ऋतू

 'महाराष्ट्रात पुन्हा एकदा उष्णतेची लाट'... 'तापमानाचा पारा चढताच राहणार'......  

अशा बातम्या वाचल्या तरी मनाची घालमेल सुरु होते. अस्वस्थ व्हायला होतं. त्यात पर्यावरणाचा ह्रास कसा होतोय आणि हे किती गंभीर होत जाणार ह्या बातम्यांना आणि सोशल मीडियावरच्या पोस्ट्सना ऊत येतो. आणि वाढत्या उकाड्यामुळे शरीराची जी घालमेल होते त्यापेक्षा अधिक ह्या बातम्यांनी मनाची घालमेल सुरु होते, अस्वस्थता, अनिश्चितता ह्याच्या भोवऱ्यात मन अडकत आणि त्यातून सुटका करून घ्यायला हात नकळत एसीच्या रिमोटकडे जातात. मनाला उन्हाळ्याचा दाह कमी झाल्यासारखा वाटतो. पण हा दाह कमी होतो म्हणजे नक्की काय कमी होत असेल? 


काही कमी होत नाही... माझी ह्या रखरखीपासून तात्पुरती सुटका करून घेऊ शकतो, आणि पुढच्या ऋतूची वाट पाहू शकतो जो इतका त्रासदायक ठरणार नाही ह्याची खात्री बाळगत निवांत राहू शकतो इतकंच. 

 

ह्यावरून एक प्रसंग आठवला. भर मे महिन्यात एकदा दिल्लीहुन मुंबईला येत होतो. एक मित्र सोडायला आला होता दिल्ली एअरपोर्टला. वाटेत म्हणाला एका ठिकाणी दहीवडे खाऊ. सकाळी दहा वाजता दहीवडे खाण्याची तयारी दिल्लीकरच दाखवू शकतात. सकाळी १० वाजता पण दिल्ली सणसणीत तापली होती. दहीवडे विकण्याची जागा म्हणजे कळकटलेला ठेला. ठेल्याचा मालक, त्याचा नोकर तयार होऊन यायची वाट बघत होता. हातातलं सामान बघून मागे झाडाच्या आडोश्याला जाऊन उभं रहा म्हणाला. आडोश्याला येऊन उभं राहिलो तर,  मागे त्या उन्हात एक विशीतला मुलगा आंघोळ करताना दिसला. इतक्या कडकडीत उन्हात तो कुठेही आडोश्याला आंघोळ करत होता पण कुठेही चेहऱ्यावर त्रागा नाही. थोड्यावेळानेच तो मुलगा अंगात कपडे चढवून त्या दहीवड्याच्या ठेल्यात शिरला. भट्टी सुरु झाली. २० मिनिटाने आमची प्लेट घेऊन मालकच आला. 

 

मधल्या काळात त्या मुलाकडे मी टक लावून बघत होतो. नुकतीच आंघोळ झाली असली तरी पुन्हा घामाच्या धारांनी आंघोळ सुरु झाली होती. तरीही त्याचं काम सुरु होतं. आम्ही तर लांब आडोश्याला होतो पण तरीही उन्हाने बेजार झालो होतो. आणि इथे हा मुलगा त्या भट्टीवर शांतपणे काय काय तळत होता. आम्ही कसेबसे दहीवडे संपवले आणि एअरपोर्टला आलो. 

 

वाटेतच कळलं की विमानाला काही कारणांनी उशीर आहे. चरफडत एअरपोर्टमध्ये शिरलो. नेहमीचे सोपस्कार पार पाडले आणि वेटिंग एरियामध्ये एक सीट पकडली आणि बसलो. जे काही ऊन लागलं त्याने गरगरायला झालं होतं. पण एकच मनात विचार येत होता की ठीक आहे आता काय, विमान कधी का सुटेना सगळा वेळ एसीत आहोत.  मुंबईला बाहेर पडल्यावर बघू पुढचं पुढे. इतक्यात एक मध्यमवयीन स्त्री शेजारी बसली. माझ्या हातातलं पुस्तक पाहून बोलायला लागली. पुस्तकाच्या रुळावरून सुटलेली गाडी अर्थात बाहेरच्या उन्हावर आली. आम्ही दोघेही उन्हाळा किती घाणेरडा आहे इत्यादी विषयांवर बोललो. ती बाई उत्साहाने कसं मी उन्हाळ्याची विशेष काळजी घेते हे सांगू लागली. तिने उन्हाळ्यावर मात ह्यावर टिप्सचा मारा सुरु केला. उन्हाळा परवडला पण टिप्स आवर म्हणत मोबाईल चाळू लागलो तर 'ह्या वर्षी केरळमध्ये मान्सूनचं आगमन वेळेत होणार असा अंदाज आहे' अशी बातमी समोर आली. 


