझरबैजान आणि अर्मेनियामधला वाद हा विवादित'नागोर्नो-काराबाख' भूभागावरून जरी असला तरी, हा नरसंहार आणि त्याच्या आठवणी हे देखील आहेच.
पुढे ऑक्टोबर १९१७ च्या रशियन क्रांतीनंतर बोल्शेव्हिकांची सत्ता रशियात आली. त्यावेळच्या कॉकेशस प्रांताच्या ग्रँड ड्यूक निकोलसला पदच्युत केलं गेलं. पुढे अझरबैजान, जॉर्जिया आणि अर्मेनियाने ट्रान्सकॉकेशियन सोशलिस्ट फेडरेटिव्ह सोव्हिएट रिपब्लिक या नावाने हे तेंव्हाच्या सोव्हिएट युनियनचा भाग झाले पण तिन्ही प्रांतांनी स्वतःची प्रांतिक सत्ता अबाधित राहील असं पाहिलं. पुढे १९३६ ला सोव्हिएट राज्यघटनेने त्यांची स्वायत्तता काढून घेत त्यांना स्वतःचा भाग बनवलं. आणि पुढे १९८८ पर्यंत ते युनियन ऑफ सोव्हिएट सोशलिस्ट रिपब्लिकचा भाग झाले.
आता अर्मेनियाच्या इतिहासाकडे वळूया. बऱ्यापैकी युरोपचा जवळ जाणारा, युरोपचा प्रभाव असलेला हा प्रांत. ख्रिस्तपूर्व १८९ मध्ये अरटेक्सीयस नावाच्या राजाने ओरॉनटीड राजघराण्याचा विस्तार करत अर्मेनियन राजवटीचा विस्तार केला. पुढे रोमन साम्रज्याचा भाग असलेल्या आर्मेनियन राजवटींना बऱ्यापैकी स्वायतत्ता होती. ख्रिस्तपूर्व काळात झोरोस्ट्रियन धर्माचा प्रभाव या भागावर होता आणि अर्मेनियाचं स्वतःच १२ महिन्यांचं कॅलेंडरदेखील होतं. पुढे ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकापासून इथे ख्रिश्चन धर्माने हातपाय पसरायला सुरुवात केली. अर्थात तरीही झोरोस्ट्रियन धर्माचा इथे खूप प्रभाव होता पण ख्रिश्चन धर्मीय देखील स्वतःची ओळख आणि लोकसंख्या राखून होते. १२३० च्या आसपास मंगोल राजवटींनी अर्मेनियावर हल्ले सुरु केले. पुढे ऑटोमन साम्राज्य आणि पर्शियन साम्राज्याने या भूभागावर ताबा मिळवला जो जवळपास १९ व्या शतकापर्यंत टिकला. पुढे इथे देखील मुस्लिम राजवटींनी ख्रिश्चन धर्मियांना राहण्याची आणि स्वतःचा धर्म आचरण्याची परवानगी दिली असं दाखवलं पण त्यांच्यासोबतचा भेदभाव वाढत गेला.
१८९४ ते १८९६ या काळात जवळपास ३ लाख अर्मेनियन्सचं शिरस्त्राण झालं. अर्मेनियन लोकं ही लढवय्यी त्यामुळे प्रत्येक राजवटीला या लोकांचं मोल माहित होतं.
पुढे दुसऱ्या महायुद्धात देखील जवळपास ५ लाख लोकं रशियन सैन्यासाठी लढले. बर्लिनचा पाडाव झाला आणि दुसऱ्यामहायुद्धाचा शेवट झाला.
रशियन सैन्याच्या ज्या तुकड्यांनी बर्लिनचा पाडाव केला, त्यातली महत्वाची सैन्याची तुकडी ही अर्मेनियन होती. त्यामुळे जोसेफ स्टॅलिनना अर्मेनियन लोकांच्या लढाऊ वृत्तीचं प्रचंड कौतुक होतं.
