इकॉनॉमीस्ट आणि युरोपविषयीचे आडाखे 


६ फेब्रुवारी २०२२ ला इंग्लंडची राणी क्वीन एलिझाबेथ २ ह्यांच्या राणीपदाची ७० वर्ष पूर्ण होत आहेत. १९५२ साली जॉर्ज ह्या राणीच्या वडिलांच्या मृत्यूनंतर राणीच्या डोक्यावर मुकुट विराजमान झाला आणि आजतागायत तो कायम आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर वाताहात झालेला ब्रिटन आणि पुन्हा भारतासारखं ब्रिटिश साम्राज्यातील महत्वाचा देश गमावलेल्या काळात अवघ्या २५ वर्षांच्या एलिझाबेथ २ ह्यांच्या डोक्यावर हा राणीपदाचा मुकुट ठेवला गेला. हा मुकुट किती काटेरी असू शकतो ह्याची जाणीव नेटफ्लिक्सवरची 'क्राऊन' ही सिरीज ज्यांनी पाहिली असेल त्यांना येईल. 


तर.. क्वीन एलिझाबेथ २ ह्यांच्या राणीपदाची ७० वर्ष ह्या २०२२ मध्ये पूर्ण होणार आणि नेहमीप्रमाणे इंग्लंडमध्ये उत्साहात तो उत्सव साजरा होणार. टेलिव्हिजनच्या उदयापासूनच हे माध्यम राजघराण्याने आणि त्यांच्या सल्लागारांनी कसं हाताळायचं हे शिकून घेतलं. त्याचा फायदा असा की दृश्य आणि अदृश्यतेच्या सीमारेषेवर राहून स्वतःचा ब्रँड कसा जपायचा हे त्यांना नीट कळलं आहे. किती दिसावं आणि किती दिसू नये ह्याच काटेकोर प्लॅनिंग असल्यामुळे राणी एलिझाबेथ २ ह्यांच्या बद्दलचं कुतूहल आणि त्यांची लोकप्रियता आजही शिगेला आहे. पण ह्या राणीचं वय आता ९६ आहे आणि त्यांचा उत्तराधिकारी प्रिन्स चार्ल्स हा फारसा लोकप्रिय नाही. ब्रेक्झिटने इंग्लंडची बऱ्यापैकी वाताहत झाली आहे. जशी कोव्हिडची लाट ओसरेल तसं इंग्लंडला ब्रेक्झिटच्या निर्णयाचे आर्थिक फटके बसायला सुरु होतील. आजपर्यंत राणीच्या करिष्म्याने अनेकवेळा अनेक स्थित्यंतरात (transition) ब्रिटनला तारलं आहे पण पुढे हे किती काळ टिकेल हा प्रश्नच आहे. 


पुरवठ्यापेक्षा मागणी जास्त, जगभरात क्रूड ऑईलचा वाढलेल्या किंमती, आणि मुख्यतः इंग्लंडने युरोपातून येणाऱ्या खाद्यपदार्थांची सुरु केलेली काटेकोर तपासण्यांमुळे युरोपियन व्यावसायिक इंग्लंडला निर्यात करायला इच्छुक नाहीत. ह्याचा फटका महागाईच्या रूपात बसणार. अशा वेळेस बोरिस जॉन्सन ब्रेक्झिटचे फायदे किती काळ पटवू शकतील ह्याची उत्सुकता आहे. 


इंग्लंडचा अजून एक मानबिंदू बीबीसी. ब्रिटीश ब्रॉडकास्टींग सर्व्हिसने १४ नोव्हेंबर २०२२ ला पहिल्यांदा 2lo, Marconi House, London, calling.” अशी रेडिओवरून हाक दिली. त्याला ह्या नोव्हेंबरमध्ये १०० वर्ष पूर्ण होतील. बीबीसी हे पूर्णपणे स्वायत्त (कोणाच्याही नियंत्रणाला जुमानायची गरज नाही, सरकारकडून पैसा येत असला तरी... ) माध्यम आहे. ब्रिटिश राजघराण्याची प्रकरणं वेशीवर टांगणारं आणि कोणीही पंतप्रधान येऊ दे स्वतःचा निष्पक्षपणा न सोडणाऱ्या बीबीसीला अद्दल घडवायला बोरिस जॉन्सन ह्यांचे हात शिवशिवत आहेत. ब्रेक्झिट हा मूर्खपणा आहे अशी भूमिका बीबीसीने घेतली होती त्याचा राग जॉन्सन ह्यांच्या मनात आहे. मर्जीतला संपादक बसवता येईल का इत्यादी भारतात होणाऱ्या गोष्टी जॉन्सन ट्राय करत आहेत. अर्थात हे इतकं सोपं नाही. तसंच शंभरी पूर्ण करणाऱ्या बीबीसीपुढे नेटफ्लिक्सचं मोठं आवाहन आहे. आज इंग्लंडमधले अनेक चांगले निर्माते नेटफ्लिक्ससाठी कन्टेन्ट बनवायला उत्सुक आहेत आणि बीबीसीच्या आय-प्लेयर पेक्षा नेटफ्लिक्स अधिक पॉप्युलर आहे. बीबीसीला देखील कात टाकावी लागणार हे नक्की. 


