कृपया ह्यांना माफ करा
सॅमसंग ह्या दक्षिण कोरियन उद्योगसमूहाचे अध्यक्ष ली जे यंग हे सध्या भ्रष्टाचार आणि लाच देणे ह्या आरोपांखाली जेल मध्ये शिक्षा भोगत आहेत. फोर्ब्सच्या जगातील सर्वाधिक शक्तिशाली लोकांच्या यादीतील हा मानकरी, पण त्याला सुद्धा शिक्षा होऊन जेलमध्ये जाण्याची वेळ येऊ शकते, हे वाचून दक्षिण कोरियात कायद्याची बूज कशी राखली जाते असं आपल्याला वाटू शकेल. पण तसं नाहीये. सॅमसंग समूहाच्या अध्यक्षाला जेलमध्ये रहावं लागतंय ह्याचं दुःख दक्षिण कोरियन उद्योग जगताला पण आहे आणि तिथल्या व्यवस्थेला पण. कारण सॅमसंगची अफाट आर्थिक ताकद.
जवळपास २००बिलियन डॉलर्सचा व्यवसाय करणाऱ्या सॅमसंग समूहात, जरी 'सॅमसंग टेलिकम्युनिकेशन', 'सॅमसंग मेडिसन' सारख्या काही कंपन्या असल्या तरी ह्या समूहाची मानांकित कंपनी म्हणजे 'सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स'. ८८ बिलियन डॉलर्सची गंगाजळी घेऊन बसलेली ही कंपनी दक्षिण कोरियन अर्थव्यवस्थेचा कणा आहे. देशातून होणाऱ्या एकूण निर्यातीपैकी जवळपास २५% निर्यात ही एकट्या सॅमसंगची असते.
जगातल्या कुठल्याही देशात असते तशीच स्थिती दक्षिण कोरियात पण आहे. काही मोजक्या अतिबलाढ्य उद्योगसमूहांच्या/कुटुंबांच्या हाती देशाची जवळपास सगळी सूत्र आहेत आणि अर्थव्यवस्थेच्या नाड्या देखील. दक्षिण कोरियात त्यांना 'चेबोल' असं म्हणतात. ह्या चेबोल बद्दल सामान्य दक्षिण कोरियन नागरिकांच्या मनात प्रचंड राग आहे पण त्या रागाला भीक घालण्याची सरकारची ना इच्छा आहे ना मानसिकता. कारण ह्या 'चेबोल'मधल्या काही महत्वाच्या कंपन्या म्हणजे 'सॅमसंग' 'हुंदाई' 'एलजी' 'किया मोटर्स' आणि एसके ग्रुप. ह्या खऱ्या अर्थाने बहुराष्ट्रीय कंपन्या आणि ह्या कंपन्यांच्या जीवावरच दक्षिण कोरियाची अर्थव्यवस्था उभी आहे. ह्यातल्याच सॅमसंगच्या ५२ वर्षीय अध्यक्षाला 'ली जे यंग' ना लाच दिल्याच्या आरोपाखाली जेल मध्ये जावं लागतं म्हणून दक्षिण कोरियातील उद्योगजगतच नव्हे तर अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स पण अश्रू ढाळत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की ज्या आरोपाखाली 'ली जे यंग'ना अटक केली आहे त्यात शिक्षा म्हणून जेल मध्ये टाकणं आणि ते देखील २.५ वर्षांसाठी हे जरा अतीच होतं. आणि अति का? तर ही कंपनी दक्षिण कोरियाची अर्थव्यवस्था चालवते, परकीय गंगाजळी वाढवते, त्यामुळे अशा छोट्या पातकांकडे दुर्लक्ष करा.
सध्याचे दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत, 'मून-जे-इन'. त्यांच्या आधीच्या राष्ट्राध्यक्षा 'पार्क गुन' ह्यांच्या एका निकटवर्तीयाला 'ली जे यंग' ह्यांनी जवळपास २६० कोटी रुपयांची लाच देऊन सॅमसंग समूहातील दोन कंपन्यांच्या विलनीकरणाला राष्ट्राध्यक्षांनी मदत करावी ह्यासाठी प्रयत्न केले गेले असा आरोप आहे.
पार्क गुन ह्यांच्या निकटवर्तीय असलेल्या चोई-सून-सी ह्या बाईंच्या एका संस्थेला त्यांनी २६० कोटींची देणगी दिली आणि त्या आरोपाखाली आधीच्या राष्ट्राध्यक्षा 'पार्कगुन' आणि चोई-सून-सी ह्या दोघीना शिक्षा ठोठावली आहे.