ती बातमी मी त्या बाईंना सांगितली. आणि संवादाचा सूरच बदलला. त्या बाईंनी त्यांच्या घरातून पावसाळयात कसा समुद्र दिसतो हे सांगितलं, मग त्यांच्या फार्महाउसचं वर्णन. पावसाळ्यात कसं सगळं हिरवंगार होतं इत्यादी वर्णनं सुरु झाली.  मी देखील, मला पण कसं पावसात घरी बसून कसं पुस्तकं वाचायला आवडतं हे सांगितलं. त्यावर ती बाई म्हणाली 'वॉव, लव्हली'. 

इतक्यात विमानाची घोषणा झाली. आम्ही विमानाच्या दिशेने झेपावलो. विमानाचा जिना चढताना जे काही ऊन लागत होतं ह्यावर अनेक प्रवाशांच्या तक्रारी कानावर पडत होत्या. माझ्या सोबतची बाई अर्थात बिझनेस क्लासची प्रवासी होती. ती हुश्श करत सीटवर आदळली. मी मागे जाऊन बसलो. घाम पुसला आणि आता २ तास उन्हापासून सुटका म्हणून निवांत झालो. 

 

विमानात बसल्यावर त्या बाईंसोबतचा सगळा संवाद रिवाइंड करताना जाणवलं, की पाऊस वेळेत येणार ह्या एका बातमीने आमच्यातल्या संवादाचा सूरच बदलला. जणू चैतन्य आलं आणि लवकरच ह्या रखरखीतून सुटका होणार ही आशा जागृत झाली. पण पाऊस कितीही रोमँटिक वाटत असला तरी तो त्याचं तांडव करतोच की. उन्हाची रखरख जशी असते तसं पावसाचं तांडव असतंच की आणि हो थंडी पण मध्येमध्ये उग्र रूप धारण करतेच की. 

मला किंवा ह्या बाईना कदाचित इतर दोन ऋतूंचा फारसा फटका बसत नसेल पण हे ऋतू काही सगळ्यांना फक्त आनंदच देत नसतील. पाऊसामुळे कदाचित ह्या बाईच्या व्यवसायाच्या ऑफिसमधले कर्मचारी एखाद दोन दिवस येऊ शकत नाही हेच काय ते नुकसान. बाकी फार्महाउस आणि घरातून दिसणारा समुद्र हे आनंद आहेतच त्यांच्या वाट्याला. माझ्याबाबतीत कधीतरी पाऊसात अडकून पडणं हे सोडलं तर पावसाळ्यातील भजी, पुस्तकं आणि सोशल मीडियावर येणारा कवितांचा पूर हे चालूच असतं की. 

 

पण त्या दहीवड्याच्या ठेल्यावरच्या मुलाचं काय? उन्हाळ्यात घामाच्या धारा लागल्यात म्हणून पाऊसाची वाट बघावी तर घरात कदाचित चहुबाजुंनी पाणी शिरत असेल किंवा गळत असेल. बरं थंडी पण तितकीच अघोरी, कुडकुडायला लावणारी. आणि ह्यातून सुटका दिसत्ये का? जशी मला आणि त्या बाईंना उन्हाळ्यातून सुटका दिसते तशी? उत्तर आहे नाही. मग काय होत असेल त्याचं किंवा त्यांचं? ऋतूंच्या मागे ऋतू बदलून काकणभर देखील परिस्थिती न बदलल्याने मन काष्ठवत होत असणार. आणि हळूहळू येणाऱ्या त्राग्याकडे, परिस्थितीकडे असहाय्यतेतून नाही तर सोबती म्हणून बघण्याची ताकद निर्माण होत असणार. बदलेला ऋतू हा काही काळाने नवीन समस्या घेऊन येणार त्याला तोंड द्यायचं हे अध्यात्म शिकवत असणार.



Comments

Popular posts from this blog

तर्कबुद्धीचा उतारा

ट्रम्प आणि देशीवाद

मराठी जगाची खिडकी युट्युब व्हावी