कट्टा
काही दशकांपूर्वीचा एका कात टाकत असलेल्या छोट्या शहरातील एक कट्टा. कट्टा म्हणजे काय तर एका दुकानाच्या पायऱ्या. हे दुकान त्यावेळी किंचितसं आडोश्याला होतं. तो काळ असा होता की गाव दूरदर्शनच्या बातम्यांच्या आधी म्हणजे ७ च्या आत घरात असायचं. त्यामुळे ह्या दुकानाचा मालक संध्याकाळी सहाला बंद करायचा. गावात मुळात सरकारी दिवे कमीच आणि त्यात पुन्हा ह्या दुकानाच्या भागात एकच दिवा जो कधी लागायचा कधी नाही, त्यात पुन्हा वाहनांची वर्दळ तुरळक त्यामुळे कमालीची शांतता आणि त्याहून महत्वाचं म्हणजे काहीसं गूढ वाटणारं वातावरण. त्या काळात बहुसंख्य कट्टे असेच जरा आडोश्याला असायचे. राजकीय चर्चांपासून ते चावट गप्पा मारण्यापर्यंत आणि कुठूनतरी पैदा केलेली सिगरेट चार जणांच्यात ओढण्यासाठी सगळ्यात सेफ जागा. थोडक्यात कोणाचं सहज लक्ष जाणार नाही, माफक आणि कोणाला त्रास होणार नाही अशी साहसं करण्यासाठी आणि टारगटपणा करण्यासाठीची ती उत्तम जागा.
कॉलेजमधून नुकतीच बाहेर पडलेली आणि पुढे काय ह्या विवंचनेत असलेली मुलं ह्या कट्ट्यावर जमू लागली. तिथल्या शांततेमुळे आणि आपल्याकडे कोणी बघत नाहीये ह्यामुळे ही जागा मुलांना आवडायला लागली. देशात, जगात अनेक राजकीय आणि सामाजिक उलथापालथी सुरु असण्याचा काळ. पण माहितीचा विस्फोट झाला नसल्यामुळे मोजकी वर्तमानपत्रं वाचून कट्ट्यावर राजकीय चर्चा झडायच्या. आरडी बर्मनच्या म्युझिकने धुमाकूळ घातला होता, त्यामुळे एखाद्या घरातला रेडिओ कट्ट्यावर आणून त्यावर गाणी ऐकणं हा छंद. आदर्श बाळगावा अशी माणसं गावात होती, गावाच्या बाहेर पण होती. त्यांच्याबद्दल मतभेद होते पण आदर होता त्यामुळे कट्ट्याला त्या माणसांबद्दल बरचसं चांगलं ऐकता यायचं. मुलांच्या चर्चांमध्ये पटकन नोकरी मिळत नाही म्हणून निराशा असायची पण तरीही उमेद संपल्याची भावना नसायची.
कट्ट्यावर कोणाला कोणाच्या ओळखीने नोकरी लागली आणि तिथे कशी वशिलेबाजी चालते ह्याच्या चर्चा रोज असायची आणि अर्थात कोण कोणाच्या प्रेमात आहे आणि प्रेमभांगाने विव्हळणं कट्ट्याने अनेकदा ऐकलेलं. ह्या कट्ट्यावरच सार्वजनिक गणपतीची कल्पना सुचली. वर्गणीसाठी पहिल्या काही वर्षांमध्ये मुलांची झालेली धावपळ कट्ट्याने पाहिली होती. पुढे कट्ट्यावरची मुलं मोठी झाली, अनेकांची लग्न झाली, खांद्यावरची मुलं आली. पण लेट नाईट सीटिंग नसल्यामुळे कट्ट्यावर येणं नियमित होतं. आता कट्ट्याच्या पायऱ्या म्हणजेच दुकानाच्या पायऱ्या बऱ्यापैकी झिजल्यासारख्या झाल्या होत्या. कारण मालकाला दुकान धड चालवायची इच्छा नव्हती.
आता कट्टयावर सुरु झालेला गणपती उत्सव चांगला दशकभर जुना झाला होता. आता गणपतीच्या ५, ७ दिवसांत मान्यवर वक्ते, गायक येऊ लागले होते. आणि ह्यासाठी धावपळ करणारी एक तरुण पिढी पण आली होती. त्या पिढीने कट्ट्याच्या जवळ दुसरा कट्टा शोधला होता.
जुन्या कट्ट्यावरची आता तरुण न राहिलेले सदस्य ह्या नवीन कट्ट्यावरच्या मुलांकडे बघून नाकं मुरडायची, त्यांना सल्ले द्यायचा प्रयत्न करायची. त्यांना इथे नोकरीचा अर्ज कर अमुकतमुक ओळखीचा आहे असं सांगायची. काही जणं अर्ज करायचे आणि इमानेइतबारे नोकरी करायचे पण काहींना स्वप्न होती दुबईत जायची किंवा कुठल्यातरी अरबांच्या देशात. आता त्या भागात एक चहावाला आणि पानसुपारी विकणारा आला होता. त्यामुळे तर दिवसा पण येऊन उभं रहायची सोय झाली आणि वेळ काढायला कारण पण.