लाच देणारा आणि लाच घेणारा हे दोघेही अटकेत आहेत पण दक्षिण कोरियन उद्योग जगाची आणि अमेरिकन उद्योग जगाची म्हणजे अर्थात अमेरिकन सरकारची इच्छा आहे लाच देणाऱ्याला म्हणजेच 'ली जे यंग' ह्यांना दक्षिण कोरियन राष्ट्राध्यक्षांनी उदार मनाने माफी देऊन टाकावी कारण त्यात अमेरिका आणि युरोपचं हित दडलेलं आहे.
सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स अमेरिकेत सुरु होणाऱ्या 'सेमीकंडक्टर' च्या प्रकल्पात १७ बिलियन डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. तिथे आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग बनलेल्या 'मायक्रोचिप'चं अजस्त्र प्रमाणावर उत्पादन होणार आहे.
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन ह्यांना मायक्रोचिपचं महत्व पटवून देण्यातअमेरिकन उद्योग जगत यशस्वी ठरलं आणि मे २०२१ मध्ये झालेल्या दक्षिण कोरियन राष्ट्राध्यक्ष आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ह्यांच्या झालेल्या भेटीत ह्या सेमीकंडक्टर प्रकल्पाची रीतसर चर्चा झाली, काय सवलती द्यायच्या हे ठरलं आणि दक्षिण कोरियन अध्यक्षांना जाता जाता सुचवलं गेलं की, देऊन टाका माफी 'जे वाय ली' (हे त्यांचं माध्यमातील नाव) ह्यांना, कारण हा माणूस ज्या कंपनीचा मालक आहे ती कंपनी कामाची आहे.
इतर ठिकाणी एखाद्या देशात कायद्याची बूज राखली जात नाही म्हणून आसवं गाळणारी अमेरिका स्वतःच्या फायद्यासाठी दक्षिण कोरियातील कायद्याने शिक्षा केलेल्या एका गुन्हेगाराला सोडवा म्हणून मागे लागली आहे कारण त्यांचा जीव अडकला आहे 'सेमीकंडक्टर' च्या व्यवसायात.
मोबाईलपासून ते अगदी कार, वॉशिंग मशीन पर्यंत कुठल्याही उपकरणात लागणारी मायक्रो चिप, त्याचं सर्वाधिक उत्पादन होतं आशियाई देशांमध्ये.
त्यातली जगातील सर्वात बलाढ्य कंपनी आहे 'तैवान सेमीकंडक्टर मॅनुफॅक्चरिंग'. ऍपल हा ह्या कंपनीचा सगळ्यात मोठा ग्राहक. मागच्या वर्षी२०२० मध्ये कोरोनाचा झटका जगाला बसत असताना मायक्रोचिप्सचा तुटवडा जगातील बहुसंख्य कंपन्यांना बसला आणि इतक्या महत्वाच्या घटकाचा पुरवठा हा आशियाई देशांवर अवलंबुन ठेवायचा हे अमेरिकन उद्योग जगातला मान्य नाही. त्यामुळे एका बाजूला सॅमसंग तर दुसरीकडे 'तैवानसेमीकंडक्टर मॅनुफॅक्चरिंग' आणि इंटेलला एकत्र यायला लावून दोन्ही कंपन्यांना अमेरिकेत मायक्रोचिपचं उत्पादन करायला लावलं जात आहे.
हे प्रकल्प सुरु होणं अमेरिकेसाठी अत्यंत महत्वाचं आहे कारण चीनने ह्या स्पर्धेत अमेरिकेला जेरीस आणलं आहे. आज स्वस्त चिनी मोबाईल कंपन्यांनी भारतीय उपखंडाची बाजारपेठ काबीज करायला सुरुवात केली आहे. हे चीनला हे शक्य होतं कारण मायक्रोचिपच्या उत्पादनावर त्यांची असलेली पकड.
अमेरिकन उद्योगसमूहांना मायक्रोचिपचा, गाड्यांसाठी बॅटरीजचा मुबलक पुरवठा झाला की अमेरिकन सरकारचे प्रयत्न सार्थकी लागतील आणि त्यात जर उत्पादन अमेरिकेत होणार असेल आणि त्यातून स्थानिक अमेरिकनांना नोकऱ्या मिळणार असतील तर जो बायडेन ह्यांच्यासाठी सोने पे सुहागाच आहे.
