यक्षप्रश्न :- Decision Making Fatigue

 महाभारतातील एक कथा आहे. पांडव चौदा वर्षांच्या वनवासात असताना भटकत एका तळ्यापाशी येतात. पांडवांच्यातील सगळ्यात लहान भाऊ सहदेव ते पाणी प्यायला जातो पण तिथले यक्ष त्याला अडवतात, आधी प्रश्नांची उत्तरं दे मग पाणी पी असं सांगतात. पण सहदेव दुर्लक्ष करून पाणी प्यायला जातो आणि मृत्युमुखी पडतो. पुढे एका मागो एक पांडव येतात पाणी प्यायचा प्रयत्न करतात पण यक्षाच्या प्रश्नांना उत्तरं न दिल्यामुळे मृत्युमुखी पडतात. पुढे धर्मराज युधिष्ठिर तिकडे येतो, यक्षांची अट मान्य करून प्रश्नांच्या फैरींना उत्तरं देत यक्षाला जिंकतो. भावंडांसाठी जीवनदानाचं वरदान मागतो. 


तर यक्षप्रश्न हा शब्द असा जन्माला आला. मी हा शब्द लहानपणापासून घरात ऐकत आलो. बरं ज्याला लोकं यक्षप्रश्न म्हणायचे, ते मुळात ह्यांना इतके किचकट प्रश्न का वाटतात हेच कळायचं नाही.अर्थात आयुष्य सोपं आहे आणि ते आपल्याला जितकं कळलं आहे तितकंच खरं आहे असं वाटण्याचे ते दिवस.  

आसपासच्या अनेकांना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे ह्याचंच अप्रूप वाटायचं. आपल्याला हवं तसं मनासारखं वागण्याची मज्जा काही वेगळी ती लवकरात लवकर अनुभवता आली पाहिजे असं वाटत रहायचं. अर्थात हे मलाच वाटलं असेल असं नाही तर ते विशीच्या आसपास सगळ्यांनाच वाटतं. 

पुढे यथावकाश नोकरी, व्यवसाय सुरु होतो त्यातून अर्थार्जन सुरु होतो. आणि आपण आपले पैसे कसे खर्च करावे ह्याचे 'निर्णय' घेऊ शकतो हा आनंदच वेगळा असतो किंवा ती एक मस्ती असते. आणि खटकन एक वळण प्रत्येकाच्या आयुष्यात येतं की प्रश्नांची मालिका आयुष्याचा पिच्छा पुरवायला सुरुवात करते आणि मग छोटे प्रश्न पण यक्षप्रश्न वाटू लागतात. 

रिलेशनशिप मध्ये राहू का बाहेर पडू? मला नाही करायची ही बोअर नोकरी त्यापेक्षा काहीतरी मनासारखं वेगळंच करून बघायचं आहे, काय करू? सगळे म्हणतात हेच सेटल होण्याच वय पण मला नाही वाटत आहे काय करू? ऑफिसचा उबग आला आहे देऊ का नोकरी सोडून? दारू नाही प्यायली तर सोशलायजिंग होत नाही, खरं असेल का? इथपासून आज काय रंगाचे कपडे घालू? मॅचिंग खरंच नीट आहे ना? वाट्टेल ते. आणि प्रत्येक प्रश्न यक्षप्रश्न वाटायला लागतो. 

त्यात कोरोना येतो आणि घरात जखडून टाकतो. एका बाजूला कोरोनाची भीती असताना कोणीतरी गेटटुगेदर ठेवतं. त्या गेटटुगेदरला जायचं आहे पण कोरोनाची भीती सतावत राहते. घरातील मुलं आणि वृद्ध माणसं घरात बसून बसून कंटाळली आहेत. त्यांना बाहेर जायचच आहे. मलाही पटतंय त्यांचं म्हणणं. पण काही झालं तर लोकं काय म्हणतील? आणि हे सगळं सुरु असताना पुढे काय होणार आणि कसं होणार ? हा तर आयुष्याला वेढलेला प्रश्न आहेच. ह्यातल्या कशावरच निर्णय घेऊ नये असं वाटू लागतं. 

ह्यातून मनाला थकवा येतो, ह्यालाच इंग्रजीत डिसिजन मेकिंग फटिग म्हणतात. ह्या थकव्यावर मात करायला सध्या आपण एका मागो एक ओटीटीच्या सिरीज रात्र रात्र जागून बघतो. स्कॅम्स, लूट, हिंसा, क्रौर्य ह्यांनी भरलेल्या सिरीज मनाला अधिक सुन्न करत असतात पण आपल्याला वाटतं  की त्या शांत करत असतात. आणि अगदी सिरीज नाही तर मोबाईलवर निरर्थक काही तरी पाहत बसतो. ह्या सगळ्याने आपण शांत तर होतच नसतो उलट प्रश्नांच्या भोवऱ्यात अडकलेल्या मनाला अधिक सुन्न करतो आणि अधिक खोल गर्तेत नेतो.  

म्हणजे मग डिसिजन मेकिंग फटिग खरंच काही असतं का? तर हो असतो ना, तुम्ही आम्ही सगळे त्यातून जात असतो. जवळपास प्रत्येकाची प्रत्येकाबद्दल एक तक्रार असते की ' अमुक/तमुकला नक्की काय हवं असतं कळतच नाही?' आणि हे खरंच असं घडतं कारण आपल्याला पण अनेकदा कळत नसतं की मला नक्की काय हवं आहे. पण त्याचवेळेला प्रत्येक गोष्टीचा निर्णय घेण्याची इच्छा तर असते. मग इतके छोटे छोटे निर्णय घेण्यात गुंतून जातो की मोठ्या निर्णयाच्या वेळेस अर्थात यक्षप्रश्नांच्या वेळेस आपली पुरती दमणूक होते. 

