Acceptance/ स्वीकार'


 काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. भारतीय सैन्यावर एक डॉक्युमेंट्री बनवायला म्हणून आम्ही काश्मीरला गेलो होतो. चंदिगढ ते मीरपूर असा प्रवास कारने करत रात्री आम्ही उशिरा आर्मी गेस्टहाऊसला पोहचलो. कडक उन्हाळ्याचे दिवस होते. गेल्या गेल्या आर्मीतील काही अधिकाऱ्यांनी स्वागत केलं, आणि आणि आम्हाला जेवायचं आमंत्रण दिलं. 


जेवायला बसलो. जेवण वाढणारा अर्थात आर्मीतला एक जवान होता. सहा फुटापेक्षा जास्त उंची आणि पिळदार शरीर. अत्यंत प्रेमाने गरमगरम फुलके वाढत होता. मध्ये मध्ये आग्रह करत होता. दुसऱ्या दिवशी नाश्त्याच्या वेळेस पण तोच वाढायला. चेहऱ्यावर हास्य कायम. रात्री जेवायला बसलो तेंव्हा पुन्हा हसतमुख चेहऱ्याने आम्हाला जेवण वाढत होता. आग्रह करणं सुरूच होतं. जेवण झालं. मग बाहेर मोकळ्यावर फिरत होतो तेवढ्यात तो बाहेर आला, आम्ही दुसऱ्या दिवशी पुढच्या प्रवासाला निघणार होतो म्हणून त्याचे आभार मानले, तो ही छान गप्पा मारत होता. त्याला सहज विचारलं की "आर्मी मेसमे कितने सालों से काम कर रहें हो ". तर म्हणाला "३,४ सालों से." वयाचा अदमास घेतला तर हा तसा वयाने मोठा वाटत होता, माझ्या डोक्यात चक्र फिरू लागली तर स्वतःच म्हणाला की, " वैसे तो मेरी एनएसजी ट्रेनिंग पुरी हुई है। और पोस्टिंग भी हुई लेकिन एक हादसे में पाँव में जबरदस्त जख्म हुई उसके बाद अस्पताल में पड़ा रहा कुछ महीनों के लिए। फिर जब ठीक हुआ तो कमांडो का तो काम  करने के स्थिति में नहीं था, इसीलिए यहाँ पे पोस्टिंग मिली और मेस में आ गया। " 


माझ्या मनात चर्रर्र झालं. एनएसजीच ट्रेनिंग पूर्ण केलेला जवान हा सैन्याच्या एलिट फोर्समधला. अतिशय खडतर ट्रेनिंग पार करून इतक्या एलिट फोर्समध्ये जॉईन होणं हाच मोठा सन्मान. पण तिथून बाहेर पडून थेट मेस मध्ये? मी विचारलं, मेसमध्ये काम करताना आणि लोकांना जेवण वाढताना त्रास नाही होत? 


जॉब सॅटिसफॅक्शन इत्यादी कल्पनांच्या जंजाळात अडकलेलं माझं मन. त्यामुळे हा प्रश्न माझ्या दृष्टीने स्वाभाविक होता. 

पण त्याला बहुदा आश्चर्य वाटलं असावं.  

मला म्हणाला की ऊसमें गलत क्या है? कोणतं तरी काम करायचं. माझ्या नशिबात एलिट फोर्सचं ट्रेनिंग होतं, पुढे कमांडो म्हणून मिरवणं होतं, ते संपलं, आज हे आहे. आणि मी मेसमध्ये काम करत असलो तरी मी जो अनुभव मी कमवला आहे, जे क्षण मी कमांडो म्हणून जगण्याचे कमवले आहेत ते माझेच आहेत. ते माझ्यापासून माझं हे काम हिरावून तर घेत नाहीये ना? मग तक्रार कसली? मला म्हणाला तुम्ही मला जॉब सॅटिसफॅक्शनबद्दल विचारलंत तर मला इतकंच कळलं आहे की समाधान हे तुम्ही जे करताय ते स्वीकारण्यात असतं. एकदा स्वीकारलं की झालं. 


