कारण ह्याला आपण प्रगती म्हणतो...

कारण ह्याला आपण प्रगती म्हणतो...
माझं केस कापायचं सलून हे गेले ३३ वर्षं एकच आहे. सध्या डोक्यावर फारच थोडे केस उरले असले तरी ते वाढतात त्यामुळे अधून मधून कापायला जावं लागतंच.  माझा जन्म आणि पुढची ३३ वर्ष डोंबिवली शहरात गेली. आणि ह्या पूर्ण काळात मी ह्याच सलून मध्ये जातोय.

डोंबिवली शहराच्या मध्य वस्तीत हे सलून आहे. गेल्या ३३ वर्षांत इथलं काहीच बदललं नाहीये. तेच जुनाट लाकडी फर्निचर, बऱ्यापैकी करकरणाऱ्या खुर्च्या, केस कापणारी माणसं तीच जी माझ्या आठवणीत २० वर्षांपूर्वी होती. सलून प्रमाणे म्हातारी होत गेलेली केस कापणारी ही माणसं आता तिथल्याच ब्रशने स्वतःचे केस काळे करत असतात आणि त्याच डुगडुगणाऱ्या लाकडी स्टुलावर बसून असतात. एवढ्या वर्षांत जर काही बदललं नसेल तर विविध भारतीचं रेडिओ स्टेशन.

५०, ६०, ७० च्या दशकातील गाणी सुरु असतात, आताशा ज्यांच्याकरता ही गाणी लावली जातात त्या गिऱ्हाइकांना ती फारशी परिचित नसतात आणि केस कापणाऱ्या ह्या गड्यांच्या कानावर ती पडतात का नाही इतक्या निर्विकारपणे त्यांचे हात यंत्रवत सुरु असतात. पूर्वी ही माणसं एकमेकांशी तरी बोलायची, गिऱ्हाइकांशी बोलायची पण आता गप्प गप्प असतात. माझ्यासारखा एखादा जुना माणूस आला तर हाताच्या स्पर्शातून काय तो संवाद होतो. निघताना हात करतात. बस. झालं.

मी डोंबिवली शहर सोडलं तरी केस कापायला डोंबिवलीत जातो. ह्यावर मला अनेक लोकं हसतात पण एसी सलून,ज्यात केसांचा तुरा किंवा बटा काढलेली माणसं, केस कापणाऱ्यांना आणि गिऱ्हाइकांना पण कळत नाहीत अशी इंग्रजी गाणी हे माझ्या अंगावर येतं. त्यापेक्षा good old world, मधलं हे जुनं सलून बरं वाटतं.

तर मी आज सलून मध्ये गेलो. बसलो. सगळं तेच आणि तसंच. विविध भारती, जुन्या खुर्च्या, केस कापणारी आधी ३ माणसं होती, आता २ उरली आहेत. एक माणूस frustration ने सोडून गेला म्हणे. तो ही २० वर्ष जुना. त्याची चौकशी केल्यावर एका वाक्यात उत्तर आलं की "आयेगा वापस... थोडा परेशान हो गया है '.
 ज्याने हे उत्तर दिलं तो भय्या म्हणजे उत्तर भारतीय. माझे केस गेली २० वर्षं कापतोय. गडी पन्नाशीला आला असेल.

आज त्याचा हात अजिबात चालत नव्हता. अचानक मध्येच थांबला. बाहेर जाऊन बसला. पंधरा मिनिटं बाहेर बसून होता. परत आत आला. म्हणाला "सॉरी.. हात काम नही कर रहा है... डॉक्टर बोलता है खून की कमी है ... बहुत कुछ खाने को कहता है ... कैसे परवडेगा... " मी म्हणलं कर आराम.. दुसरा कापेल केस तो फ्री झाला की... मला म्हणाला "उसका हालत भी लगभग वैसा ही है .. " दुसरा केस कापणारा मराठी. त्याची कथा पण अशीच..

मग हळूहळू केस कापायला सुरुवात केली, पण हात थरथरत होता. ह्या सलूनच्या बाहेर एक वर्तमानपत्रं विकणारा अजून एक भय्या...  गेली २५ वर्षं तरी असावा.
इतकी वर्षं पेपर विकतोय पण मी ह्याला कधीही पेपर वाचताना पाहिलं नाही. हा पेपरवाला हल्ली हल्ली मध्येच अर्धा अर्धा तास स्टॉल सोडून गायब होतो. का तर त्याला कंटाळा यायला लागलाय.
 पण त्याचा धंदा affect होऊ नये म्हणून हे दोन केस कापणारे येणाऱ्या जाणाऱ्यांवर लक्ष ठेवून असतात, पेपर विकतात, पैसे घेतात. थोडक्यात मागून पॅन्ट फाटलेल्याने पुढून पॅन्ट फाटलेल्याची इभ्रत वाचावी म्हणून धडपड करावी तशातला हा प्रकार.

