राज ठाकरेंनी जर शिवसेना सोडलीच नसती तर... 

१८ डिसेंबर २००५ ला म्हणजे बरोबर १३ वर्षांपूर्वी राज ठाकरेंनी शिवसेना सोडली. पण जर त्यांनी शिवसेना सोडलीच नसती किंवा समजा सोडली असती आणि त्यांनी किमान सक्रिय राजकारणातून सन्यास घेतला असता तर काय घडले असते?

तुम्हाला हा प्रश्न आत्याबाईंनी मिश्या असत्या तर काय झाले असते, असा वाटेल पण भविष्यवेधी गोष्टींचा विचार करताना आधी घडलेली गोष्ट घडली नसती तर काय झालं असतं ह्याचा विचार करून बघावाच लागतो. आणि हा विचार करताना, मुख्यतः राज ठाकरेंच्या शिवसेना सोडण्याबद्दल सामन्यांच्या मनातला मतप्रवाह काय आहे ह्याचा जर कानोसा घेतला तर दोन उत्तरं येतात
१) बाळासाहेबांच्या नंतर शिवसैनिकांनीच त्यांचं नेतृत्व राज ठाकरेंकडे सोपवलं असतं
२) सध्याची शिवसेनेची बिचारी अवस्था झाली नसती.
हे झाले दोन विचार जे राज ठाकरेंच्या शिवसेना सोडण्याभोवती फिरत असतात. म्हणजे शिवसैनिक नसलेल्याना देखील असं वाटत राहतं की राज ठाकरेंच्या व्यक्तिमत्वात शिवसेना नावाचा अंगार पुढे नेण्याची ताकद होती.

मराठ्यांचं साम्राज्य हे पार अफगाणिस्तान पर्यंत नेऊन टेकवणाऱ्या, आणि स्वातंत्र्य चळवळीची मुहूर्तमेढ मग ती आक्रमक विचारातून असो की क्रांतिकारी चळवळीतून असो,ती करणारा मराठी समाज हा आक्रमक आहे आणि लढवय्या आहे. पण जसे टिळक गेले आणि महात्मा गांधींनी स्वातंत्र्य चळवळीचं केंद्र पुण्यातून दिल्लीत हलवलं तसं हा समाज निष्प्रभ भासू लागला. तो जवळपास ७० च्या दशकापर्यंत, म्हणजेच बाळासाहेबांच्या उदयापर्यंत.
शिवसेनेचा राडा असायचा जो बहुतांशवेळेला टोळी युद्धासारखा भासायचा, पण राज ठाकरेंनी खळ्ळ खट्याक आणलं पण त्याला त्यांनी टोळी युद्धाचं स्वरूप येऊ दिलं नाही. मनसेचे टीकाकार सुद्धा हे मान्य करतील त्यांचं खळ्ळ खट्याक हे कधीही व्यक्तिगत फायद्यासाठी नसतं. राज ठाकरेंनी मराठी मनांना त्यांच्यातल्या आक्रमकतेचा ओळख एका वेगळ्या पद्धतीने करून दिली.

लोकं म्हणतील की राज ठाकरे हे शिवसेनेत राहिले असते तरी हे करूच शकले असते की. उत्तर ठाम नाही असंच येतं. कारण २००४ च्या निवडणुकांनंतर बाळासाहेबांचा सक्रिय वावर हळूहळू कमी होऊ लागला होता, आणि कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी शिवसेना 'बनचुकी' करायला सुरुवात केली होती. राज ठाकरेंच्या एक्झिट नंतर ती त्यांनी अधिक वेगाने 'बनचुकी करायला सुरुवात केली ती इतकी शिवसेनेचा भगवा रंग देखील फिका वाटू लागला आणि वाघ बिचारा वाटू लागला. शिवसेनेने आक्रमकता आणि तरुण नेतृत्व ह्यांचं खच्चीकरण किती पद्धतीशीर सुरु केलं आहे हे बघायचं असेल तर राज्यातल्या मंत्रीमंडळाकडे बघा, लोकांच्यातुन निवडून न येऊ शकणाऱ्यांना मंत्री बनवणे आणि ते सुद्धा एखादा अपवाद वगळता शरीराने आणि मनाने थकलेले. ४५ वर्षाच्या तरुण मुख्यमंत्र्याच्या मंत्रिमंडळात आपण निवृत्तीकडे आलेले चेहरे देतोय ह्याचं भान उद्धव ठाकरेंना नव्हतं असं नाही पण त्यांनी ते मुद्दामून केलं कारण आदित्य ठाकरेंच्या वाटेत कोणताही अडथळा नको. आणि आदित्य ठाकरेंनी पण महागड्या गाड्यातून फिरणाऱ्या आमदार, खासदारांची मुलं किंवा अति श्रीमंत मुलांचा क्लब हा युवासेना म्हणून घोषित केला.

