द वर्ल्ड अहेड -२०२२ :- द इकोनॉमिस्टची भाकितं :- भाग १

 'द इकॉनॉमिस्ट' हे जगातल्या बौद्धिक वर्तुळात दबदबा राखणारं पब्लिकेशन. १८४३ ला इंग्लंडमध्ये जेम्स विल्सन ह्या व्यावसायिकाने सुरु केलेलं हे पब्लिकेशन. आज जगात ५० लाखाहून अधिक लोकं हे प्रिंट किंवा डिजिटल स्वरूपात वाचतात. इकॉनॉमिस्ट दर वर्षाच्या सुरुवातील 'वर्ल्ड अहेड' नावाची एक सिरीज चालवतात. ज्यात पुढचं वर्ष जगात काय काय घडू शकतं ह्याचा एक अंदाज सादर करतात. आणि असं म्हणतात की त्यांचे आराखडे शक्यतो चुकत नाहीत. (अर्थात द इकॉनॉमिस्ट मध्ये २१% शेअर्स हे रॉथशिल्ड फॅमिलीचे आहेत त्यामुळे जगाच्या नियंत्रकांची गुंतवणूक असलेल्या पब्लिकेशनचे अंदाज चुकतील कसे म्हणा. अर्थात हा गमतीचा भाग. ) 

तर दरवर्षीप्रमाणे २०२२ मध्ये जगात वेगवेगळ्या क्षेत्रांत काय काय घडेल ह्याची जवळपास १५० लाखांची मालिका त्यांनी प्रसिद्द केली आहे. रोज एक विषयातले लेख वाचून त्यातला काही भाग तुमच्यापर्यंत शेअर करावा असं वाटून गेलं. तुमच्यापैकी जे 'द इकॉनॉमिस्ट' वाचत असतील त्यांचं ठीक आहे पण ज्यांना हे वाचायला शक्य नाही त्यांच्यासाठी हा लेखप्रपंच. दर काही दिवसांनी एक एक विषयातले द इकॉनॉमिस्टने मांडलेले अंदाज तुमच्यासमोर ठेवेन. पुढे त्याप्रमाणे घटना घडल्या तर मला जरूर टॅग करा. मजा येईल. तर सुरुवात करूया.... 


१४ व्या शतकात युरोपची जवळपास १/३ लोकसंख्या प्लेगने मृत्युमुखी पडली आणि त्यामुळे तेंव्हाच्या जमीनदारांना शेतावर काम करणारे हातांची चणचण भासू लागली आणि त्यातून शेतमजुरांना अधिक चांगल्या सुविधा आणि थोडक्यात माणुसकीची वागणूक मिळायला सुरुवात झाली. 

१९१८ च्या फ्ल्यूने भारतात जवळपास १ ते १.२५ करोड मृत्युमुखी पडले तर जगभरात ३० कोटीहून मृत्युमुखी पडले. मृत्यूच्या या थैमानानंतर भारतात स्वातंत्र्य चळवळ वेग धरू लागली आणि पुढे ह्या चळवळीत गांधीजींचं नेतृत्व उदयाला आलं. त्याच दरम्यान तिकडे रशियामध्ये क्रांतीला सुरुवात झाली आणि रशियन झारशाहीचा अंताला सुरुवात झाली. कोव्हिडच्या लाटा जगभरात यायला लागल्यापासून अनेक देशांमध्ये राजकीय अस्वस्थता वाढू लागली आहे... 


