चष्मेबहाद्दूर
मी पाचवीत असताना शाळेत जरा मागच्या बाकांवर बसायचो. एकूणच शाळेत किंवा कॉलेजमध्ये किंवा कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात मागे बसण्याची मजा औरच. मुळात पुढे बसणं म्हणजे शिक्षकांपासून ते वक्त्यांपर्यंत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय असं वाटतं, त्यापेक्षा आपली तंद्री लावायची असेल तर मागचे बाक बरे.
पण अचानक फळ्यावरचं दिसेनासं झालं, मग जरा डोळे ताणून बघ, शेजारच्याच्या वहीत डोकं घाल, असे प्रकार केले, पण एका शिक्षकाच्या लक्षात आलं, त्यांनी डोळे तपासून यायला सांगितलं. पण तोपर्यंत पुढच्या बाकावर बसायला सांगितलं.
घरी येऊन ही बातमी सांगितली. तात्काळ डोळ्याच्या डॉक्टरकडे नेलं गेलं. मला तोपर्यंत काय पुढे वाढून ठेवलं आहे ह्याचा अंदाज आला होता. डोळ्यावर तो एक लोखंडी जड चष्मा ठेवला आणि वाचायला सुरु करायला सांगितलं. चष्मा लागू नये म्हणून मी फार एकाग्रतेने अक्षरं वाचायला सुरु केली. पण जसं जसं ते पुढे जायला लागले आणि अक्षरांचा आकार छोटा व्हायला लागला, म्हणलं मेलो आता ! करा मान्य, लागला चष्मा. मग शांतपणे ते जे काही काचा बदलत जादूचे प्रयोग करत होते, ते सहन करत, चष्मा लागला आहे ही बातमी ऐकली. बरं डॉक्टरांचा आवाज इतका निर्विकार की बास. अहो मला चष्मा लागला आहे, आता सगळे ढापण्या म्हणून चिडवणार ह्या विचाराने आग आग होत होती. वडील सोबत होते. त्यांनी थेट नेलं चष्म्याच्या दुकानात. तेंव्हा शाहरुख खानचा बाजीगर नावाचा सिनेमा आला होता आणि त्यात त्याने गोल फ्रेम्सचा चष्मा लावला असल्यामुळे, त्याची चलती होती. त्यामुळे आम्हाला तसा चष्मा मिळाला. चष्म्याच्या दुकान मालकाने त्याला दोरी पण घे म्हणून सांगितलं, ज्याला मी कडाडून विरोध केला. चष्मा पडणार नाही इत्यादी उपयुक्तता त्यांनी सांगितली. मी म्हणलं नो म्हणजे नो.
पुढेचार एक दिवसांत चष्मा आला. आणि शाळेत तो घालून जायचा प्रसंग उभा राहिला. मला तर शाळेतच जावंसं वाटत नव्हतं. पण शाळा टळणार नव्हती. मग गेलो जरा धीर करून. शाळेतल्या मित्रांनी जरा कुतूहलाने बघितलं, एक दोन लोकांनी कॉमेंट टाकल्या. काही लोकांनी एकदम हुशार वाटतोस अशी मताची पिंक टाकली. थोडा रिलॅक्स झालो आणि मग अजून एक लक्षात आलं की आता मागच्या बाकावर परत बसायला हरकत नाही कारण आपल्याला चष्मा लावून का होईना पण स्पष्ट दिसतंय. त्यामुळे चष्म्याचं दुःख मागे पडलं.
पुढे चष्मे तुटणे, नंबर वाढणे, जी फ्रेम दुकानात बरी वाटली ती घरी आल्यावर छान ना वाटणं, चष्मा वेळेत न सापडणं, चष्मा असल्यामुळे स्मार्टपणाचे मार्क कमी असे शिक्के मारून घेणं, पावसाळ्यात भिजताना चष्मा काढला तर वांदे आणि ठेवला तर पाणी ओघळून पुन्हा न दिसणे असे अनेक मनस्ताप सुरूच राहिले. ह्यात स्वतःच्याच डोळ्यात बोट घालून लेन्स सरकवणे ह्यासाठी लागणारं धैर्य आपल्याकडे नाही, हे माहित होतं त्यामुळे आलिया भोगासी असावे सादर म्हणत चष्मा ढकलत होतो. मध्येमध्ये लोकं उपाय सांगायचे त्यात गाजरं खा रोज, मग ससा खाणार नाही इतकी गाजरं खा, मग काय डोळ्यावर पाण्याचे खूप हपके मारा, पार बुबुळं बाहेर येतील इतकं पाणी मारणं, मग कोणीतरी सांगितलं की गवतावर चाललं की नंबर कमी होतो मग गवत शोधत जाणे इत्यादी अनेक उपाय केले. पण लक्षात आलं की चष्मा जातो अशा उपायांनी ही अंधश्रद्धा आहे आणि तिचं निर्मूलन आपणच करावं.
