'नॉस्टॅलजिया' हा शब्द ऐकला की छे ते दिवस, छे त्या आठवणी, असं म्हणत तो बंद झालेला कप्पा असं सर्वसाधारणपणे मानण्याचा कल आहे. जुन्या आठवणी, जे हरवलं आहे ते पुन्हा मिळणार नाही ह्याची खात्री बाळगत, आता कशाला पुन्हा दुःखाला ऊत आणा ही एकूणच धारणा. पण'नॉस्टॅलजिया'ची पण एक ताकद असते, ती तुम्हाला पुन्हा तरुण करू शकते, एकत्र जोडू शकते हे मी नुकतंच अनुभवलं. 

'गतवैभवात रमू नका' असं म्हणणाऱ्या मला पण माझ्या धारणा किती चुकीच्या आहेत ह्याची जाणीव करून दिली. शिवेंद्रसिंह डुंगरपूर नावाचे एक गृहस्थ, सिनेमाची उत्तम समज असलेले, स्वतः काही सिनेमे, जाहिरातींचं, डॉक्युमेंट्रीजचं दिग्दर्शन केलेली व्यक्ती. गेली अनेक वर्ष विस्मरणात ढकललेल्या किंवा निर्मात्यांकडून गहाळ झालेल्या किंवा त्यांची नीट देखभाल न झालेल्या सिनेमांची रीळ घेऊन येतात, त्यावर काम करून त्यांचं डिजिटायझेशन करतात, ह्यासाठी देशाच्याच नाही तर अगदी दक्षिण आशियातील कुठल्याही कोपऱ्यात त्यांना अशी रीळ आहेत असं कळलं तर त्यांची टीम तिकडे पोहचते, ती रीळ ताब्यात घेऊन ती जितकी वाचवता येतील, पुन्हा प्रेक्षकांपर्यंत नेण्याच्या लायकीची करता येतील त्यासाठी अतोनात प्रयत्न करतात. आणि हे सगळं निव्वळ सिनेमा ह्या कलेवरचं प्रेम म्हणून. ह्यातून अर्थार्जन आहे का? अजिबात नाहीये, उलट पदरमोड आहे आणि ह्या कामासाठी सातत्याने पैसे उभे करावे लागत आहेत. 

 पण हे सगळं का करायचं तर, अस्तंगत झाला आहे असं वाटणाऱ्या प्रत्येक सिनेमाचं एकूणच सिनेमाच्या इतिहासात स्थान आहे, ते आपलं गतवैभवआहे, ते राखलं पाहिजे. त्या त्या सिनेमाशी अनेकांच्या काही आठवणी जोडल्या गेल्या असतील त्यांना तो काळ पुन्हा अनुभवता यावा, जगता यावा ह्यासाठीच हा सगळा अट्टाहास. 

 अशाच अस्तंगत झाल्या आहेत पण टीम डुंगरपूरनी वाचवलेल्या फिल्म्सचा एक फेस्टिव्हल मुंबईतल्या रिगल सिनेमात चालू होता. त्याचं उदघाट्न सोहळ्याला गेलो होतो. मुळात रिगल सिनेमा हाच एक नॉस्टॅलजिया. माझ्या रिगल सिनेमाच्या आठवणी खूप नाहीत पण ज्या आहेत त्या मात्र फार छान, कारण आयुष्याच्या पहिल्या २० वर्षात जो काही इंग्रजी सिनेमा पाहिला, तो इथे पाहिला होता. 

पण तिथे आलेला बहुसंख्य वर्ग हा रिगल सिनेमा शब्दशः जगला होता, बहुसंख्यांच्य वय ५५ ते ६० च्या पुढचं. पण सिनेमा ही कला आहे आणि कलेचा जसा आस्वाद घ्यायला हवा तशी मानसिकता जोपासलेला वर्ग. सुरुवातीला फिल्म फेस्टिव्हलचं उदघाट्न झालं.

 अभिनेता बोमन इराणींनी एक छोटं भाषण करताना गतस्मृतींना उजाळा दिला, पण तो उजाळा छान होता, खंत नव्हती, असलीच तर हे सगळं नष्ट करायला निघालेल्याना एक हलकी चापटी होती. 

मग गुलजार साहेब बोलले. गुलजार साहेब स्टेजवर उभेराहिले, माईक हातात घेतला, आणि त्यांचा चिरपरिचित पॉज त्यांनी घेतला, आणि त्या क्षणाला आख्ख थिएटर एकदम स्तब्ध झालं कारण आता कुठल्याही क्षणाला आता तो खर्जातील आवाज बाहेर येईल, जे शब्द कानावर पडतील ते साठवून घेऊ. आणि मुळात जमलेला प्रेक्षक आठवणींचा कप्पाच छान सांभाळून ठेवलेला. 

