८ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. ऑगस्ट क्रांती राजधानी एक्स्प्रेसने दिल्लीला जायला निघालो होतो. मुंबई सेंट्रलला गाडीत चढलो. साईड सीट मिळाली होती. सिटपाशी पोहचलो तर सीटच्या खाली आणि सीटवर बॅगा अस्ताव्यस्त पडल्या होत्या. थोडासा वैतागलो. तेवढ्यात एक माणूस आला. तेंव्हा तो पन्नाशीचा असावा. माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला "शायद आपको सीट ऍडजस्ट करना होगा, लेकिन अच्छी सीट मिलेगी।" असं म्हणाला आणि गायब झाला. आधीच मूड ऑफ होता, त्यात हा आदेश देणारा कोण म्हणून वैतागलो आणि ठरवलं की सीट नाही ऍडजस्ट करणार. हा कोण मला सांगणारा?


गाडी सुटायच्या वेळेला हा गडी हजर. मला म्हणाला माझ्या सामानाकडे लक्ष ठेवा मी आलोच. गाडी सुटली. तो माणूस परत आला. हातात खायचं सामान घेऊन आला होता. ते सीटवर ठेवून स्वतःच्या बॅगा नीट ठेवल्या, माझी बॅग पण ठेवली. पॅन्ट्रीवाल्याला परस्पर सांगितलं की ह्यांचा आणि माझा स्नॅक्स आणू नकोस. मला त्याच्या आगाऊपणाचा राग आला आणि थोडं कुतूहल पण वाटलं. कचोरी, सामोसे, जिलबी असा पॅक्ड नाश्त्याचा एक डबा माझ्या हातात ठेवला. स्वतः खायला सुरुवात केली. त्याचं खाणं देखणं होतं. अगदी तल्लीन होऊन. मध्येच चटणीची पिशवी फोडून माझ्या सामोस्यावर चटणी ओत असे प्रकार सुरु. एकही शब्द बोलला नाही. माझं खाण झालं, सगळे डबे डस्टबिनमध्ये टाकून, पुन्हा परत आला. सीटवर काही सांडलं नाही ना बघितलं. आणि म्हणाला चलो मेरे साथ . 

मी कुठे विचारलं तर खुणेनेच म्हणाला चल. मग आम्ही ह्या डब्यातून त्या डब्यात फिरू लागलो. अगदीच पुढच्या डब्यात एक २० वर्षांची मुलगी रिझर्वेशन कन्फर्म नाही आणि जायचं तर आहे ह्या चिंतेत बसली होती. ह्याला कसं कळलं कोण जाणे. तिला विचारलं. तिने तिची अडचण सांगितली. तिचा पीएनआर लिहून घेतला. पुढे एका म्हाताऱ्या माणसाकडे गेला आणि विचारलं कोणता बर्थ आहे. तर तो म्हणाला वरचा. त्यावर म्हणाला जर कोणी ऍडजस्ट नाही केला तर मी येतो. अशी टेहाळणी झाली. परत आमच्या सिटपाशी आलो. त्याने नाश्त्याचे ५ डबे घेतले. टीसीकडे गेला. त्यांना आग्रह केला खाण्याचा. त्यांनी हो नाही म्हणत एक एक सामोसा घेतला. ह्याने लगेच स्वतःची कामं पुढे केली. हा पीएनआर कन्फर्म करा, ह्या आजोबांना लोअर बर्थ द्या, ह्या बोगीत म्हातारा, म्हातारी आहेत. सवाई माधोपूरला उतरणार आहेत, सामान खूप आहे त्यांचं,त्यांना सामान उतरवायला मदत करायला सांगा इत्यादी इत्यादी. 

बहुदा टीसी ह्याला ओळखत असावेत. त्यांनी त्या मुलीचं तिकीट कन्फर्म केलं. आजोबांना लोअर बर्थ दिला. हे होईपर्यंत वापी आलं. एक चहावाला आला. त्याने ह्याच्या सीटवर चहाचा थर्मास ठेवला होता. त्याला चहाचे पैसे दिले, रग्गड टीप दिली. ह्या गृहस्थाने मला चहा दिला, स्वतः घेतला. उरलेला चहा घेऊन आसपासच्या बोगीत विचारून आला कोणाला हवा आहे का?