फ्रान्समध्ये इमॅन्युएल  मॅक्रोन परत सत्तेत येतील असा अंदाज आहे. फ्रान्समध्ये पण सेमी ब्रेक्झिट सेंटीमेंट ह्या वर्षीच्या एप्रिलमधल्या निवडणुकीच्या निमित्ताने जन्माला घातला जातोय. अगदी ब्रेक्झिट इतक टोकाचं पाऊल नाही पण टेक बॅक कंट्रोल अशी भूमिका घेत विरोधी पक्ष निवडणूक लढवतील. त्यात अँटी इमिग्रण्टस भावना फ्रान्समध्ये आहेच तिला खतपाणी घातलं जाईल. पण ह्या सगळ्यातून काठावर का होईना मॅक्रोन परत येतील. 


जर्मनीमध्ये सोशल डेमोक्रॅटिक पार्टीचे ओलॉफ शॉल्झ हे नवे चॅन्सेलर ह्या वर्षात रुळतील. १६ वर्षांच्या अँजेला मर्केल ह्यांच्या करिष्माई नेतृत्वनानंतर ओलॉफ शॉल्झ हे तीन पक्षांचं ज्याला ट्रॅफिक सिग्नल सरकार चालवणार आहेत. ह्या आघाडीतील जर्मन ग्रीन पक्ष क्लायमेट चेंजचा अजेंडा रेटून घेईल तर फ्री डेमोक्रॅटिक पक्ष मुक्त अर्थव्यवस्था अधिक रेटण्यासाठी आग्रही असेल. चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या उंबरठयावर जग असताना जर्मनीला त्यात आघाडी टिकवायची आहे आणि हे करताना युरोपियन युनियनला विश्वास देत रहायचं आहे की ब्रेक्झिट होऊ दे किंवा अजून काही होऊ दे, आम्ही गाडा नीट हाकू शकतो. 


आता रशिया... रशिया पेक्षा व्लादीमीर पुतीन हे काय करतील हेच बघावं लागेल. २०२१ मध्ये अलेक्सी नवलनी ह्या कट्टर विरोधकाला जेलमध्ये बंद केल्यावर त्यांच्या समर्थकांना नामशेष करण्याचा एककलमी कार्यक्रम पुतीन ह्या वर्षात घेतील असा अंदाज आहे. २०३६ पर्यंत पुतीन सत्तेत राहतील ह्याची तजवीज करून घेतली आहेच त्यामुळे आता विरोधक संपवणे हा पुतीन ह्यांचा अजेंडा आहे. अलेक्सी नवलनी ह्यांना रशियन टीव्हीवर झळकू दिलं जात नाही.  गुगल आणि apple वर प्रेशर आणून अलेक्स नवलनी ह्यांचं मोबाईल ऍप डिलीट करायला लावलं, कारण काय तर नवलनी कट्टरता पसरवत आहेत. फक्त युट्युबवर अजून क्रेमलिनला नियंत्रण मिळवता आलेलं नाही. युट्युब अलेक्स ह्यांचे व्हिडीओज डिलीट करायला तयार नाही आणि रशियामध्ये युट्युब इतकं लोकप्रिय आहे की त्यावर जर बंदी आणली तर रशियन तरुण रस्त्यावर उतरेल अशी भीती आहे. त्यामुळे RTube हा नवीन सरकारी प्लॅटफॉर्म जन्माला घातलं जात आहे. एकदा Rtube रुजलं की युट्युबला हाकलून लावणार हे नक्की. थोडक्यात आपलं सिंहासन बळकट करण्यात पुतीन ह्यांचं २०२२ चं वर्ष जाणार असं दिसतंय. 


पुढचा भाग आफ्रिका खंडाविषयी..... 


Ketan Joshi 

Image Courtesy :- The Economist 


#theeconomist  #WorldAhead #England #BBC #BorisJohnson #emmanuelmacron #russia #Germany #angelamerkel #QueenElizabeth






Comments

Popular posts from this blog

तर्कबुद्धीचा उतारा

ट्रम्प आणि देशीवाद

मराठी जगाची खिडकी युट्युब व्हावी