जग भूकबळींच्या उंबरठ्यावर?

 जग भूकबळींच्या उंबरठ्यावर?


गेले काही दिवस पाश्चिमात्य माध्यमं एक भाकीत वर्तवत आहेत की जग भूकबळींच्या उंबरठ्यावर आहे आणि येत्या काही महिन्यात जगातील अनेक देशांमध्ये अन्नधान्याचा प्रचंड तुटवडा असणार आहे. अर्थात अशा कोणत्याही घटनेला कोणालातरी जबाबदार धरणं हे जगभरातील राज्यकर्त्यांचा काम असतं. तसं ह्या वेळेस व्लादीमीर पुतीन ह्यांना जबाबदार धरलं आहे. अर्थात कारण म्हणजे पुतिननी युक्रेनवर लादलेलं युद्ध. 

वॉशिंग्टन पोस्टचा अंदाज आहे की जगभरातील २१९ दशलक्ष लोकं ही अन्नधान्याच्या अनिश्चिचिततेच्या छायेत (food insecure) जगत आहेत. थोडक्यात आज जेवण मिळालं उद्याच काय ह्या विवंचनेत जगत आहेत. 

अगदी आपल्या शेजारचं उदाहरण आहे श्रीलंकेचं. श्रीलंकेत अन्नधान्याचा अभूतपूर्व तुटवडा आहे. आणि अर्थात राजपक्षे राजवट जशी त्याला जबाबदार आहे तसंच पुतीननी युक्रेनवर लादलेलं युद्ध पण. 


युक्रेन हा जगातील अनेक देशांचा अन्नदाता आहे. श्रीलंका, येमेन, सुदान, लेबेनॉन, युगांडा, टांझानिया, इजिप्त, ट्युनिशिया, कॅमेरॉन सारखे देश शब्दशः युक्रेनमधून आयात होणाऱ्या धान्यावर अवलंबून असणारे देश आहेत. पुतीननी ब्लॅक समुद्रातून युक्रेनकडून होणारी धान्याची निर्यात थांबवली आहे. त्याचा फटका जगातील अनेक देशांना बसला आहे. मध्यंतरी रशियन सैन्याने युक्रेनच्या अन्नधान्य नेणाऱ्या जहाजांवरच अन्नधान्य चोरून ते विकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला पण तो फसला कारण एकही युरोपियन देश हे धान्य विकत घ्यायला तयार नव्हतं. मग नेहमीप्रमाणे अंतर्गत यादवीने पोखरलेले सीरियासारखा देशच हे धान्य विकत घ्यायला तयार झाला. 


युक्रेनच्या ज्या भागात रशियाने हल्ला केला आहे तिथलं शेतीचं इन्फ्रास्ट्रक्चर पण नष्ट करून टाकलं आहे त्यामुळे जरी युद्धबंदी झाली तरी त्या भागातील शेती पूर्ववत होणं कठीण आहे. त्यामुळे ह्याचा फटका शेतीच्या नवीन सीझनमध्ये बसेल. त्यात जसं युक्रेनची निर्यात बंद आहे तशी रशियाची पण आहे. त्यामुळे अन्नधान्याचा प्रचंड साठा गोडाउन्समध्ये पडून आहे आणि आता नवीन पीक आलं तर ते साठवायचं कुठे हा प्रश्न आहे. मुळात हे युद्ध इतकं लांबेल असं कोणालाच वाटलं नव्हतं. आणि जरी आता युद्ध थांबलं तरी सगळं पूर्ववत व्हायला किमान ६, ८ महिने लागतील तो पर्यंत काही लाख टन धान्य हे सडून जाईल अशी भीती आहे. 