एक ऑब्झर्वेशन असं आहे की डिसिजन मेकिंग फटिग माणसाला निष्क्रिय करतो. वरवर त्याच छान चाललं आहे असं वाटतं पण तसं नसतं तो आतून कावलेला आणि कंटाळलेला असतो. पूर्वी एखाद्याचं उत्तम चाललं होतं आणि पुढे तो व्हिमझिकल वागायला लागला आहे असं दिसतं. पूर्वी बारीक सारीक गोष्टीत पण लक्ष घालून काम करणारा, व्यवसाय चालवणारा माणूस अचानक निष्क्रिय होत जाताना दिसतो आणि पुढे अपयशी होऊ लागतो. साधारणपणे आपण एखाद्याचे दिवस फिरले असं सहजपणे म्हणून टाकतो. पण ते का फिरले त्याची काही सायकॉलॉजिकल कारणं असतील का हे आपण बघतच नाही. त्या व्यक्तीला कसला तरी फटिग आला नसेल कशावरून? आणि मुळात हा फटिग आपल्या सगळ्यांना कमी जास्त फरकाने येतो. पण मुळात हा फटिग कसला आणि तो कसा टाळावा ह्याचा विचारच आपण केलेला नसतो. 

डिसिजन मेकिंग फटीग येणारच नाही असं काही करता येईल का ? हो सहज शक्य आहे. ह्यासाठी प्रत्येक बारीक सारीक निर्णय मग तो ऑफिसमधला असो की घरातला मीच घेणार हा अट्टाहास सोडून बघा. तुम्हाला कमीत कमी निर्णय घ्यावे लागतील अशी तजवीज करा. अनेक यशस्वी माणसं एकाच पद्धतीचे कपडे रोज वापरतात कारण काय तर आज कुठला रंग घालू ह्या प्रश्नाचं द्वंद्वं सकाळपासूनच का सुरु करायचं?  थोडक्यात उगाच असंख्य पर्यायांच्या जगात गुंतवून घेऊ नका. 

अजून एक गोष्ट करून बघूया ते म्हणजे स्वतःला, स्वतःच्या परिस्थितीला आणि आपण घेतलेल्या निर्णयाला आहे तसं स्वीकारलं तर? मला काय जमतं आणि झेपतं ह्याचा रिव्ह्यू एकदाच घ्यायचा आणि निर्णयाचा पॅटर्नच ठरवून टाकायचा.  शेवटी प्रत्येक जण एक काहीतरी वरदान आणि शाप घेऊन येतच असतो. आपल्या शापाचा साप ओळखायचा आणि वरदानाच गोंडस हरीण पण गोंजरायचं. शांतपणे कमीत कमी निर्णय घ्यावे लागतील अशी परिस्थिती निर्माण करायची म्हणजे महत्वाच्या  निर्णयात शक्यतांचा अर्थात पॉसिबिलीटीजचा रवंथ करत अंतिम निर्णय घ्यायची सवय जडेल. आणि असा रवंथ करून घेतलेला निर्णय चुकण्याची शक्यता कमी. 

डिजिटल युगात पर्यायांचा महापूर समोर येतोय आणि तो वाढत राहणार. स्वघोषित तज्ज्ञ अधिक गोंधळात टाकणार. काल हा २०% डिस्काउंट देत होता आज हा देतोय मग कालचा बरा आणि खरा की आजचा? प्रश्न तर आदळत राहणार. तोपर्यंत आदळत राहणार जो पर्यंत तुम्ही थकूनभागून कृत्रिम बुद्धिमत्तेला (आर्टिफिशीयल इंटेलिजन्स) शरण जात नाही. जे डिजिटल जग गोंधळ वाढवतंय तेच जग एक दिवस सांगेल आम्हाला तुमचा सायकॉलॉजिकल, सामाजिक आणि आर्थिक प्रोफाइल करू द्या. आम्हाला एक पॅटर्न ठरवू द्या. एका क्षणाला ही कृत्रिम बुद्धिमत्ता तुम्हाला बॅक सीट घ्यायला सांगेल आणि पुढे सगळे निर्णय स्वतःच घेऊन तुम्हाला फक्त कळवत राहील. तुम्ही म्हणाल चला सुटलो. अहो पण जिथे स्वतःच्या मनाने घेतलेल्या निर्णयाबद्दल पुढच्याच क्षणात संभ्रम निर्माण होतो तिथे कृत्रिम बुद्धिमत्तेने घेतलेले निर्णय तरी कुठे मान्य  होणार?
त्यापेक्षा प्रश्न यक्षप्रश्न वाटायला लागतील इथवर जाऊ द्यायचं नाही. जे कम्फर्टेबल वाटतं ते करायचं आणि ये दिन भी जायेंगे म्हणत पुढे जायचं.
 


#decision #Fatigue #Complexities #life #Realities 


Comments

  1. The necessity of simplifying things is nicely highlighted and the solution is also very apt. Nice write up.

    ReplyDelete
  2. The decision making fatigue is very well explained in even small areas of life and solutions are also very simple to apply.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

तर्कबुद्धीचा उतारा

ट्रम्प आणि देशीवाद

मराठी जगाची खिडकी युट्युब व्हावी