जोसेफ स्टॅलिनच्या मृत्यूनंतर मात्र अर्मेनियन लोकांची स्वतंत्र होण्याची महत्वकांक्षा बळकट होऊ लागली. पुढे निकिता क्रुश्चेव्हच्या काळात अर्मेनियात चर्चचं महत्व वाढायला लागलं. १८९४-१८९६ आणि पुढे १९१७ च्या आसपास अर्मेनियन लोकांचा जो नरसंहार झाला, त्या नरसंहाराचं स्मारक बनलं. असं कोणतंही स्मारक एकदा का उभं राहिलं की ते अस्मितेला ताकद द्यायला सुरुवात करतं, जे अर्मेनियाच्या बाबतीत देखील घडत होतं.
१९८० च्या दशकांत मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्या ग्लासनोस्त आणि पेरेस्त्रोइका युगाला सुरुवात झाली होती. आणि अर्मेनियन लोकांनी आम्हाला प्रदूषणविरहित जगण्याचा हक्क आहे असा आवाज बळकट करायला सुरुवात केली. सोव्हिएट रशियाने उभारलेले प्रदूषणकारी कारखाने आमच्या भूभागात नको असं त्यांचं म्हणणं होतं.
याच दरम्यान अर्मेनिया आणि सोव्हिएट अझरबैजानमध्ये देखील तणाव वाढायला लागला. आणि अर्थातकारण होतं 'नागोर्नो-काराबाख' या प्रांतावरून. हा भाग सोव्हिएट अझरबैजानच्या अधिपत्याखाली असला तरी इथे राहणारी बहुसंख्य लोकं हीअ र्मेनियन होती. 'काराबाख'मध्ये सोव्हिएट अर्मेनियासोबत आम्हाला जाऊ द्यावं यासाठी सुरुवातील शांततेत निदर्शनं सुरु झाली खरी, पणअझरबैजानमध्ये मात्र अर्मेनियन लोकांवर हल्ले सुरु झाले. १९७० च्या दशकात जवळपास ५ लाख अर्मेनियन लोकं ही अझरबैजानमध्ये राहत होती. अझरबैजानमध्ये अर्मेनियन लोकांवर हल्ले सुरु झाले हे पाहून अर्मेनियामध्ये अझरबैजानी लोकांवर हल्ले सुरु झाले. याच दरम्यान १९८८ मध्येअ र्मेनियामध्ये ७.२ रिश्टर स्केल ताकदीचा भूकंप झाला.
जगात यापेक्षा अधिक ताकदीचे भूकंप अनेक देशांत झालेत किंवा होत असतात, पण अर्मेनियात या भूकंपाने जे नुकसान केलं ते अतिप्रचंड होतं. १८२६ते १९८० च्या काळात ज्या इमारती अर्मेनियात उभ्या राहिल्या, त्या अतिशय तकलादू होत्या. यावर पुढे अनेक आठवडयांनी मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी दोष दिला, ब्रेझनेव्ह यांच्या काळात कसा प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार घडला याला.
रशियन राजवटींचं एक बरं असतं, नवीन माणूस सत्ताधीश झाला की त्याच्या सर्व पूर्वसूरींना कसं बदनाम करता येईल, कसं विस्मरणात ढकलता येईल हे पाहतो.
इथेही हेच घडलं. कोणाच्या भ्रष्टाचारामुळे हे घडलं याच्याशी अर्मेनियन लोकांना देणंघेणं नव्हतं. ते रस्त्यावर आले होते हे वास्तव होतं. त्यात अर्मेनियन लोकांना मदत देखील वेळेत मिळाली नाही. यामुळे असंतोष खूपच वाढला.
