कारण ह्याला आपण प्रगती म्हणतो...
कारण ह्याला आपण प्रगती म्हणतो... माझं केस कापायचं सलून हे गेले ३३ वर्षं एकच आहे. सध्या डोक्यावर फारच थोडे केस उरले असले तरी ते वाढतात त्यामुळे अधून मधून कापायला जावं लागतंच. माझा जन्म आणि पुढची ३३ वर्ष डोंबिवली शहरात गेली. आणि ह्या पूर्ण काळात मी ह्याच सलून मध्ये जातोय. डोंबिवली शहराच्या मध्य वस्तीत हे सलून आहे. गेल्या ३३ वर्षांत इथलं काहीच बदललं नाहीये. तेच जुनाट लाकडी फर्निचर, बऱ्यापैकी करकरणाऱ्या खुर्च्या, केस कापणारी माणसं तीच जी माझ्या आठवणीत २० वर्षांपूर्वी होती. सलून प्रमाणे म्हातारी होत गेलेली केस कापणारी ही माणसं आता तिथल्याच ब्रशने स्वतःचे केस काळे करत असतात आणि त्याच डुगडुगणाऱ्या लाकडी स्टुलावर बसून असतात. एवढ्या वर्षांत जर काही बदललं नसेल तर विविध भारतीचं रेडिओ स्टेशन. ५०, ६०, ७० च्या दशकातील गाणी सुरु असतात, आताशा ज्यांच्याकरता ही गाणी लावली जातात त्या गिऱ्हाइकांना ती फारशी परिचित नसतात आणि केस कापणाऱ्या ह्या गड्यांच्या कानावर ती पडतात का नाही इतक्या निर्विकारपणे त्यांचे हात यंत्रवत सुरु असतात. पूर्वी ही माणसं एकमेकांशी तरी बोलायची, गिऱ्हाइकांशी बोलायची पण आता ग...