ह्यासाठी 'जे वाय ली' ह्यांच्यावरील लाचखोरीचे आरोप हे तमाम अमेरिकन आणि कोरियन उद्योग जगासाठी किरकोळ आहेत कारण त्यांच्या मते व्यापार आणि त्यातून होणारा फायदा महत्वाचा.
आणि मुळात भारत असो की दक्षिण कोरिया काही अतिमहत्वाच्या माणसांना मिळणारी वागणूक ही सामान्यांना मिळणाऱ्या वागणुकीपेक्षा विशेष असतेच. सध्या 'जे वाय ली' हे जेल मध्ये बसून सॅमसंग समूहाचा कारभार हाकत आहेत. सॅमसंग समूहाचे संस्थापक 'ली ब्यून्ग चूल' ह्यांनी १९३८ साली सॅमसंग कंपनीची स्थापना केली.
ट्र्कच्या व्यवसायातून ह्या कंपनीची सुरुवात झाली. दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियात १९५० साली सुरु झालेल्यायुद्धात 'ली ब्यून्ग चूल' ह्यांनी चांगलेच हात धुवून घेतले. 'ली ब्यून्गचूल' ह्यांना हे युद्ध खूपच फळफळलं. 'ली ब्यून्गचूल' आणि त्यांचा मुलगा 'ली कुन्ह ही' ह्यांच्यावर पण गैरव्यवहारांचे, करचोरीचे आरोप झाले पण दोघांना कधी शिक्षा नाही झाली.
'जे वाय ली' हे इतके नशीबवान तरी नसावेत किंवा आजोबा आणि वडिलांइतके चलाखन सावेत. त्यामुळे त्यांना २०१७ ला अटक झाली आणि ५ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. पुढे १ वर्ष शिक्षा भोगून त्यांची जामिनावर सुटका झाली आणि २०२०मध्ये पुन्हा खटला सुरु झाला.
त्यांची शिक्षा ५ वर्षांपासून कमी करून २.५ वर्ष करण्यात आली. तेंव्हापासून 'जे वाय ली' जेल मध्ये आहेत. पण त्यांना जेल मधून सोडावं म्हणून प्रचार यंत्रणा व्यवस्थित कामाला लागल्या आहेत. जनमानसाचाच कौल आहे असं मून जे इन ह्यांना भासवता यावं इतपत आवाज निर्माण झाला आहेच, आणि बाकी रोकड्या व्यवहाराच्या गोष्टी समजून सांगायला दक्षिण कोरियन उद्योग जगत आहेच.
येत्या काही महिन्यात 'जे वाय ली' ह्यांना उदार मनाने माफी दिली जाईल. दक्षिण कोरियन अध्यक्षांना तसं ह्या माफीच वावडं नाही कारण त्यांच्या पूर्वसुरींनी हुंदाई पासून अनेक उद्योगसमूहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना असंच उदार मनाने माफ केलं आहे. आणि हो, दक्षिण कोरिया कोव्हीड लशींच्या पुरवठयासाठी अमेरिकेकडे डोळे लावून बसली आहे. कोव्हिडची लस ही एखाद्या देशाला कशी जेरीस आणू शकते ह्याचा प्रत्यय आपल्याला सध्या येतोय. त्यामुळे अमेरिकेकडून लसीचा पुरवठा सुरळीत हवा असेल तर तत्वाच्या गोष्टी रेटत राहणं दक्षिण कोरियन अध्यक्षांना परवडण्यासारखं नाही आणि अर्थात तशी इच्छा पण नाही.
त्यामुळे यथावकाश लाच देण्याच्या आरोपाखाली अटकेत असलेले 'जे वाय ली' ह्यांना माफी मिळणार आणि ते पुन्हा एकदा अमेरिकन बिझनेसमासिकांच्या मुखपृष्ठावर झळकणार. त्यांच्या व्यवस्थापन कौशल्याच्या चर्चा सगळीकडे करवल्या जाणार आणि हे होत असताना त्यांच्यावरील आरोपांचा सोयीस्कर विसर सगळ्यांना पडणार,
कारण व्यापार महत्वाचा...
#Samsung #Capitalism #Business #USA #JYLEE #JOE_BIDEN #Power #Microchips #Taiwan #China
Comments
Post a Comment