एकतर कोव्हिडमुळे आलेल्या निर्बंधांमुळे जगात कुठेच सोशल गॅदरिंगला परवानगी नाही. त्यामुळे अस्वस्थता वाढायला लागली आहे. आपल्याला घरात डांबून ठेवण्याचा सरकारला अधिकार कोणी दिला हा प्रश्न सतावू लागला आणि त्यात जगातल्या जवळपास प्रत्येक देशाची सार्वजनिक आरोग्यव्यवस्था किती पोकळ आहे हे उघड झालं आणि संताप अधिक वाढला. त्यात लॉकडाउन्समुळे रोजगार गमावलेले आणि लस मिळू न शकलेले जगातल्या अनेक देशांचे सामान्य नागरिक ह्या सगळ्यांच्या मनात संघर्ष सुरु झाला आहे. काही देशांमध्ये तो उघडपणे रस्त्यावर प्रकट झाला तर काही ठिकाणी घुसळण सुरु आहे. दक्षिण आफ्रिकेत पॅनडेमिकमुळे जॉब गेलेले रस्त्यावर उतरलेत. बेलारूस, थायलंडसारख्या देशांमध्ये सार्वजनिक आरोग्य व्यवस्था इतकी ढिसाळ का हा प्रश्न घेऊन नागरिक रस्त्यावर आलेत. ब्राझीलमध्ये जायर बोल्सनरो ब्राझीलयन अध्यक्ष तर डोनाल्ड ट्रम्प ह्यांचा भाऊ शोभावा इतका चक्रम आणि हुकूमशाही प्रवृत्तीचा. मास्कला विरोध पासून ते लशीलाच विरोध ते पूर्णपणे अस्ताव्यस्त झालेली आरोग्य व्यवस्था ह्यामुळे ब्राझीलमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या प्रचंड आणि त्यातून प्रचंड असंतोष लोकांच्या मनात आहे. तिकडे येत्या ऑक्टोबरमध्ये निवडणुका आहेत आणि जायर बोल्सनरोने आधीच घोषित केलं आहे की तो अजिंक्य आहे आणि त्याला फक्त देवच हरवू शकतो. इकॉनॉमिस्टचा अंदाज आहे की जर ह्या बोल्सनरोचा पराभव झाला तर अमेरिकेत कॅपिटल हिलवर ६ जानेवारी २०२१ ला जो धुडगूस घातला तसा धुडगूस बोल्सनरोचे समर्थक घालू शकतील. केनियाची अर्थव्यवस्थाच टुरिझमवर ती पार उध्वस्त झाली त्यामुळे बेरोजगारांचे तांडे सरकारविरोधात आक्रोश करत आहेत. आशियातल्या फिलिपिन्समध्ये विद्यमान अध्यक्ष रॉड्रिगो ड्यूरट्रेटनी ड्रग्स व्यवसायातील आरोपी/ संशयित ह्या नावाखाली हजारो लोकांची हत्या केली आणि कोव्हीड परिस्थितीकडे पार दुर्लक्ष केलं. त्यामुळे फिलिपिनो आतून धुमसतोय. तिकडे मे महिन्यात निवडणुका आहेत. त्यात रॉड्रिगो ह्यांचा पराभव अटळ आहे. 


जगभरात राष्ट्रवाद डोकं वर काढेल असा अंदाज आहे. आणि राष्ट्रवादाची अतार्किक मांडणी करणारी नेतृत्व उदयास येतील असा अंदाज आहे. अमेरिकेत तर २०२४ च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार असणार असा सगळ्यांचाच अंदाज आहे. हंगेरीत व्हिक्टर ओब्रोन हा हुकूमशाह फेकला जाईल आणि त्या भीतीने त्याने आत्तापासून स्थलांतरित आणि ज्यू समाजाला टारगेट करायला सुरु केलं आहे. त्यातल्या त्यात फ्रान्समध्ये इम्युनल मॅक्रोन काठावर बहुमत राखेल असा अंदाज इकॉनॉमिस्टचा आहे. हाच काय तो दिलासा. थोडक्यात जिथे जिथे असंतोष निर्माण होईल तिथे तिथे तिथले राज्यकर्ते ते विरुद्ध आपण अशी द्वेषाची मांडणी करणार. 


इकोनॉमिस्टचा एक फारच आनंददायी अंदाज म्हणजे ह्या वर्षी कोव्हीड उतरणीला लागेल आणि तो रुटीन ताप खोकल्याच रूप घेईल, हे सगळं जगभरात मोठ्याप्रमाणावर लस दिली गेली असेल आणि त्यामुळे निर्माण झालेली इम्युनिटी हे मुख्य कारण असेल. अर्थात ही इम्युनिटी निर्माण करताना जगाने त्याची प्रचंड किंमत मोजली. ओमिक्रोन आणि RHO व्हेरियंटमुळे मृत्यूचा धोका कमी असेल असा अंदाज आहे. अर्थात इकॉनॉमिस्टने अगदी सट्ली सांगितलं आहे की बूस्टर डोस पुढची अनेकवर्ष बोकांडी बसणार आहेत. 


