अतिरेक श्रम प्रतिष्ठेचा
काही वर्षांपूर्वी दिल्लीतल्या हिमाचल भवन मध्ये अनेकदा रहायचो. एकदा इथला मुक्काम जरा दीर्घ होता. सुट्टीच्या दिवस होता. ज्यांच्यासोबत काम करत होतो त्यांचा फोन आला की माझा एक मित्र तुला भेटायला येईल. भेटून घे त्याला.
दुपारी १२ वाजता त्या मित्राचा फोन आला की मी आलोय, खाली ये. मी म्हणलं तुम्ही वर या इथे एक चहा पिऊ. तर त्याने स्पष्ट नकार दिला.
मी खाली गेलो. चाळीशीच्या आसपासचा एक मुलगा समोर आला. धारदार नाक, त्याहून धारदार नजर, अंगकाठी शिडशिडीत. त्याने स्वतःची ओळख करून दिली. आणि म्हणाला की हे सरकारी गेस्ट हाऊस आहे इथे कसली कसली लोकं येत असतील, राजकारणात बरबटलेली, असल्या जागेत जाणं मी टाळतो म्हणून मी वर नाही आलो.
ह्या मुद्द्यावर तो १० मिनिटं बोलला.
मग मला विचारलं, खाना तो खाओगे ना मित्र? मी म्हणलं हो. तर समोर एका ढाब्यासारख्या दिसणाऱ्या खोपटात घेऊन गेला. म्हणाला मी अशा जागा शक्यतो निवडतो कारण इथे येणारी माणसं ही कष्ट करून अन्न कमवतात, आणि त्याहून महत्वाचं अन्न वाढणारा चांगल्या मनाचा असतो. हे असले निष्कर्ष त्याने कुठून काढले माहित नाही. पण एक कळलं होतं की ह्याच्याशी वाद घालायचा नाही, ह्याची फिलॉसॉफी ऐकून घ्यायची.
जेवण झालं मग मात्र मी ठरवलं की ह्याला त्या सरकारी गेस्टहाऊसमध्ये न्यायचं. थोडा वाद घातला आणि गडी चक्क तयार झाला. वर आला. पण रूममध्ये अंग चोरून बसला होता, जणू काही तिथली कुठलीतरी घाण ह्याच्या अंगाला लागेल. तोंडाची टकळी मात्र जोरात सुरु होती. बोलताना एक गोष्ट जाणवली की हिंदी, इंग्रजी भाषांवर कमालीची पकड, तत्वज्ञान हा विषय कोळून प्यायलेला आहे. बोलण्यात कायम तिरकेपणा आणि जगावर राग असल्याचा फील येत होता.
असं होता होता संध्याकाळ झाली. मला म्हणाला की तुझी बॅग भर. ही रूम सोड आणि माझ्या घरी रहायला चल. अवघ्या ५ तासांची ओळख, मी हो म्हणणं शक्यच नव्हतं. पण ह्याने मला जवळजवळ खाली ओढत आणलं. माझ्या विरोधाला त्याचं उत्तर होतं की, ह्या अभिरुची नसलेल्या लोकांच्यात का रहायचं? ज्या लोकांना श्रम करणं माहित नाही अशा लोकांच्यात का रहायचं आहे तुला? आणि बॅग घेऊन मेट्रो स्टेशनच्या दिशेने चालू लागला. ज्यांच्यामुळे ह्या माणसाशी ओळख झाली त्यांना फोन करून सगळा वृत्तांत सांगितला तर ते म्हणाले तो मनस्वी आहे, पण प्रेमळ आहे. जा तू.
त्याच्या घराच्या जवळच्या मेट्रो स्टेशनला उतरलो तो पर्यंत थंडी वाढायला लागली होती. मी त्याला म्हणलं थंडी खूप आहे नेहमीच्या रिक्षेने जाऊ तर भडकला. म्हणाला ते रिक्षेवाले ऐतखाऊ असतात त्यांना कष्ट मान्य नाहीत. हे सायकल रिक्षावाले कष्ट करतात, त्यांचा सन्मान करायलाच हवा..