इकडे रशियाचे विघटन सुरु झालं. मिखाईल गोर्बाचेव्ह यांना मुळातच हा पसारा आवरत नव्हता, त्यात अर्मेनिया आणि अझरबैजान यांचं काय होतंय, त्यांच्यातला संघर्ष थांबवणं हे सगळं त्यांच्या आवाक्याबाहेरचं काम होतं. मे १९९० ला अर्मेनियन सैन्याची स्थापना झाली. अर्मेनियन सैन्य आणि सोव्हिएटर शियाचे सैन्य यांच्यात झटापटी, गोळीबार अशा घटना सुरु झाल्या. आणि २१ सप्टेंबर १९९१ ला अर्मेनियाने स्वतंत्र राष्ट्राची घोषणा करून टाकली. लेव्हॉन टेर पेट्रोस्यान हे अर्मेनियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष झाले. अशा नाजूक काळात राष्ट्राध्यक्ष बनलेल्या कुठल्याही राष्ट्राध्यक्षाला स्वतःच स्थान बळकटकरायचं असेल तर जो एकमात्र उपाय सापडतो तो म्हणजे, 'राष्ट्रवादाला' ताकद देणे आणि कुठल्यातरी प्रांतावर आपला हक्क सांगणे आणि त्यासाठी एक मोठा संघर्ष उभा करणे. जे लेव्हॉन यांनी चोख केलं.
'नागोर्नो-काराबाख' हा अर्मेनियन बहुल भाग आहे, आणि ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या देखील तो अर्मेनियाचाच भूभाग असायला हवा म्हणून आवाज उठवला. पहिलं 'नागोर्नो-काराबाख' युद्ध अर्मेनियाने जिंकलं. यावर अझरबैजानकडे एकच उपाय होता, तो म्हणजे अर्मेनियाच्या सीमांची नाकाबंदी. अर्मेनियाची हवाई वाहतूक आणि रस्त्याची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. पण तरीही१९९४ पर्यंत अर्मेनिया आणि अझरबैजानमधल युद्ध संपलं नाही. रशियाच्या मध्यस्थीने हे पहिलं युद्ध थांबलं. तोपर्यंत अर्मेनियाने नागोर्नो-काराबाखभागावर ताबा मिळवला होता.
पण या युद्धात दोन्ही बाजूच्या मिळून ३०,००० लोकांचा मृत्यू झाला आणि जवळपास १० लाख लोकं विस्थापित झाले होते.
आता जरा अझरबैजानचा इतिहास समजून घेऊ. पहिल्या महायुद्धाच्या काळात जसं अर्मेनिया, जॉर्जियाने स्वतःच स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायचा प्रयत्न केला तसाच तो अझरबैजानने पण केला होता. ट्रान्सकॉकेशियन डेमोक्रॅटिक फेडरेटिव्ह रिपब्लिकच्या नावाने या तिन्ही देशांत स्वातंत्र्याचे वारेवाहू लागले. मे १९१८ मध्ये मुसावात पक्षाने 'अझरबैजान डेमोक्रॅटिक रिपब्लिक' नावाने देशाची घोषणा केली. संसदीय लोकशाहीची घोषणा करणाराहा पहिला मुस्लिम देश. स्त्रियांना, पुरुषांच्या जोडीला समान हक्क देणारा देश म्हणजे अझरबैजानच आणि देशाचं स्वातंत्र्य घोषित झाल्या झाल्या 'बाकू विद्यापीठाची' स्थापना केली. १९१८ च्या काळांत मुस्लिम जगतातील हे फारच क्रांतिकारक पाऊल होतं. पण हे स्वातंत्र्य अवघे २३ महिने टिकलं. बोल्शेव्हिक ११ व्या सोव्हिएट रेड आर्मीने अझरबैजानच्या सैन्याला धूळ चारत रशियाने 'अझरबैजान'ला रशियाशी जोडलं. या लढाईत अझरबैजानचे३०,००० सैनिक धारातीर्थी पडले. पण रशियाशी जोडताना देखील या प्रांताची ओळख 'अझरबैजान' म्हणून टिकली.
दुसऱ्या महायुद्धात अझरबैजानने रशियासाठी कडवी लढत दिली. १९४२ च्या आसपास जेंव्हा अझरबैजानची लोकसंख्या ३५ लाख होती तेंव्हा त्यातले जवळपास ७ लाख स्त्रीपुरुष सैन्यात सहभागी होऊन लढाई करत होते. पुन्हा रशियाला युद्धासाठी लागणारं खनिज तेलाच्या एकूण गरजेपैकी ८०%गरज ही बाकु (आत्ताची अझरबैजानची राजधानी) भागवत होता. थोडक्यात दुसरं महायुद्ध रशियाने जिंकलं त्यात सर्वप्रकारची संसाधनं पुरवण्यात अझरबैजानचा मोलाचा वाटा होता. पुढे मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्या शेवटच्या टप्प्यात जसे रशियातील अनेक प्रांतांमध्ये स्वतंत्र होण्याचे वेध लागले, तसे वेध अझरबैजानला पण लागले.