संध्याकाळी नव्या कट्ट्यावर सिगरेट्सचा धूर असायचा, आणि नवीन मुलांसोबत कधीकधी एखादी मुलगी असायची. मुलगी चार, पाच मुलांच्या घोळक्यात उभं राहून बिनधास्त चहा पिते ह्याचं जुन्या कट्ट्याला अप्रूप आणि थोडी असूया पण. नव्या कट्ट्यावर आता चर्चांमध्ये धर्म पण डोकवायचा. मुठी आवळून चर्चा बऱ्यापैकी होऊ लागल्या होत्या. 'कसले आदर्श...सगळं झूठ...' ह्या भावनेमुळे नव्या कट्ट्याला सगळ्यांचा उल्लेख एकेरीत ऐकायची सवय लागली होती ज्याने जुना कट्टा अस्वस्थ व्हायचा.
कोणी किती पटवल्या इथपासून दूर मुंबईत शौकिनांसाठी काय काय मज्जा असते ह्याच्या रंजक गप्पा कट्ट्यावर वाढू लागल्या. जसा टीव्ही रंगीत झाला होता तसा कट्टा पण रंगीत झाला होता.
नवा कट्टा लग्न जमवण्याचा अड्डा कधी झाला हे कळलंच नाही. आणि एखादी मुलगी होकार देत नाही म्हणून मनगटावर ब्लेड फिरवून आलेला आशिक जुन्या कट्ट्याने नाही पण नव्याने नक्कीच पाहिला होता. कधीकधी कट्ट्यावरच्या एखाद्याने कुठल्यातरी मुलीची छेड काढली म्हणून पोलिसांची फेरी पण झालेली. त्यावेळेला जुन्या कट्ट्यावरच्या सदस्यांनी मध्यस्थी केली. आता हा कट्टा गावाच्या मध्यात येऊ लागला होता. कट्ट्यावर बाईक्सची संख्या वाढली.
जुन्या कट्ट्यावरचे सदस्य बहुतांश तेच होते पण नव्या कट्टयावरचे सदस्य २,३ वर्षांनी बदलायचे. कोणी अमेरिकेला गेला, कोणी दिल्लीला गेल्या अशा बातम्या कळायच्या. आता सार्वजनिक गणपतीच्या नियोजनात जुन्यांना वावच नव्हता. कमिटीमधल्या नवीन मुलाना मिरवणुकीला डीजे हवा होता. ह्या मुद्द्यावर जुन्या आणि नव्या कट्ट्यावर खडाजंगी झाली. पण नव्या कट्ट्याने स्थानिक नगरसेवकाकडून दणदणीत वर्गणी आणल्यामुळे जुना कट्टा बोलू शकत नव्हता.
आता जुना कट्टा पार झिजला होता. पायऱ्या तुटल्या होत्या आणि त्याचे सदस्य पण आता साठीकडे झुकले होते. ते नियमित यायचे पण आता त्यांच्यातल्या काहींनी लाफ्टर क्लब लावला होता. एकेकाळी कट्ट्यावर खिदळणारा सदस्याला हसण्यासाठी क्लब लागायला लागला. नवा कट्टयावर मेम्बर्स यायचे पण त्यांच्यात फारसा संवाद नसायचा. मोबाईलने त्यांना वेगळा कट्टा दिला होता. नव्या कट्ट्यावर मुलांच्या इतक्याच मुली पण असायच्या. तोंडातुन धूर आणि शिव्या सारख्याच निघायच्या.
एके दिवशी अचानक तिथली सगळी दुकानं पाडायचा निर्णय झाला. त्यामुळे कट्टा पोरका झाला. दुकानं पाडायच्या आधल्या दिवशी जुन्या कट्ट्यावरचे सदस्य जमले. त्यांनी आठवणी जागवल्या. फोटो काढले. नवीन दुकान होईल त्यावर रात्री येऊ अशी आशा बाळगत निघाले. अवघ्या दोन वर्षात तिथे एक मोठं कॉफी शॉप झालं. कॉफीची किंमत ३०० रुपये आणि नावं पण उच्चारायला विचित्र. जुना कट्टा खट्टू झाला. नवीन कट्ट्याला फरक पडत नव्हता. त्यांच्यातील काही नगरसेवकाच्या ऑफिसच्या बाहेर तर काही त्या नवीन कॉफीशॉपमध्ये भेटू लागले. जुने सदस्य शहरभर आपल्याला आपला जुना कट्टा कुठे मिळेल का शोधत फिरत आहेत.
Comments
Post a Comment