घरी कुटुंबाशी ओळख करून दिली. माझ्या सारख्या आगंतुकाची बहुदा घरच्यांना सवय असावी कारण कुठेच परकेपणा जाणवला नाही. जेवायला बसल्यावर हा मित्र स्वतःच्या मुलाला एकच गोष्ट सांगत होता, 'बेटा यह जो अच्छा खाना खा रहे हो उसको अर्जित करना सीखो, मेहनत से कभी डरना नहीं।' इत्यादी. जेवताना मला हा संवाद जरा अप्रस्तुत वाटत असला तरी घरच्यांना सवय असावी. छान जेवण झालं. मग त्याच्या रूममध्ये घेऊन गेला. पुस्तकांचा ढीग होता त्या रूममध्ये . तत्वज्ञान, मिनिमलिझम, जगाचा शोषणाचा इतिहास, भारताचा प्राचीन इतिहास, आणि सेल्फ डिसिप्लिन ह्या विषयांवरच्या पुस्तकांची रेलचेल होती. तोवर माझ्या लक्षात आलं की ही गाडी नक्की कुठे चालली आहे.
हा मित्र त्याच्या क्षेत्रात पारंगत, मनाने निर्मळ पण कमालीच्या तिरसटपणाने अनेक नोकऱ्या सोडल्या. पण कामात इतका हुशार की अनेक कंपन्या स्वतःहून बोलणं धाडायच्या. कुठेही गेला तरी कामचोर कोण आहेत ह्याची यादी ह्या पठ्ठ्याची पहिल्या दोन,तीन दिवसांत तयार. त्यामुळे नंतर ह्या कामचोरांना सळो की पळो करून सोडणं हा एककलमी कार्यक्रम आणि स्वतःच तत्वज्ञान फावल्या वेळेत सगळ्यांना सांगणं हा छंद.
एक गोष्ट मात्र झाली त्या नंतरच्या दिल्ली ट्रिप्समध्ये हा स्टेशनवर किंवा एअरपोर्टवर येऊन उभा रहायचा आणि रहायला घरी घेऊन जायचा. मला काय हवं नको ते मनापासून बघायचा. इतका चांगला माणूस मात्र बाहेर फारसा कोणाचा आवडता नव्हता. कारण स्वभावातली एक अढी. जग बिन कष्ट करणाऱ्यांनी आणि शोषण करणाऱ्यांनी व्यापलं आहे त्यामुळे जमेल तेंव्हा मी त्यांच्याशी लढाई करणार हा पिंड बनून गेला होता. स्वतः अफाट कष्ट करून वर आला होता. पण ह्या कष्टानीच घात केला होता. स्वतःची श्रमाची, मेहनतीची आणि कमीत कमी गरजा ठेवण्याची तत्व आपण घरच्यांवर पण लादतोय हे लक्षातच यायच नाही. मी कधीतरी तसं म्हणून बघितलं तर म्हणायचा की बदलाची सुरुवात मी केली आहे आणि घरच्यांनी त्यात सामील व्हायलाच हवं.
पुढे कंपनीने कामानिमित्त लंडनला पाठवलं. तिकडे कसाबसा १ वर्ष रमला आणि राजीनामा देऊन परत आला. कारण काय तर मला त्या शहरात जागोजागी केलेल्या शोषणाचे पुरावे दिसायचे. मग एके दिवशी घरच्यांना सांगून टाकलं की ह्यापुढे मी जितक्या माझ्या गरजा आहेत तितकंच कमवणार. तुम्ही तुमचं बघा.
मध्ये काही वर्ष गेली. माझ्या दिल्ली ट्रिप्स कमी झाल्या. हा स्वतःहून फोन करेनासा झाला. मोबाईल फुकट आहे म्हणून तासंतास गप्पा का मारायच्या? उगाच रिसोर्सेसची नासाडी हे नवीन तत्व.
अचानक एके दिवशी फोन आला. हल्ली मी जंगलांच्या जवळ असणाऱ्या गावांमध्ये जाऊन मी अधून मधून तंबू टाकून राहतो. कारण काय तर ही माणसं श्रम करतात, गरजेपुरतं कमवतात.
मी म्हणलं बरं. मग म्हणाला तू पण ये. छान मजा करू. मधल्या काळात 'श्रम करणे' म्हणजे नक्की काय काय करणं ह्याच्या नवीन कल्पना काय विकसित झाल्यात ह्याचा अंदाज नसल्यामुळे मी घाबरून अजून तरी गेलेलो नाही.
Comments
Post a Comment