वर्ल्ड अहेड २०२२:- आफ्रिका
वर्ल्ड अहेड २०२२:- आफ्रिका
(Image Courtesy :- AFP and Economist)
मानव जातीचा पाळणा जिथे हलला थोडक्यात मानवी अस्तित्वाचे सगळ्यात जुने अवशेष जिथे सापडले ती जागा सफार, दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्गपासून अंदाजे ५० किमोलमीटर अंतरावरची जागा. इथूनच पहिल्यांदा मानव हळहळू जगाच्या कानाकोपऱ्यात पसरला. ११.७ दशलक्ष स्क्वेअर मैल पसरलेला आफ्रिका खंड, आशिया खंडांनंतरचा आकाराने मोठा आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेला खंड. प्रचंड नैसर्गिक साधनसंपत्ती पण प्रचंड गरिबी आणि विषमता (inequality) असलेला खंड. आफ्रिका खंडातल्या जवळपास १० देशातून वाहणाऱ्या नाईल नदीच्या काठी आफ्रिकेतल्या इजिप्तमध्ये अत्यंत समृद्ध संस्कृती विकसित झाली.
पण ह्या आफ्रिका खंडाला युरोपियन्स देशांनी आणि पुढे कोल्ड वॉरच्या काळात रशिया आणि अमेरिका ह्या देशांनी पुरतं लुबाडलं आणि आता अर्थात चीनच्या कब्ज्यात अनेक आफ्रिकन देश जाऊ लागलेत. गुलामगिरी, शोषण आणि क्लायमेट चेंजचा सगळ्यात जास्त फटका ज्या खंडाला बसला तो आफ्रिका. जवळपास ५४ देश असलेला खंड. राजकीय अस्थैर्य, हुकूमशाही, भ्रष्ट राजवटी आणि सैनिकी राजवट हे अगदी कॉमन. १९६० ते १९८० ह्या काळात आफ्रिकेतील देशांमध्ये ७० हुन अधिक बंड झाली आणि तेरा राष्ट्राध्यक्षांची हत्या झाली. दोन देशांमधील सीमेवरून (बॉर्डर ) होणारे वाद तर अगदीच रोजचेच. कारण मुळात युरोपियन देशांनी त्यांच्या स्वार्थासाठी हव्या त्या पद्धतीने देशांच्या सीमा घोषित केल्या आणि खंडाचे तुकडे पाडले.
आफ्रिका खंडातील इथियोपिया देशात १९८३ ते १९८५ ह्या दोन वर्षात सगळ्यात भयानक दुष्काळ पडला आणि अंदाजे ह्या दुष्काळात १२ लाखहुन अधिक नागरिक मृत्युमुखी पडले. कॉंगो देशात सुरु असलेलं युद्ध जवळपास ३० वर्ष सुरू होतं आणि ह्यात ५० लाख नागरिक मृत्युमुखी पडल्याचा अंदाज आहे तर रवांडामध्ये झालेल्या नरसंहारात देखील १० लाख नागरिक मृत्युमुखी पडले. इतकं घडून देखील आफ्रिकेमधली परिस्थिती जैसे थे आहे.
इथिओपिया पुन्हा एकदा भीषण दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे. इथिओपियन सरकार आणि टायगॅरी पीपल'स लिबरेशन फ्रंट ह्यांच्यामध्ये रक्तरंजित युद्ध सुरु आहे. इथिओपियन सैन्याने जेंव्हा आपल्याच देशातील टायगॅरी भागातून माघार घेतली तेंव्हा इलेक्ट्रिसिटी बंद करून टाकली आहे. त्यामुळे जगाशी संपर्क आता शून्य आणि त्यात ह्या भागात भीषण दुष्काळ पडला आहे. ह्या भागाला किमान मदत पोहचवता यावी आणि ह्यात इथिओपियन सैन्याने अडथळे आणू नयेत म्हणून जगभरातील एनजीओजची आर्जवं सुरु आहेत. अर्थात हे फक्त इथिओपियामध्ये सुरु आहे असं नाही तर आफ्रिकेतील जवळपास १५ देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे. आणि फ्रांस आणि अमेरिका ह्यांना आता ह्या देशांमध्ये स्वारस्य उरलेलं नाही. अर्थात जेवढं लुटायच होतं ते लुटून झाल्यावर आता हे शहाणपण सुचलं आहे.
आफ्रिका खंडातील सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला देश म्हणजे नायजेरिया. इथे देशात दोन प्रकारची यादवी सुरु आहे. एका भागात बोको हराम ने ताबा घेतला आहे तर दुसऱ्या भागात सशस्त्र टोळ्या धुडगूस घालत आहेत. मोठ्या प्रमाणावर क्रूड ऑईलचे साठे असलेला हा देश पण सध्यातरी यादवीत गुंतला असल्यामुळे जर योग्य प्रमाणात तेल काढण्यात यशस्वी झालं तर ती आफ्रिका खंडातील एक मोठी अर्थव्यवस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नायजेरियाचं खरं आहे अन्यथा त्यांची अर्थव्यवस्था ह्या वर्षी पण गटांगळ्या खाईल असा अंदाज आहे.