कट टू 

पुढे काही वर्षांनी एका उद्योजकाची भेट झाली. एकेकाळचा प्रचंड यशस्वी उद्योजक. अफाट पैसे कमवले, घरच्यांवर, लोकांवर खर्च केले. पुढे व्यवसायात काही चुका होत गेल्या, व्यवसाय गटांगळ्या खाऊ लागला. प्रचंड पैसे विविध ठिकाणी अडकले, लोकांनी बुडवले. परिस्थिती पालटली तशी घरची माणसं बदलली. त्याला टोचून बोलू लागली, अनेकदा त्याच्यासमोरचं जेवणाचं ताट खेचून घ्यायची. पण ह्या माणसाचा संयम कमालीचा होता. सगळं सहन करायचा. 

एकेदिवशी त्यांची आणि माझी भेट झाली. मला म्हणाले अबक व्यक्ती तुमच्या ओळखीची आहे. मला त्यांच्याकडे न्या. 

पुन्हा शून्यातून सगळं उभं करतो मी. तेंव्हा वय होतं ५७. मी त्यांना म्हणलं चला जाऊया. ज्यांना भेटवायचं ती व्यक्ती पुण्यातील. त्यांनी सकाळी ८ ची वेळ दिली. मी ह्या गृहस्थांना सांगितलं की ८ वाजता भेटूया थेट त्यांच्या ऑफिसला. 

मी आधल्या दिवशी पुण्यात गेलो. एका हॉटेलमध्ये राहिलो. तिथला एसी धड चालत नव्हता म्हणून पुरेशी चिडचिड करून सकाळी ७:४५ ला ठरलेल्या ठिकाणी पोहचलो. तर हे गृहस्थ आधीच आलेले. मी सांगायला सुरु केलं की कसा एसी धड चालत नव्हता. तर खूप आस्थेने चौकशी केली. मी सहज विचारलं तुमची झोप झाली छान? कुठे उतरलात? तर म्हणाले झोप उत्तम झाली. संभाजी पार्कच्या बाहेर बाकड्यावर रात्र काढली. सकाळी आलो. त्या क्षणाला पायाखालची जमीन सरकल्यासारखं झालं. 

काही काळ स्तब्ध झालो. तोंडातून अवचितपणे सॉरी निघालं. म्हणाले कशाबद्दल सॉरी? मला माझ्या स्ट्रगलबद्दल सॉरी नाही वाटत तर तुम्ही का वाटून घेता? कदाचित हे मी ओढवून घेतलं असेन किंवा हे प्राक्तन असेल? आणि मला त्याबद्दल तक्रार नाही. 

वैभवाची नशा जशी असते तशी स्ट्रगलची नशा आत भिनवली आहे मी. माझ्या वाट्याला जो रोल आला आहे तो मी स्वीकारला आहे मी. 


निसर्गात एक झाड दुसऱ्या झाडासारखं नसतं. प्रत्येकाची घडण काहीतरी वेगळी. तशीच आपल्या प्रत्येकाची घडण वेगळी, वाट्याला येणारे अनुभव वेगळे. कुठल्यातरी वळणवाटेवर अनपेक्षित पणे काही विचार न केलेलं समोर येतं. अर्थात अनपेक्षित हा शब्दच बहुदा काहीच बदलणार नाही, आहे ते सगळं आहे तसं स्थिर राहणार ह्या भावनेतून हा शब्द येतो. त्यामुळे ते जेंव्हा आ वासून समोर येतं तेंव्हा हात थरथरू लागतात, मन थाऱ्यावर राहत नाही. समोर आलेलं स्वीकारायचं नसतं. हे माझ्याच वाट्याला की ही भावना घेरून टाकते. आणि त्रागा, चिडचिड, नैराश्य फेर धरून नाचायला लागतं. हे सगळं एका क्षणात थांबवणं शक्य आहे. फक्त आहे ते स्वीकारायचं. किती सहजपणे त्या जवानाने ते स्वीकारलं किंवा त्या उद्योजकाच्या ते आत भिनल. हे स्वतःच्या आत भिनवून घेणं हेच सत्य.  जे तुम्हाला तुमच्या पुढच्या टप्प्यापर्यंत साथ करत, तुम्हाला जिवंत ठेवते. म्हणूनच जे आहे ते स्वीकारावं आणि आपल्या टर्निंग पॉईंटची अर्थात वळणवाटेची वाट बघावी. 

#acceptance #life

#struggle #nature


Comments

  1. Fabulous point and nicely articulated.

    ReplyDelete
  2. खूपच सुंदर मांडणी.लेख काळजाला भिडला.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

तर्कबुद्धीचा उतारा

ट्रम्प आणि देशीवाद

मराठी जगाची खिडकी युट्युब व्हावी