वाटचाल 'अंकित' महाराष्ट्राच्या दिशेने....

१ मे ला वसई येथील जाहीर सभेत राज ठाकरेंनी पालघर आणि ठाणे जिल्ह्यातल्या परप्रांतीयांच्या वाढत्या संख्येविषयी आणि त्यांच्या 'कब्जा' करण्याची वृत्ती मांडली होती. २००८ पासून हा मुद्दा राज ठाकरे मांडत आहेत, थोडक्यात जो धोका ते मांडत आहेत त्याच्या मांडणीला देखील दहा वर्षं पूर्ण झाली. मी काही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा समर्थक या भूमिकेतून हे लिहितोय असं नाही पण ते जे सांगत आहेत ते किती गंभीर आहे हे परवाच्या एका बातमीतून जाणवलं.

पालघर लोकसभेची पोटनिवडणूक भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने प्रतिष्ठेची केली आहे. सेनेने आमच्या पाठीत खंजीर खुपसला म्हणून त्याचा बदला घ्यायला भाजप आतुर आहे अश्या पद्धतीच्या बातम्या भाजप आयटी सेल कडून धाडल्या जात आहेत. तसं बघायला गेलं या लोकसभेचे फक्त ९ महिने शिल्लक राहिले आहेत, त्यात जर शेड्युल प्रमाणे मार्च २०१९ ला निवडणुकांचा पहिला टप्पा सुरु होणार असेल तर साधारणपणे फेब्रुवारी २०१९ च्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागेल आणि लोकसभेचं पावसाळी अधिवेशन अंदाजे जुलैत सुरु होईल, म्हणजे नवनिर्वाचित खासदाराचा शपथविधी तेंव्हाच होईल म्हणजे ही खासदारकी हीच औटघटकेची आहे.

भारतीय जनता पक्षाचं लोकसभेतलं संख्याबळ घटत जरी २७१ वर आलं असलं तरी सरकारला धोका नाही. फक्त २०१४ पासून जवळपास सगळ्या पोटनिवडणूका हरण्याची परंपरा खंडित करण्यासाठी, आणि कर्नाटकात जे घडलं त्या जखमेवर फुंकर म्हणून 'पालघर'चा विजय बहुदा भारतीय जनता पक्षाला आवश्यक असावा. ह्याचवेळी 'गोंदिया' मध्ये देखील पोटनिवडणूक सुरु आहे हे नोंदवून ठेवूया. पण भारतीय जनता पक्षाला पालघरचा विजय हा अत्यावश्यक वाटतोय हे दिसतंय.

ह्यात जसं शिवसेनेला दणका देणं हे आवश्यक आहे तसंच 'बुलेट ट्रेन' प्रकल्प जिथे होतोय तो जिल्हा आपल्या ताब्यात रहावा यासाठी देखील धडपड असू शकते. आणि हा विजय साधण्यासाठी पालघर मधील उत्तर भारतीय मतदारांना आकृष्ट करायला भाजपच्या राज्याच्या नेतृत्वाने चक्क 'अजयसिंग बिश्त' उर्फ श्री. 'योगी आदित्यनाथ ह्यांना पाचारण केलं... महाराष्ट्रातल्या एका पोटनिवडणुकीला उत्तर प्रदेशाचा मुख्यमंत्री पाचारण करायला लागतो? या पट्ट्यातील उत्तर भारतीय आज किमान ५, १०, १५ वर्षं ह्या भागात राहत असतील पण तरीही ते महाराष्ट्राला, इथल्या नेतृत्वाला आपलं मानायला तयार नाहीत? पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी ह्यांच्या नंतर सध्या तरी राज्यात मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस हे स्टार प्रचारक असतात, मग इथली उत्तर भारतीय जनता ज्या राज्यात राहत आहे त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पण मानणार नाही?
सध्याच्या सत्ताधाऱ्यांना म्हणजेच भारतीय जनता पक्षाला मतदान करा हे सांगायला बाहेरचा नेता आणला जातो? ह्यापुढे महाराष्ट्राचा अजेंडा हा बाहेरच्या राज्यात ठरवला जाणार?