अमेरिका आणि चीन ह्या सद्य स्थितीतील जागतिक महासत्ता. ह्यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होईल. ह्या वर्षी फेब्रुवारीमध्ये चीनमध्ये हिवाळी ऑलिंपिक्स आहेत. अनेक देश ह्या ऑलिम्पिक्सवर बहिष्कार टाकण्याचा विचार करत आहे. जिनपिंग हे ह्या नोव्हेंबरमध्ये २० व्या काँग्रेसमध्ये त्यांची अध्यक्षपदाची टर्म दीर्घकाळ राहील ह्याची तजवीज करून घेतील. तर जो बायडेन हे मिडटर्म इलेक्शन्सना सामोरे जातील. मिडटर्म इलेक्शन्समध्ये सत्ताधारी कधीच बरी कामगिरी करत नाहीत हा इतिहास आहे आणि जो बायडेन ह्यांच्या बाबतीत तर शक्यता कमीच आहे. आणि डेमोक्रॅट्सना २०२४ मध्ये ट्रम्पचा हल्ला झेलायचा आहे त्यामुळे बायडेनना कितीही वाटलं तरी चीनला डोळे वटारुन, अमेरिकेच्या दंडातील बेटकुळ्या दाखवून अमेरिकन मतदारांना गुदगुल्या कराव्याच लागतील. अर्थात इकॉनॉमिस्टचा अंदाज असा पण आहे की जिनपिंग आणि बायडेन एकमेकांवर कितीही गुरगुरले तरी व्यापाराच्या आघाडीवर दोघेही सामंजस्याची भूमिका घेतील. एव्हनग्राड सारखी बलाढ्य कंपनीचे पाय लटपटू लागल्यामुळे जिनपिंग किमान व्यापार युद्ध तरी भडकू देणार नाहीत असा अंदाज आहे. बाकी चीन २०२४ ला ट्रम्प परत येतील हा अंदाज बांधून त्यांचं धोरण आखायला सुरु करत आहे. 


थोडक्यात घुसळणीच वर्ष असणार आहे हे नक्की.... 

इकॉनॉमिस्टने अजून एक इंटरेस्टिंग टर्म आणली आहे ती म्हणजे जगभरात २०२० पासून 'कॅन्सल कल्चर' वाढीस लागलं. अगदी आपल्या आधी ठरवलेल्या ट्रीपपासून ते मोठ्या लग्नांपर्यंत ते नाटक प्रयोगापर्यंत अनेक गोष्टी कॅन्सल झाल्या.अनेक खेळांच्या स्पर्धा पुढे ढकलल्या गेल्या.  


२०२२ मध्ये पण हे कॅन्सल कल्चर टिकून राहील किंवा तशा मागण्या होत राहतील असा इकॉनॉमिस्टचा अंदाज आहे . वर म्हणल्याप्रमाणे २०२२ च्या चीनमधल्या हिवाळी ऑलिंपिक्सवर जगात अनेक देश बहिष्कार घालतील, अर्थात ह्याला कारण चीन ughyaar समूहावर चीनने केलेले अत्याचार. पण तरीही एखाद्या देशाची अर्थव्यवस्था धुळीस मिळवणारे ऑलिंपिक्स भरवावेत का? माणसाच्या सर्वोच्च शारीरिक आणि मानसिक शक्तीच प्रदर्शन जगाला व्हावं ही भावना योग्य पण त्यासाठी इतका खटाटोप करावा का असा एक मतप्रवाह आहे...  कतारने २०२२ च्या फुटबॉल वर्ल्डकपच्या आयोजनाचा मान मिळवण्यासाठी लाच दिली त्यामुळे खेळाच्या मूळच्या प्रेरणेलाच धक्का बसला आहे त्यामुळे फुटबॉल वर्ल्डकप रद्द व्हावा अशी मागणी होत आहे. 

हे झालं जागतिक पातळीवर.. ऑफिसेसमधले ड्रेसकोड रद्द झाले, इन्टर्नशिपच्या नावाखाली फुकट राबवून घेणं थांबलं, झूम मिटींग्स आल्या पण ऑफिसमधल्या पूर्वीच्या मीटिंग्सच्या मागे होणाऱ्या मिटींग्स थांबल्या आणि त्या आता कायमच्या थांबाव्यात अशी अनेकांची इच्छा आहे. पॅरेण्ट टीचर मिटिंग नावाचा त्रासदायक प्रकार थांबल्यामुळे पालकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. अशा कॅन्सल झालेल्या आणि कॅन्सल व्हाव्यात अशा गोष्टींची यादी इकोनॉमिस्टने दिली आहे...

Image Courtesy :- The Economist. 
इकॉनॉमिस्टचं म्हणणं आहे की लोकांनीच काय काय कायमचं रद्द व्हावं, थांबवावं हे रेटून धरण्याचा काळ सुरु झाला आहे. 


तर... पुढच्या भागात आशियात काय घडेल ह्याचा द इकोनॉमिस्टचा अंदाज...  

#TheEconimist #WorldAhead #America #China #TradeWar #Trump #2022NewYear 




Comments

Post a Comment

Popular posts from this blog

तर्कबुद्धीचा उतारा

ट्रम्प आणि देशीवाद

मराठी जगाची खिडकी युट्युब व्हावी