राज ठाकरेंनी २००६ साली पक्ष स्थापन केला तेंव्हा कोणतीही राजकीय ओळख नसलेल्या, काका, मामा राजकारणात नसलेल्याना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, त्यांच्यातले अनेक जण नगरसेवक झाले, काही आमदार झाले. आणि अनेक आंदोलनातून सोशल मीडियावर का होईना पण हिरो झालेत तर किमान काही होर्डिंग्सवर झळकलेत. जर राज ठाकरे शिवसेना सोडून बाहेर नसते पडले तर हे शक्य नसतं झालं आणि हजारो जणं आयडेंटीटी क्रायसिस मध्ये जगत राहिले असते हे नक्की.

स्वातंत्र्योत्तर भारतात मराठी राजकारण्याचं नाव सर्वदूर असण्याचं भाग्य चौघांच्याच वाट्याला आलं ज्यात बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार आणि प्रमोद महाजन.
त्यात शरद पवारांनी अगदी संरक्षण खातं भूषवून देखील ते जितके राष्ट्रीय स्तरावर पोहचले नाहीत तितकं त्यांना बीसीसीआय ने नेलं, प्रमोद महाजनांना सत्तेचं वलय होतं पण राज ठाकरेंकडे ह्यातलं काहीच नाही. ते सत्तेत नाहीत, इतक्या लवकर सत्तेच्या बेरीज वजाबाकीत येण्याची शक्यता नाही, त्यांना क्रिकेट अथवा सिनेमा असा कोणताही आधार घ्यावा लागला नाही. त्यांनी त्यांच्या आक्रमकतेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मराठी माणूस आणि स्वतःला चर्चेच्या केंद्रस्थानी आणलं. प्रादेशिक अस्मितेचं कौतुक उत्तरेलातल्या राज्यांना नसेल पण दक्षिणेत ते नक्की आहे आणि मराठी अस्मितेचं जे कौतुक दक्षिणेत सुरु आहे ते राज ठाकरेंनी शिवसेना सोडली नसती तर शक्यच नव्हतं

राज ठाकरेंनी शिवसेना सोडून, स्वतःचा पक्ष स्थापन करून मराठी राजकारणाला एक झणझणीत तडका दिला हे मान्य करावं लागेल. राज्याच्या राजकरणात त्यांनी पाचवा खांब आणला, जो इतर चार खांबांना काहीही भूमिका घेताना ह्या पाचव्या खांबाकडे बघायला भाग पाडतो. राज ठाकरे जर बाहेर पडले नसते तर ह्या चार पक्षांनी एक लिंब झेलू बाई दोन लिंब झेलू पद्धतीचं साचेबद्ध राजकारण पुढे ठेऊन सत्ता एकमेकांच्यात वाटून घेतली असती.

हे थोडसं अतिशयोक्तीपूर्ण वाटेल पण राज ठाकरे नावाचा फोर्स नसता तर कदाचित ४५ वर्षाच्या तरुणाला मुख्यमंत्रीपदी बसवण्याचं धाडस भारतीय जनता पक्षाने केलंच नसतं, कारण राज ठाकरेंमुळे सकारात्मक असो अथवा अन्य कसंही पण मराठी तरुणाचं राजकारणाकडे लक्ष गेलं होतं.  तरुण मुख्यमंत्र्यांनी जर भाजपला काँग्रेससारखं निवडणुका जिंकण्याच मशीन बनवलं नसतं तर राज ठाकरे हा फोर्स स्लो झाला असता पण भाजपचं काँग्रेसीकरण करण्याच्या नादात राज ठाकरे, पर्यायाने मराठी अस्मितेचं राजकारण कणाकणाने का होईना टोकदार होतंय.

जर पहिल्या महायुद्धानंतर जर जर्मनीवर जाचक अटी लादल्या नसत्या तर कदाचित हिटलरचा उदय झाला नसता आणि कदाचित दुसरं महायुद्द झालं नसतं. पण हिटलर चूक, वाईट, ह्याच्या पलीकडे जाऊन बघितलं तर एक मान्य करावं लागेल दुसऱ्या महायुद्धाने युद्धपिपासू आणि साम्राज्यवादी युरोप सहिष्णू झाला. राजीव गांधीची हत्या झाली नसती तर काँग्रेसला बिगर गांधी पंतप्रधान म्हणजे काय हेच कळलं नसतं, तसंच राज ठाकरेंनी शिवसेना सोडली नसती तर देशव्यापी मराठी नाव पोहचलं नसतं, हजारो तरुण राजकीय अवकाशात वावरले नसते, प्रस्थापित राजकीय पक्षांना पुनर्र्चना करावी लागली नसती आणि मराठी अस्मिता विरून गेली असती.

शिवसेना सोडल्यानंतरचे राज ठाकरे हे फक्त ह्या बदलांचे catalyst ठरतात की त्याचा त्यांना फायदा होतो हे येणारा काळ ठरवेल पण त्यांच्या शिवसेना सोडली नसती तर हे बदल घडलेच नसते हे निश्चित.
ketanalytics

Comments

Popular posts from this blog

तर्कबुद्धीचा उतारा

ट्रम्प आणि देशीवाद

मराठी जगाची खिडकी युट्युब व्हावी