निवडणुकांच्या वेळेस एका राज्यातले नेते दुसऱ्या राज्यात प्रचाराला जातात असं अनेकवेळा घडतं हे मान्य. पण महाराष्ट्रातले सत्ताधारी इतके हताश आणि लेचेपेचे झालेत की त्यांना त्यांच्या राज्यातल्या काही भाषिक समूहांशी संवाद का साधता येत नाही. सध्याच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने 'उत्तर भारतीय संमेलनं' भरवली, ज्याला मुख्यमंत्र्यांसकट अनेक मंत्री हजर राहिले, इतकं करून देखील जर 'उत्तर भारतीय' मतदार ह्या राज्याला आपलं न म्हणता कोण्या एका उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्र्याच्या सांगण्यावर मतदान करणार असतील तर राज ठाकरे जो धोका मांडत आहेत त्याच्यावर विचार करावा लागेल.

गोंदिया मध्ये पोटनिवडणूक आहे, हा जिल्हा मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ ला लागून आहे. ह्या जिल्ह्यात हिंदी भाषेचं प्राबल्य आहे, इथेही  ह्या दोन राज्यातील लोकं राहत असणार मग ह्या मतदारांना आकृष्ट करण्यासाठी श्री. शिवराजसिंग चौहान किंवा श्री. रमणसिंग ह्यांना का नाही पाचारण केलं गेलं? उत्तरप्रदेशातून आलेलेच का मतदान अजेंडा ठरवायला लखनऊ कडे डोळे लावून बसलेत?

मध्यप्रदेशात मोठ्या प्रमाणावर मराठी भाषिक पिढ्यानपिढ्या राहत आहेत. इंदौर मधून 8 टर्म खासदार सौ.सुमित्रा महाजन या निवडून येतात हा युक्तिवाद पुढे केला जाईल पण त्या मध्यप्रदेशच्या खासदारासारखं वागतात, त्या राज्यासाठी धडपडतात, हे विसरून चालणार नाही. आणि इंदौरच्या शिवाय जबलपूर ते ग्वाह्ललेऱ पासून अगदी भेडाघाट पर्यंत अनेक लोकसभा मतदारसंघात मराठी भाषिक मोठ्या प्रमाणावर आहेत. इतकंच काय दिल्लीत जवळपास १.२५ ते १.५० लाख मराठी भाषिक राहत आहेत, नूतन मराठी किंवा मी चुकत नसेन तर चौघुले पब्लिक स्कुल या मराठी माध्यमाच्या शाळा आहेत पण मराठी माणसाला आकृष्ट करायला मराठी मुख्यमंत्र्याला दिल्ली, मध्यप्रदेश किंवा लखनऊ मध्ये पाचारण केल्याची उदाहरण आढळणार नाहीत. बडोद्यात मोठ्या प्रमाणवर मराठी माणसं राहत आहेत तिथेही असले प्रकार ऐकीवात नाहीत.

राष्ट्रीय पक्षाचे, राष्ट्रीय स्तरावरचे नेते आणि वक्तृत्वाचं उत्तम अंग असलेले माझ्या माहितीत एकमेव मराठी नेते म्हणजे स्व.प्रमोद महाजन.  पण त्यांना देखील इतर राज्यात निव्वळ मराठी मतांचा अजेंडा सेट करायला नेल्याचं ऐकलं नाही.

हाच धोका आपल्याला समजावून घ्यावा लागेल आणि आपल्या सत्ताधाऱ्यांना देखील. तुम्ही बाहेरून आलेल्यांना गोंजारण्याचा कितीही प्रयत्न केलात तरी ते तुमचं नेतृत्व मान्य करणार नाहीत, महाराष्ट्राच्या मतदार यादीत नाव असलं तरी त्यांना आदेश भविष्यात लखनऊ किंवा पाटण्यातून का येतोय ह्याकडे डोळे लावून बसणार. राज ठाकरे जे म्हणत आहेत ते आज समजवून नाही घेतलं तर अजून २ ते ३ दशकांत 'अंकित राज्य' म्हणजे काय ह्याचा अनुभव तुम्हाला येईल.
#RajThackeray #Maharashtra #YogiAdityanath #DevendraFadnavis

ketanalytics


Comments

  1. I will customize your website beautifully if you want..
    Contact me on https://www.borntechnical.com
    In Low price.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

तर्कबुद्धीचा उतारा

ट्रम्प आणि देशीवाद

मराठी जगाची खिडकी युट्युब व्हावी