हे होता होता रात्री जेवणाची वेळ झाली. पुन्हा एकदा पॅन्ट्रीला सांगितलं होतं की माझ आणि त्याचं जेवण पॅन्ट्रीच नको आहे. आता मला खात्री होती की हा उपाशी ठेवणार नाही. त्यामुळे मी निर्धास्तपणे ह्या बोगीतून त्या बोगीत त्याच्यासोबत फिरत होतो. जेवणाला ह्याने ४ कोर्स मिलच आणलं होतं. ते देखील ६,७ माणसांचं. मला म्हणाला की मुंबई सेंट्रलजवळ एक कॅटरर शोधला आहे त्याला फोन करून सांगतो तो छान पॅक करून आणतो. आमचं जेवण झालं, मग जे बोगीतले अटेंडंट होते त्यांना जेवण दिलं. हे होता होता बडोदा स्टेशन आलं. गाडी थांबली होती. मी ह्या गृहस्थाला गेल्या ५ तासात जे घडलं त्याचा अर्थ विचारला. 

मला म्हणाला की मी मूळचा मथुरेचा, पंजाबी. व्यवसायाच्या निमित्ताने अनेकवेळा देशभर प्रवास करतो. अर्थात मुंबईत जास्त. हीच गाडी अनेकवेळा असते. मी विचारलं पण ही सगळी धडपड का? इतकं जेवण, चहा, नाष्टा हे सगळं का?
तर म्हणाला की आयुष्यात एकदा नव्हे तर दोनदा व्यवसायात झटका बसला. निराश मनाने प्रवासा करताना तर खूप एकटं एकटं वाटायचं. त्यावेळेला आसपासच्या माणसांकडे पहायचो. त्यांचे चेहरे बघून वाटायचं ह्यांची मजा आहे. मलाच का सजा? 

एक दिवशी 'बांके बिहारी' म्हणजेच वृंदावनच्या देवळात एक साधू भेटला. माझी मनस्थिती क्षुब्ध होती, कोणाशी तरी बोलायची इच्छा होती. पण सोबत कोणीच नव्हतं. मग साधुशी बोलायचा प्रयत्न केला.  
त्याने आधी झिडकारलं, मग लागला साधू बोलायला. मी त्याला माझी कहाणी सांगितली. आणि प्रवासात मला कसं एकटं वाटतं हे पण सांगितलं. तर साधू म्हणाला की हा तुझा भ्रम आहे की जी माणसं तुला प्रवासात दिसतात ती खुश असतात. कशावरून ती खुश असतीलच? ती माणसांच्या घोळक्यात असताना पण एकटी असू शकतील की? त्यांना मदत करायचा प्रयत्न कर. त्यांना तुझ्यासारखं एकटं वाटणार नाही ह्याची काळजी घे. 

तो म्हणाला मी साधूला विचारलं की 'ह्याने माझे प्रश्न सुटतील का?' तर साधू त्याला म्हणाला, सांगता नाही येणार... पण  तू जेंव्हा एकटेपण सोसत असशील तेंव्हा कदाचित कोणतरी येईल तुझी चौकशी करायला. 

तेंव्हापासून तो म्हणाला मी माझ्यापरीने एकट्या दिसणाऱ्या माणसांना हेरतो, त्यांची मदत करतो. पुढे ह्या माणसाची व्यवसायिक भरभराट झाली. पैसे आले. तेंव्हापासून हा ५,६ माणसांना पुरेल इतकं जेवण, चहाची सोय करतो. आणि कोणी एकटा प्रवास करतोय असं दिसलं तर त्याला सामील करून घेतो. पुढे बोलता बोलता म्हणाला मगाशी मी तुम्हाला म्हणलं की तुम्हाला सीट बदलावी लागेल कदाचित, तुम्हाला राग आला असेल तेंव्हा. पण आपणच तुमच्या माझ्यासारख्या सरावलेल्यानीच तर मदत करायची ना दुसऱ्याला. असं म्हणून आलोच म्हणत तो निघून गेला. 

मी निशब्द होतो. पुढे २ मिनिटात गाडी सुटली म्हणून मी सीटपाशी आलो तर ह्याने माझं बेडींग तयार करून ठेवलं होतं. मग थोडं इकडचं तिकडचं बोललो. झोपलो. सकाळी हा मथुरेला उतरला. मी झोपलोय पाहून त्याने स्वतःच कार्ड उशीपाशी ठेवलं होतं. आणि मागे लिहिलं होतं, कभी अकेला महसूस किया तो जरूर कॉल करे। 
पुढे कधी परत कुठल्या प्रवासात तो माणूस भेटला नाही. पण प्रवासात अनोळखी माणसाला एक छान हास्य देऊन त्याला कोणीतरी आहे तुमच्यासोबत ही समोरच्याच्या मनात भावना निर्माण करायची असते हे शिकवून गेला    


Comments

Popular posts from this blog

तर्कबुद्धीचा उतारा

ट्रम्प आणि देशीवाद

मराठी जगाची खिडकी युट्युब व्हावी