समाजमाध्यमांच्या रणांगणात
कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरेल, त्यावर लस येईल, त्या लसीचा प्रभाव दिसेल आणि कोरोना हा आजार आत्ता जितका प्राणघातक आहे तितका कदाचित राहणार नाही आणि शारीरिक आणि मानसिक बंधनात अडकलेला संपूर्ण मानव समूह मोकळा श्वास घेऊ लागेल, आणि त्यानंतरच जग अर्थात त्याला कोरोनात्तर जग म्हणायचं झालं तर ते पूर्णपणे वेगळं जग असेल. ते पूर्णपणे वेगळं असेल ह्याचा अर्थ दृश्य पातळीवरचं जग नाही पण, संपूर्ण जगाला वेढून टाकणारी भीती, अनिश्चितता, तुटलेपण, एकटेपण आणि परिस्थितीवश तंत्रज्ञानाच्या किंवा समाजमाध्यमांचा पूर्णपणे कह्यात गेलेलं आयुष्य ह्यात माणूस गुरफटून गेला आहे. अर्थात हे गुरफटणं हे काही आत्ताचं नाही तर गेलं एक आख्ख दशक ही प्रक्रिया सुरु आहे.
२१ व्या शतकातील दुसरं दशक संपायला आलं आहे. ह्या दशकाचा आढावा घ्यायचा असेल तर सोशल मीडिया आणि त्याच्याशी निगडित डिजिटल तंत्रज्ञाशी आपलं नातं एका शब्दात ठरवायचं ठरलं तर, आपली अवस्था 'धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय' अशी झाली आहे.
फेसबुक सारखं समाज माध्यम जन्माला येऊन १६ वर्ष पूर्ण झाली, ह्याच फेसबुकच्या जोरावर मध्यपूर्वेतील अनेक देशांमध्ये झालेली सत्तांतरं ज्यांना अरबस्प्रिंग म्हणून ओळखलं जातं. त्या सत्तांतराच्या साखळीची सुरुवात २०१० मध्ये झाली. त्यानंतर गेल्या १० वर्षांत जगात प्रचंड उलाढाली झाल्या ह्याच दशकात समाजमाध्यमांच्या खुबीने वापर करून देशोदेशी नवे सत्ताधीश आले. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होतात आणि त्यांच्या निवडीत समाजमाध्यमांवर पसरवल्या गेलेल्या चुकीच्या माहितीचा मोठा हात असतो अशी चर्चा सुरु राहते. भारतात देखील समाजमाध्यमांमध्ये निर्माण केलेल्या लाटेच्या जोरावर २०१२चं भ्रष्टाचाराच्या विरोधातील आंदोलन असो की निर्भयाला न्याय मिळावा म्हणून झालेलं आंदोलन असो की त्यानंतर झालेलं सत्तांतर असो अशा अनेक गोष्टी घडत राहिल्या. जगातील धनाढ्य व्यक्तींच्या यादीत अवघ्या तिशी पस्तिशीमधले समाज माध्यम सम्राट झळकू लागले आणि ह्याच दशकांत समाजमाध्यमांच्या अतिवापरामुळे मानसिक रुग्णांची संख्या देखील वाढू लागली.
जेंव्हा अरब स्प्रिंगने देशोदेशीच्या राजवटी बदलल्या गेल्या, किंवा जगभरात आंदोलनं झाली त्याचं प्रचंड अप्रूप,कौतुक हे माध्यमांना आणि सामन्यांना होतं. आजपर्यंत सत्ता ही सर्वोच्च पदांवर बसलेल्या माणसांकडे असायची आणि ती थोडी फार खाली झिरपल्याचा भास निर्माण व्हायचा. अरब स्प्रिंगच्या रूपाने तिथल्या तिथल्या सामान्य जनतेने व्यक्त होत आंदोलनं उभी करत सत्तांध सत्ताधीशांच्या सत्तेची तख्त फोडून काढली, अर्थात हा भासच होता कारण ज्या समाजमाध्यमांच्या जोरावर हे सगळं सुरु होतं त्या कंपन्यांच्या मालकांसाठी हा एक प्रयोग होता, जो कमालीचा यशस्वी ठरला. २०१२ साली डोनाल्ड ट्रम्प ह्यांचं एक ट्विट होतं, ज्यात ते म्हणाले होते की ट्विटरवर असणं हे मला एक स्वतःच वर्तमानपत्रं हे स्वतः चालवण्याचा आनंद देतं, आणि ह्याहून अधिक आनंदाची गोष्ट म्हणजे ह्या वर्तमानपत्राच्या नफातोट्याचा विचार मला करायची गरज नाही. हे ट्विट २०१२ सालातलं.
पण ट्रम्प हाच विचार २०२० च्या अखेरीस मांडतील का? तर उत्तर कदाचित नाही असं आहे. ट्रम्प ह्यांच्या अगोचरपणाला कंटाळून किंवा त्यांचं अध्यक्षपदाच कवच निघून गेल्यावर त्यांचं ट्विटर हॅन्डल बंद केलं जाऊ शकतं. अशावेळेस ८८ दशलक्ष फॉलोअर्सशी संवाद तुटणं ट्रम्प सहन करू शकतील? थोडक्यात सोशल मीडिया हे दुहेरी हत्यार बनलं आहे, आज त्याचा वापर करून तुम्ही रातोरात प्रसिद्ध व्हाल, यशस्वी व्हाल, सत्तेच्या पदांवर जाऊन बसाल पण हे शस्त्र तुमचा घात करणार हे निश्चित.