मागे २ गिऱ्हाईकं येऊन बसलेली. प्रचंड उन्हाळा या विषयावरून गप्पांची सुरुवात.
 मोदी किती भारी विरुद्ध मोदींनी काही केलं नाही ही लढाई जुंपलेली. दोघेही या सलूनची जुनी गिऱ्हाईकं.
 सध्या मोदींनी फार काही केलं नाही असा सूर कोणी आळवला की प्रो मोदी जनता युरोपातल्या क्रुसेडवर निघाल्यासारखी समोरच्यावर चवताळून हल्ला करतात.
मोदी विरोधी सूर चिवट होता त्यामुळे प्रो मोदी सैनिकाने केस कापणाऱ्याला लढाईत ओढलं.
तोडक्या मोडक्या हिंदीत मत विचारलं. केस कापणाऱ्याचे हात आधीच चालत नव्हते, त्यात वरून प्रश्नाचा भडीमार.

त्याच्याकडे काहीच उत्तर नव्हतं.

ह्या सलूनमध्ये केस कापणारे जे दोघे उरलेत त्यातला एक,कधी तरी २० ते २५ वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातून आलेला तर दुसरा महाराष्ट्राच्या कुठल्यातरी कोपऱ्यातून आलेला.
 स्वप्न वैगरे घेऊन मुंबईत आले असतील असं म्हणणार नाही...  हा पण पोटाची खळगी भरेल ह्या आशेवर नक्की आले असणार. गेली २०, २५ वर्षं चिकाटीने इकडे राहिली याचा अर्थ शरीराला माफक ताकद मिळेल इतकं अन्न विकत घेता येईल एवढे पैसे मिळत असणार आणि झालंच तर रात्रीची देशीची सोय. ती हवीच.

कारण नरसिंहराव जी आले, वाजपेयीजी आले, गुजराल जी आले, मनमोहनसिंग जी आले, आता मोदी जी आले. सगळे आले,गेले, पुढे येणारे जातील, ह्यांच्या वतीने कोणी ना कोणी स्वप्न विकायला त्या सलून मध्ये येऊन बसले असतील पण फरक पडला नाही उलट हळूहळू आपण परिघावर जाऊन बसतोय ही भावना विसरायला आणि झोप लागायला देशी हवीच. पण आताशा सकस अन्न पण परवडत नाही आणि तरीही सगळं आलबेल आहे ह्यावरच्या चर्चा ऐकायच्या ह्याने मन तडकून गेलेलं. आणि गेले २५ वर्षं जे कोण 'सपनो के सौदागर' येऊन गेले त्यांचं तुलनेने बरं चाललंय, त्यामुळे आज देखील कोणाच्या तरी बाजूने किंवा विरोधात चर्चा करण्या इतपत ताकद त्यांच्यात शिल्लक आहे.

एक अहवाल असं सांगतो की migrants म्हणजेच स्थलांतरित हे कायम nutrition deficit असतात कारण परक्या जगात त्यांना सकस अन्न बहुदा परवडत नाही. आणि शरीर खूप लवकर साथ सोडतं. सलून हे एक प्रतीक आहे. मेट्रो आली म्हणजे प्रगती झाली, मॉल आला म्हणजे प्रगती झाली, कॅशलेस इंडिया झाली की सगळे प्रश्न मिटतील, मग डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर स्कीमने प्रगती झाली, अगदी काही नाही तर सेक्युलर पाया टिकवला म्हणून हे सगळं टिकलं अश्या प्रत्येकाच्या थिअरीज आणि त्याचं समर्थन करणारी आणि विरोध करणारी प्रत्येकाची एक एक फळी. ह्या सैन्याला पोटाची खळगी भरण्याची चिंता कधीच नसते त्यामुळे लढाई अनंतकाळ सुरु राहील. पण फेकला जातोय एक मोठा वर्ग...

परिघाच्या आतला समाज ह्यांच्या प्रति कदाचित अधून मधून दया दाखवेल, कदाचित नाही. प्रगती म्हणून जी स्वप्नं आपण पाहत आहोत त्यात एक मोठा समाज असाच फेकला जाणार. पण हे बदलू शकत नाही कारण ह्यालाच आपण प्रगती म्हणतो. 

Comments

Popular posts from this blog

तर्कबुद्धीचा उतारा

ट्रम्प आणि देशीवाद

मराठी जगाची खिडकी युट्युब व्हावी