आफ्रिकेतील अंगोला देशाची इकॉनॉमी पण तेलावर अवलंबुन आहे आणि क्रूड ऑईलचा किमती जितक्या वाढतील तितकी अंगोलाची अर्थव्यवस्था बळकट होईल पण हे करताना आफ्रिकेतल्या अनेक देशांना चीनने प्रचंड कर्ज देऊन ठेवली आहेत. ही कर्ज वेळेत नाही फेडली तर चीनने जसं श्रीलंकेतलं हंबनटोटा बंदर श्रीलंकेने कर्ज न फेडल्यामुळे ताब्यात घेतलं तसा ताबा उद्या अंगोलमधल्या तेल प्रकल्पावर चीन आणू शकते.
दक्षिण आफ्रिकेला कोव्हिडचा फटका बसला कारण कोव्हीडमुळे पर्यटन पूर्ण थांबलं आहे आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचा दुसरा कणा म्हणजे खनिज. पण बाकी ह्या दोनच्या पलीकडे कुठलाच विचार दक्षिण आफ्रिकेने न केल्यामुळे दक्षिण आफ्रिकेत मागच्या वर्षी लोकं रस्त्यावर उतरली आणि बंडाचा झेंडा फडकवला.
इकॉनॉमिस्ट मासिकाचा अंदाज असा की सध्या आफ्रिकेत चांगल्या आणि उदयाला येणाऱ्या अर्थव्यवस्था म्हणून कोणाकडे बघायचं असेल तर रवांडा, सेशल्स, घाना, आयव्हरी कोस्ट. कुठल्याही एका खनिज संपत्तीवर ह्या देशांच्या अर्थव्यवस्था अवलंबून नाहीत उलट त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर, टेलिकम्युनिकेशन ह्या क्षेत्रांत गुंतवणूक करून प्रगतीची स्वप्न पहायला सुरु केलीत.
हे जरी असलं तरी आज आफ्रिका खंडापुढे एक मोठी समस्या आहे ती म्हणजे कोव्हीडशी लढणारी व्हॅक्सीन्स जरी आपापल्या देशातील नागरिकांना द्यायची असतील तर त्यासाठी लागणारी आर्थिक ताकद ह्या देशांकडे नाही. आज जगात अनेक देशांमध्ये तिसरा डोस दिला जात असताना आफ्रिकेत अजून कित्येक ठिकाणी पहिला डोस पोहचला देखील नाही. कोव्हीडच्या लाटांनी आफ्रिका खंडातील अधिक अशक्त झालेली आरोग्यव्यवस्था पार कोलमडली आहे. अर्थात हे अगदी युरोपात पण घडलं फक्त त्यांच्याकडे पुन्हा उभं राहण्यासाठी रिसोर्सेस तरी आहेत.
आज आफ्रिका देशातील अनेक राष्ट्राध्यक्षांची एकमुखाने मागणी आहे की जगातल्या आर्थिकदृष्ट्या बलाढ्य राष्ट्रांनी किमान व्हॅक्सिनच्या बाबतीत तरी वाटप न्याय्य होईल अशी भूमिका घ्यावी.
हे अर्थात माझं मत. पण कोव्हिडने एक गोष्ट जगाला शिकवली आहे की एक पॅनडेमिक जगाला २,३ वर्ष खिळवून ठेवू शकतो आणि १० वर्ष मागे नेऊ शकतो. अशा वेळेला जगातील सगळ्या राष्ट्रांनी किमान आरोग्य व्यवस्था हा कॉमन अजेंडा घ्यावा. जशा क्लायमेट चेंजवरच्या जागतिक कॉन्फरन्सेस होतात तशा आरोग्यावरच्या आता व्हायला हव्यात. आणि समान दर्जाचं आरोग्य क्षेत्रातील इन्फ्रास्ट्रक्चर जगभरात उभं केलं पाहिजे. ह्यासाठी सध्याची वल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची व्यवस्था कितपत हे करू शकेल ह्या बद्दल शंकाच आहे. म्हणूनच एक नवी व्यवस्था जन्माला यायला हवी.
अन्यथा जगातल्या एका कोपऱ्यातल्या देशात जर एखादी साथ आली आणि ती देशाला जर ती आवरता नाही आली तर ती जगभर पसरणार आणि त्याची किंमत चुकवायला जग तयार आहे ?
#Africa #TheWorldAhead #Economist #Ethiopia #HumanRight #Famine #Congo #Vaccine #WHO #Ghana #SouthAfrica
Comments
Post a Comment