अरब स्प्रिंग असो की आपल्याकडची अण्णा हजारेंची आंदोलनं असोत आपण बदल घडवू शकतो, कोणालाही झुकवू शकतो ह्या भावनेने जगभरात इतका धुमाकूळ घातला की इथे सारासार विचारच नष्ट झाला. मग कधी झारखंडमध्ये मुलं पळवून नेली जात आहेत ह्या अफवेने घडलेल्या हत्या असोत की म्यानमारमध्ये रोहिंग्या मुस्लिमांविषयी व्हाट्सअप वरून पसरणाऱ्या अफवांमुळे झालेलं त्यांचं शिरस्त्राण असो अशा गोष्टींचं प्रमाण वाढत चाललं आहे. आणि ह्या सगळ्या अनियंत्रित गोंधळाला काही मोजकी मंडळी नियंत्रित करत आहेत. ते नव्या जगाचे नवे सूत्रधार आहेत.
आज परिस्थिती अशी आहे की ज्याला कोणाला सत्ताधीश व्हायचं असेल त्याला ह्याचा आधार घ्यावाच लागेल आणि त्याचा सत्तेचा शेवट ह्या सूत्रधारांमुळेच होणार आहे.
इंधन, सोनं, हिरे, जमीन ह्यांच्या मालकी हक्कावरून लढाया झाल्याचं आपल्याला माहीत आहे पण ह्या नव्या सूत्रधारांना ह्यातील कशाचंच आकर्षण नाहीये त्यांना हवी आहे तुमच्या-माझ्या आयुष्यातील प्रत्येक लहानसहान बाबींची माहिती आणि आपल्या विचारांवरचं नियंत्रण.
हे झालं खूप वरच्या पातळीवरचा सत्ता मिळवण्याचा आणि राजवटी उलथवण्याचा खेळ, ह्या खेळातील प्यादी जितकी हताश आहेत तितके हताश आपण सगळे देखील आहोत. तू फेसबुकवर नाहीस का व्हाट्स अप नाहीये का अशा प्रश्नांनी बेजार करून अधिकाअधिक माणसं ओढून आणण्यासाठी सगळेच जणं धडपड करत आहेत. आणि एकदा ह्या माध्यमांवर आलात की तुम्हाला देखील इन्फॉर्मेशन-ओबेसिटीच्या आजाराकडे थोडक्यात अति माहितीच्यामुळे येणारी मानसिक सुन्नता किंवा सूज ह्याकडे ढकलायला सुरुवात होते.
शाळा ऑनलाईन- काम बहुतांश ऑनलाईन- हातातील मोबाईल तुम्हाला स्वस्थ बसू देत नाही, हा मोबाईल बाजूला ठेवून कुठे जायचं ठरवलं तर एखादं ऍप तुमच्या मोबाईलमध्ये नाही म्हणून तुम्हाला अनेक ठिकाणी प्रवेश नाकारला जाऊ शकतो. स्मार्टफोन तुम्हाला सातत्याने जगाशी जोडलेले आहात ह्याचा भास देत राहणार आणि आपली माहिती चोरली जात आहे हे कळून देखील ह्यापासून दूर जाणं अशक्य आहे.
ह्यावर आता एकच मार्ग आहे म्हणजे जगभरातील कोट्यवधी जनतेने ज्यांनी हा सोशल मीडिया वाढवला, ताकदवान बनवला, तिच्या मालकांना जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती बनवलं त्या सोशल मीडियाच्या प्रचंड नफ्यात भागीदारीची मागणी करणं. हे फार अतिशयोक्तीपूर्ण वाटेल. पण जगभरात आपल्यारखे कोट्यवधी लोकं क्षणाक्षणाला अब्जावधी शब्द इथे लिहीत आहेत, छायचित्रं, चित्रफिती टाकत आहेत, गुगलवर आपल्यासारख्याच कोणीतरी ग्राहकाने लिहिलेल्या माहितीला वाचत आहेत आणि ते पाहणारे,वाचणारे कोट्यवधी लोकं म्हणजे पुन्हा आपणच आहोत. मार्क झुकरबर्ग असो की सर्जी बिन, लॅरी पेज किंवा जॅक डॉर्सी ह्यांनी फक्त एक फळा दिला आहे पण त्यावर व्यक्त आपणच होतोय म्हणून ह्या फळ्यांचं अस्तित्व आहे. ज्या दिवशी ह्या कंपन्यांच्या मालकांना आमच्यामुळे तुम्ही आहात आणि तुम्ही आम्हाला हवं तसं नियंत्रित करू शकत नाही हा संदेश दिला जाईल आणि त्याही पुढे जाऊन ह्या बलाढ्य कंपन्यांच्या नफ्यावर इथला प्रत्येक वापरकर्ता भागधारक म्हणून हक्क सांगू लागेल तेंव्हाच हे सूत्रधार आपल्याला नियंत्रित करणं बंद करतील. अन्यथा धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय ही अवस्था कायम राहणार.
Comments
Post a Comment