त्यात ह्या वर्षीची भारतीय उपखंडात आलेली उष्णतेची लाट ही अभूतपूर्व होती ह्याचा फटका पिकांना बसला आहे. अमेरिकेच्या पण गव्हाच्या पिकाला क्लायमेट चेंजचा जबर फटका बसला आहे. हॉर्न ऑफ आफ्रिकेचा भाग ज्यात इथिओपिया, सोमालिया, जिबुटी सारख्या देशांमध्ये भीषण दुष्काळ पडला आहे. (ह्याचा अंदाज इकॉनॉमिस्टने त्यांच्या वेध २०२२ च्या लेखमालेत मांडला होता आणि जो मी माझ्या ब्लॉग्समध्ये मेन्शन केला होता). त्यात ह्या वर्षी युक्रेन युद्धामुळे खत निर्मिती कितपत होईल शंकाच आहे कारण खतासाठी लागणारी काही केमिकल्स ही युक्रेनमधून येतात. आपल्याकडे खरिपाचा सिझन लवकरच सुरु होईल. जरी ह्या वर्षी पाऊस बरा असेल असा अंदाज असला तरी खतंच पुरेशी नाही आली तर पीक कितपत येईल ह्याबद्दल शंकाच आहे. 


पुन्हा क्रूड ऑईलचे भाव हा चिंतेचा विषय आहे. क्रूड ऑईल्सचे भाव हे १०५ ते ११० डॉलर्स प्रति बॅरल झालेत त्यामुळे एकूणच कॉस्ट वाढली आहे आणि त्यामानाने जर प्रॉफिट कमी होणार असतील आणि पुन्हा युद्ध कधी संपेल ही अनसर्टानीटी असेल तर जगभरातील शेतकरी किती ताकदीने पीक घेईल ह्याबद्दल साशंकता आहे. 


अगदी भारतासकट जगभरातील देशांनी निर्यातबंदीच पाऊल उचलायला सुरू केलं आहे पण शेवटी ग्लोबलायझेशनमध्ये अनेक प्रेशर्स अशी असतात की हे निर्णय मागे घ्यावे लागतील. भारताने गव्हाची निर्यातबंदीची घोषणा केली पण इजिप्तसाठी खिडकी थोडीशी किलकिली केली. 

आता एकच पर्याय म्हणजे कोणत्याही देशाने तडकाफडकी निर्यात बंदी न लादणं. इंडोनेशिया जगातील ६०% पाम तेल पुरवत. त्यांनी पण परिस्थिती पाहून निर्यातबंदी किंचित हटवली. अजून एक प्रयत्न व्हायला हवा तो म्हणजे युक्रेनमधून जी जी निर्यात ठप्प आहे ती रेल्वे किंवा रस्त्याच्या मार्गाने रोमानियात आणून तिथल्या बंदराद्वारे पूर्ववत करायची. 

अजून एक शहाणपण आणावं लागेल तो म्हणजे बायोफ्युअल मध्ये वापरलं जाणारं धान्य हे त्वरित रोखायला हवं. जगाच्या एकूण धान्य उत्पादनातील १०% धान्य हे बायोफ्युअलसाठी वापरलं जातं. ह्यावरूनच किती धान्य भुकेल्या तोंडाना देता येईल ह्याचा विचार करता येईल. 


भूकबळी हे नवीन शस्त्र पुतीनना सापडलं आहे. पुतीनना ह्या युद्धातून डिग्निफाईड एक्झिट हवी आहे. रिकाम्या हाताने त्यांना परत जायचं नाहीये. त्यासाठी जगातील प्रमुख देशांवर प्रेशर आणण्यासाठी हे अस्त्र म्हणून वापरतील असं दिसतंय. जगभरात भुकेली माणसं रस्त्यावर उतरली की आपोआपच युद्ध थांबावं ह्यासाठी प्रमुख देशांवर प्रेशर निर्माण होईल. आणि अर्थात पुतीनना युक्रेनच्या अर्थव्यवस्थेचा पण गळा आवळायचा आहे, त्यामुळे ते जितकं ताणता येईल तितका प्रयत्न करणार. जगातील प्रमुख राष्ट्रांनी पुतीनना डिग्निफाईड एक्झिट द्यावी जेणेकरून भूकबळींची लाट काहीशी सौम्य होईल. अर्थात काहीशीच.... 

Image Courtesy :- Ted Ideas


#famine #Ukrain #Russia #War #FoodExport #Food #India #ClimateChange #CrudeOil #Inflation

Comments

Popular posts from this blog

तर्कबुद्धीचा उतारा

ट्रम्प आणि देशीवाद

मराठी जगाची खिडकी युट्युब व्हावी