डिसेंबर १९८९ मध्ये अझरबैजानच्या लोकांनी इराणच्या सीमेला लागून असलेल्या सीमेवरची कुंपणं उखडून टाकली आणि इराणमधल्या सीमेलगतच्या अझरबैजानी लोकांसमवेत एकत्र राहण्याची इच्छा प्रकट केली. याच दरम्यान ९ जानेवारी १९०० ला 'सुप्रीम सोव्हिएट ऑफ अर्मेनियन'ने (एसएसआर)' नागोर्नो-काराबाख' स्वतःचा भाग आहे असं घोषित केलं. आणि इतकंच नाही तर या भागातील अर्मेनियन नागरिकांना देशाच्या निवडणुकीत भागघेण्याचे अधिकार देखील दिले.
हा तत्कालीन सोव्हिएट रशिया आणि अझरबैजानी व्यवस्थांच्या विरोधातील मोठं पाऊल होतं. यामुळे आताअ झरबैजान स्वतंत्र व्हायलाच हवा अशी मागणी जोर धरू लागली. याला चिरडण्यासाठी गोर्बाचेव्हनी सैन्याला हस्तक्षेप करण्याचे आदेश दिले. आणि१९-२० जानेवारी १९९० ला सैन्याने निदर्शकांवर जे गोळीबार केले त्यात १५० हुन अधिक लोकं मारले गेले. या घटनेची नोंद अझरबैजानमध्ये, 'ब्लॅक जानेवारी' म्हणून केली गेली.
१८ ऑक्टोबर १९९१ ला अझरबैजानने सोव्हिएट सोशल रिपब्लिकमधून स्वतः बाहेर पडल्याची घोषणा करत, देशाच्या स्वातंत्र्याची घोषणा केली. देशस्वतंत्र होत असतानाच 'नागोर्नो-काराबाख' प्रांताच्या अधिकारावरून अर्मेनिया आणि अझरबैजानमध्ये युद्ध सुरु आहे. पुढे यथासांग देशाचा पहिलानिर्वाचित राष्ट्रध्यक्षाची सैन्याच्या साहाय्याने उचलबांगडी करणे इत्यादी प्रकार होऊन हैदर अलीयेव हे राष्ट्राध्यक्ष झाले. पुढे २००३ साली त्यांचं निधनझाल्यावर तिथपासून आजपर्यंत त्यांचा मुलगा हा राष्ट्राध्यक्ष आहे. आणि हे करताना विरोधकांचा आरोप आहे की इथे निवडणुकीतील बहुमत मॅनेज केलं जातं. आरोप काही का असेना पण निर्धोकपणे अलियेव कुटुंब इथलं सत्ताधीश आहे हे खरं आहे.
यावरून एक गोष्ट लक्षात येईल ती म्हणजे, मुळात स्वातंत्र्याची दीर्घ आस असणारे प्रदेश, रशियाच्या जबड्यातून सुटका करून घेतलेले, त्या अर्थाने आत्ता आत्ता स्वतंत्र झालेले देश, दोन्ही देशांमध्ये लोकशाही आहे पण तरीही सत्ताधीशांना टिकून रहायचं असेल तर जी एक ठिणगी कायम पेटलेली असली पाहिजे ती आहे युद्धाची आणि अर्थात वर म्हणल्याप्रमाणे कुठल्यातरी एका भीतीची.