गुलझार साहेब जे बोलले ते प्रासंगिक बोलले पण तो आवाज कानात शिरून, जणू आठवणींचा एक एक कप्पा तिथल्या सगळ्यांचा मनातला अलगदपणे उघडत होता. मैफिलीला पहिलाच सूर उत्तम लागला. आणि पुढे १० मिनिटांच्या विश्रांतीनंतर पडद्यावर एक वादळ आलं, ज्याने मात्र तिथे जमलेल्या प्रत्येकाला ८७ मिनिटांत हलवून सोडलं, मोकळं केलं. 

A Hard Day's Night हा सिनेमा. 'बीटल्स'च्या आयुष्यातील ३६ तासांवरचा हा सिनेमा. इंग्लंडमधल्या लिव्हरपूलहुन ते ट्रेनने लंडनला एकाटेलिव्हिजन रेकॉर्डिंगसाठी येत असतात. तो प्रवास आणि लंडनमधला त्यांचा काळ ह्या काळात 'बीटल्स'च्या आणि बीटल्स पैकी एक पॉलमॅकार्टनीच्या आजोबांच्या उचापत्यांमुळे हा प्रवास प्रेक्षकांसाठी फुल विनोदी होतो. 

पण ह्या विनोदापेक्षा बिटल्सची छोटी ८ गाण्यांनी सिनेमागृह उचंबळून जात होतं. मागेपुढे बसलेला प्रत्येक जण ती गाणी गुणगुणत होता. बिटल्सच्या एंट्रीला, त्यांच्या भोवती पडललेल्या चाहत्यांच्या गराड्यांच्या सीन्सला भरभरून दाद होता. आपण पण असेच वेडे झालो होतो हे बहुदा आठवत होता. कदाचित अरे वेडेपणाच वय संपलं असं उगाच घोषित केलं असं त्यांना वाटून पण गेलं असेल.

 जसा जसा सिनेमा पुढे जात होता आणि बिटल्सचे परफॉर्मन्सेस पडद्यावर येऊ लागले आणि सिनेमाचं वातावरण भारून गेल्यासारखं झालं होतं. कित्येकांचे पाय बसल्या जागी थिरकत होते, औचित्याची बंधनं स्वतःहून घातली नसती तर अनेकांनी मध्ये येऊन, थकलेल्या गुडघ्यांची पर्वा न करतानाचून पण घेतलं असतं. पण हा होता नॉस्टॅलजिया वर्गाच्या मनात सुरु असलेला उन्माद. 

मागे ३,४ मुली होत्या. वय असेल १८,२०... त्या देखील तितकच समरसून क्षण आणि क्षण एन्जॉय करत होत्या. किंचाळत होत्या. सगळ्यात महत्वाचं भान विसरल्या होत्या आणि भान विसरलो तरी कोणी नाक मुरडणारे नाही ह्याची त्यांना खात्री होती. 

सिनेमा संपला. लाईट लागले. प्रेक्षकांचं भान हरपलं होतं, टाळ्यांचा कडकडाट झाला. पहिल्या पिढीतल्या प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज दिसत होतं. अरे काय गमावून बसलो होतो असे भाव होते. पण ह्या चार मुलींसाठी तो नॉस्टॅलजिया नव्हता, तो अनुभव होता, आणि तो अनुभव, ती जागा त्या सेल्फी घेऊन, फोटोज घेऊन कॅमेऱ्यात साठवून ठेवत होत्या.

 'नॉस्टॅलजिया'ला कधी कधी नाकं मुरडणारा मी ते बघून हललो. वाटून गेलं की कोणी धडपडून गतवैभव दाखवलं छान पद्धतीने तर पुढे पण कोणीतरी असतीलच की त्याचा आनंद लुटणारे आणि हा आनंदच त्यांची प्रेरणा असेल, हे वैभव राखण्यासाठीची.

 काहीतरी मनाच्या कप्प्यात घेऊन तर उमेदीने जगायचं आहे मग जे जे मिळेल ते साठवावं, जे गवसलं आहे ते शोधत रहावं आणि मिळालं की मनसोक्त उपभोगावं. मनाच्या कायम सुरु असलेल्या घुसळणीतल्या एका वळणवाटेवरचा हा साक्षात्कार. आणि ह्याच साक्षात्काराच्या साक्षीने वळणवाटाच्या वाचकांची रजा घेतो.

Comments

Popular posts from this blog

तर्कबुद्धीचा उतारा

ट्रम्प आणि देशीवाद

मराठी जगाची खिडकी युट्युब व्हावी