समाजमाध्यमांच्या रणांगणात

कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरेल, त्यावर लस येईल, त्या लसीचा प्रभाव दिसेल आणि कोरोना हा आजार आत्ता जितका प्राणघातक आहे तितका कदाचित राहणार नाही आणि शारीरिक आणि मानसिक बंधनात अडकलेला संपूर्ण मानव समूह मोकळा श्वास घेऊ लागेल, आणि त्यानंतरच जग अर्थात त्याला कोरोनात्तर जग म्हणायचं झालं तर ते पूर्णपणे वेगळं जग असेल. ते पूर्णपणे वेगळं असेल ह्याचा अर्थ दृश्य पातळीवरचं जग नाही पण, संपूर्ण जगाला वेढून टाकणारी भीती, अनिश्चितता, तुटलेपण, एकटेपण आणि परिस्थितीवश तंत्रज्ञानाच्या किंवा समाजमाध्यमांचा पूर्णपणे कह्यात गेलेलं आयुष्य ह्यात माणूस गुरफटून गेला आहे. अर्थात हे गुरफटणं हे काही आत्ताचं नाही तर गेलं एक आख्ख दशक ही प्रक्रिया सुरु आहे. २१ व्या शतकातील दुसरं दशक संपायला आलं आहे. ह्या दशकाचा आढावा घ्यायचा असेल तर सोशल मीडिया आणि त्याच्याशी निगडित डिजिटल तंत्रज्ञाशी आपलं नातं एका शब्दात ठरवायचं ठरलं तर, आपली अवस्था 'धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय' अशी झाली आहे. फेसबुक सारखं समाज माध्यम जन्माला येऊन १६ वर्ष पूर्ण झाली, ह्याच फेसबुकच्या जोरावर मध्यपूर्वेतील अनेक देशांमध्ये झालेली सत्तांतरं ज्या...