एकेकाळी अर्मेनियामध्ये, रशियाचे विघटन होण्याच्या आधी मोठ्या केमिकल कंपन्या, अन्नप्रक्रिया उद्योग अर्मेनियात होते. पुढे रशियाच्या विघटनानंतर अर्मेनियाने शेतीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आणि त्याला कारण होतं त्याकाळात असलेली अन्नधान्याची टंचाई. पण त्यावर मात करत, शेती, अन्नप्रक्रिया उद्योग, आणि खाण उद्योग याच्या जोरावर आर्थिक प्रगती बऱ्यापैकी साधली. पण रशियावरच अर्मेनियाचं अवलंबित्व तितकंच मोठं आहे. अर्मेनियाला लागणारं खनिज तेल हे ही रशियन 'गझप्रॉम' पुरवते.
रशियात आणि इतर देशांमधले अर्मेनियन्स जवळपास वर्षाला ५.५ बिलियन डॉलर्स आपल्या देशांत पाठवतात. सध्या अर्मेनियाचा जीडीपी वाढीचा दर हा जवळपास साडेआठ टक्क्याच्या वर आहे, पण युक्रेन-रशिया युद्धामुळे रशियात जो माल निर्यात होत आहे त्यातला बराचसा अर्मेनियातून जात आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला आलेली ही एक प्रकारची सूज आहे. त्यात रशिया मध्ये मध्ये अर्मेनियाचे आर्थिक नळ बंद करण्याची धमकी देते, अशावेळेस त्वेषाने अझरबैजानशी संघर्ष करणं हाच एकमेव उपाय शिल्लक राहतो.
अझरबैजानमध्ये खनिज तेलांचे आणि गॅसचे मोठे साठे आहेत. या खनिज तेलाची निर्यात हा अझरबैजानच्या अर्थव्यवस्थेचा पाया आहे. अझरबैजानच्या संरक्षण खात्याची जितकी तरतूद आहे तितका अर्मेनियाच्या अर्थव्यवस्थेचा जीव आहे. थोडक्यात आज भारत आणि पाकिस्तानची जी परिस्थिती आहे, तशीच काही परिस्थिती अझरबैजान आणि अर्मेनियाची आहे. अझरबैजानच्या बाजूने तुर्कस्तान उभं आहे, आणि ते देखील इतपत की, एका युद्धात तुर्कस्तानने सीरियन भाडोत्री सैनिकांची कुमक अझरबैजानला दिली. तर अर्मेनियाच्या बाजूने रशिया आहे कारण रशियाचा एक सैन्यतळ हाअ र्मेनियात आहे आणि अर्मेनियाचं संरक्षण करण्याची जबाबदारी रशियाने घेतली आहे.
त्याशिवाय अमेरिकेत अर्मेनियन लोकांची संख्या मोठी आहे, लॉसएंजलिससारख्या ठिकाणी तर ती संख्या खूपच मोठी आहे. या अर्मेनियन्सनी 'अमेरिकन काँग्रेस' मध्ये स्वतःचा एक मोठा प्रभावगट तयार केला आहे. त्यामुळे अगदी दुर्मिळ दिसणारं रशिया-अमेरिका एकत्र असल्याचं चित्र इथे बघायला मिळतं.
१९९४ ला रशियाच्या पुढाकाराने आर्मेनिया आणि अझरबैजानमध्ये शांतता करार झाला तरी तणाव कायम राहिला. २००८ मध्ये अर्मेनियन आणि अझरबैजानी सैनिकांमध्ये झटापट झाली. नागोर्नो-काराबाखच्या विवादित भागात अर्मेनियन सैन्य घुसलं आणि या झटापटीला सुरुवात झाली. पुढे संयुक्त राष्ट्रसंघाने ठराव मंजूर करून अर्मेनियाला विवादित भागातून सैन्य मागे घ्यायला लावलं. पण याने सगळं शांत झालं असं अजिबात नाही. उलट २००८ ते २०२० या काळात कुरबुरी सुरूच होत्या.
सप्टेंबर २०२० मध्ये अझरबैजानी सैन्याने लाईन ऑफ कॉन्टॅक्टच्या जवळ आगळीक केली आणि पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडली. अझरबैजाननेअर्मेनियाच्या ताब्यातील नागोर्नो-काराबाख भागातील शूषा शहराचा ताबा घेतला. सप्टेंबर २०२२ मध्ये देखील अझरबैजानने मोठ्या प्रमाणवरनागोर्नो-काराबाखमधल्या अर्मेनियन भागांवर हल्ला चढवला. हा संघर्ष अजून चालूच आहे. जवळपास ४४०० चौरस किलोमीटर परिसर असलेलानागोर्नो-काराबाख हा भूभाग गेली ३० वर्ष सातत्याने युद्धाच्या छायेत आहे.