मग चष्मा आहे तसा स्वीकारला. पुढे अचानक एका सार्वजनिक कार्यक्रमात डोळ्यांचे विख्यात डॉक्टर,लहाने सर भेटले. म्हणाले चष्म्याचं ऑपरेशन करू तुझं, ये उद्या, परवा. तोपर्यंत ह्याबद्दल काहीच माहित नव्हतं. पण गेलो जेजे हॉस्पिटलला. त्यांनी डॉ. शशी कपूर नावाच्या, नावाप्रमाणेच अभिनेत्याइतक्याच देखण्या दिसणाऱ्या डॉक्टरांकडे पाठवलं. माणूस एकदम जॉली, म्हणाले कधी येणार ऑपरेशनला. मी म्हणलं येतो, गुरुवारी. ते म्हणाले भारत-पाकिस्तान मॅच आहे त्या दिवशी. मी म्हणलं त्यापेक्षा चष्म्याला मोक्ष मिळणं महत्वाचं आहे. ते हसले म्हणाले काही टेस्ट कर आणि ये.
गेलो. त्यांनी सगळा जामीनामा चढवला आणि मला डोळ्यात भूल दिली. पुढे टेबलावर झोपवलं आणि लेसिक सर्जरी सुरु केली. २० मिनीटात खेळ संपला. टेबलावरून उतरवलं तर बाहेर काचेच्या आड उभे असलेले वडील स्पष्ट दिसले, चष्म्याशिवाय. शब्दशः शिट्ट्या मारत नाचावं वाटलं, पण डोळे जाम चुरचुरत होते. डॉक्टर म्हणाले संध्याकाळपर्यंत असंच राहील मग वाटेल हळूहळू बरं.
डोळे इतके चुरचुरत होते की घरी जाईपर्यंत उघडणं शक्यच नव्हतं पण जरा उघडले तर आपल्याला चष्म्याशिवाय दिसतंय हा आनंद जाणवत होता. शेवटीपुढे २,३ दिवसांत औषधं घातली डोळ्यात आणि छान दिसायला लागलं. उगाच कॉन्फिडन्ट वाटायला लागलं. मग चष्म्याचा राग आला आणि तो कचऱ्यात फेकला. म्हणलं परत आला तर.
पुढे डॉक्टर शशी कपूर ह्यांच्याशी एकदम जानी दोस्ती झाली. त्यांना भेटायला अनेकदा जेजे हॉस्पिटलला जायला लागलो. तिकडे अनेक जण ऑपरेशनच्या रांगेत बसलेले दिसायचे. काहींशी बोलायचो. त्यांच्या व्यथा ऐकून कसंसं व्हायचं. मुलीचं लग्न चष्मा आहे म्हणून ठरत नाहीये, चष्मा आहे मुलीला तिला स्वीकारतो पण हुंडा द्या, गावात लोकं हसतात, मुलं टिंगल करतात इथपासून ते नोकरी मिळायला अडचण आहे इथपर्यंत लोकांच्या व्यथाच व्यथा. बरं अतिशय गरीब परिस्थितीतून आलेली ही माणसं, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून यायची. खूप अपेक्षा असायच्या त्यांच्या. मुलीचा चष्मा गेल्यावर आनंदाने पेढे घेऊन आलेली माणसं पाहिली. मग लक्षात आलं की आपण चष्म्याचा बाऊ उगाच करत होतो, माझं तसं काहीच अडत नव्हतं. चष्म्याच्या हव्या त्या फ्रेम्स, हव्या त्या लेन्सेस सगळं शक्य होतं. शहरांत चष्मा असणं काही वेगळं नव्हतं. उलट ते कॉर्पोरेट जगात स्मार्टनेसचं लक्षण होतं तरी आपण बाऊ केला.
इथेतर अनेकांच्या आयुष्यात चष्मा लागणं आणि तो जाणं हा टर्निंग पॉईंट आहे हे जाणवायला लागलं.
त्यानंतर कुठलीही व्यक्ती चष्मा लावून दिसली आणि ती यशस्वी आहे, सुखी आहे हे दिसलं की बरं वाटतं. कारण चष्मा हे दृष्टीला दिलेलं हे एक्स्टेंशन आहे तो काही शाप नाही हे आज देखील आपल्या समाजात लोकांना कळलेलं नाही हे मी जवळून बघितलं आहे. ही लघुदृष्टी जेंव्हा जाईल तेंव्हा कमकुवत दूरदृष्टी चष्म्याने सुधारून घेणारे आयुष्यात सुखी होतील.
Comments
Post a Comment