थॉमस दि वॉल या ब्रिटिश अभ्यासकाच्या मते रशिया ही जरी आर्मेनियाच्या बाजूने असल्यासारखी दाखवत असली तरी ते जिथे फायदा जास्त तिथे रशिया आपलं बळ देते अशी परिस्थिती आहे. आज देखील जे युद्ध सुरु आहे त्यात अर्मेनियाला रशिया शस्त्र पुरवत आहे. जगात कुठेही युद्ध सुरु असू देत्यातलं शस्त्रात्रांचं अर्थकारण खूपच मोठं असतं. आणि रशिया ही संधी का सोडेल? रशिया सोडा भारताने देखील २०२२-२३ मध्ये अर्मेनियाला मोठ्याप्रमाणवर शस्त्र विकली. शेवटी व्यापार हाच महत्वाचा, नाही का?
तुर्कस्तान पूर्णपणे अझरबैजानच्या बाजूने आहे. अगदी भाडोत्री सैन्य देण्यापासून ते अर्मेनियाची बॉर्डर बंद करून त्यांना होणारा जीवनावश्यक वस्तूंचापुरवठा रोखण्यापर्यंत सगळं काम चोखपणे तुर्कस्तान करतं. राहिला प्रश्न इराणचा, खरंतर इराणची सांस्कृतिकदृष्ट्या जवळीक अझरबैजानशी. ख्रिस्तपूर्वकाळात झोरॅष्ट्रियन धर्माचा प्रभाव दोन्हीकडे. आज देखील शिया मुस्लिमांचा भरणा असलेला देश अजझरबैजान. पण इतकं असून देखील व्यापारातील फायदा अर्मेनियामुळे जास्त होतो, त्यामुळे इराणचा कल सातत्याने बदलत असतो.
अमेरिकेला अर्मेनियन लॉबीला पण जपायचं आहे, पण अझरबैजानसारखा तेलसंपन्न प्रांत पण दूर जाऊ द्यायचा नाही. त्यामुळे त्यांचा लंबक मध्येच अझरबैजानकडे पण जातो.
थोडक्यात प्रत्येक देशाला या युद्धग्रस्त शस्त्र विकायची आहेत. रशिया हा अर्मेनियाचा मोठा शस्त्र पुरवठादार देश आहे तर, इस्रायल हा सध्याअ झरबैजानचा.
त्यात सर्बियापासून, चीनपर्यंतचे देश जगातल्या कोणाला तरी शस्त्र विकतोच. त्यामुळे हे युद्ध, ही अशांतता कधी थांबेल, किंवा थांबावी असं कोणालाच वाटणार नाही.
जोपर्यंत हा तणाव आहे, ही भीती आहे, तोपर्यंत सत्ताधीशांच फावणार. एक छोटं उदाहरण, अझरबैजानने २०१७ साली २.९ बिलियन डॉलर्सचा एक गुप्त निधी तयार केला ज्यातून युरोप आणि अमेरिकेतील सत्ताधाऱ्यांना, माध्यमांना अझरबैजानच्या बाजूने आणता येईल. ही बातमी जेंव्हा बाहेर आली तेंव्हा अझरबैजान सोडून सगळीकडे आरडाओरडा झाला. अझरबैजानमध्ये एक मत असं होतं की काय हरकत आहे हे सगळं करायला?
युद्ध जर इतकं स्वातंत्र्य देत असेल तर कोण कशाला युद्ध थांबवायच्या भानगडीत पडेल. त्यामुळे जगातील इतर युद्धांप्रमाणेअर्मेनिया-अझरबैजानमधल्या युद्धापेक्षा दुसरं फायदेशीर युद्ध तयार होत नाही, तोपर्यंत हे युद्ध बहुदा चालूच राहणार.
Comments
Post a Comment