सहानभूती? नो वे...

 'Stop playing victim in situations you’ve created and then flip the story to manipulate people to think you’re innocent.'

अज्ञात... 


व्हिक्टीम कार्ड खेळणारे आणि त्या आड स्वतःच्या मर्यादांना लपवणारी माणसं तुम्ही मी सगळ्यांनी पाहिली असतील. स्वतः कडच्या एखाद्या अभावाचं किंवा स्वतःवर झालेल्या अन्यायाचं सातत्याने प्रदर्शन करून लक्ष वेधणारी माणसं ही जास्त धोकादायक असतात. ती धोकादायक अशासाठी असतात की ती तुम्हाला त्यांच्याबद्दल स्वतंत्र विचार करायला देत नाहीत. ह्यासाठी त्यांच्याकडे अन्यायाच्या, अभावग्रस्तपणाच्या कथांचा संग्रहच असतो. आपण सगळे जण कमी जास्त फरकाने ह्या सगळ्याला बळी पडतो आणि हे करताना स्वतःच एक खूप महत्वाचं नुकसान करून घेतो ते म्हणजे नकळतपणे 'कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट' ह्या कल्पनेला आपण छेद देतो. आणि अशांच्या गराड्यात जर अडकलो तर तुमच्या आयुष्यातील उतार सुरु होणार हे नक्की. (यशस्वी माणसं, यशस्वी माणसांच्या गराड्यात का राहू इच्छितात ह्याचं कारण हेच असावं की त्यांना त्यांच्या रोज स्पर्धा करायची आहे ह्या भिनवलेल्या तत्वाला कुठेही भेग पण पडू नये असं वाटत असावं.)


काल सन्मा. उद्धव ठाकरे ह्यांच्याकडून त्यांचा पक्ष आणि चिन्ह निघून गेल्यावर, एकूणच समाजमाध्यमांवर त्यांच्या विषयी जसे विनोद आणि मिम्स बघायला मिळाले, तशाच सहानुभूतीच्या पोस्ट्स पण बघायला मिळाल्या. सहानुभूतीच्या पोस्ट्स येणार हे नक्की फक्त त्याचं प्रमाण आणि त्यातील आक्रोश पाहून माझं कुतूहल जागृत झालं की, हे सगळं कशातून येतं? थोडा विचार केल्यावर लक्षात आलं की उद्धव ठाकरेंनी आज नाही गेली अनेक वर्ष ज्या पद्धतीचं स्वतःबद्दलच नरेटिव्ह उभं केलं त्यातून ही सहानभूती त्यांना मिळाली आहे. समजा विचार करा की हे सन्मा. शरद पवार ह्यांच्याबाबत घडलं असतं तर इतका आक्रोश झाला असता का? तर उत्तर आहे नाही.. कारण मुळात शरद पवार हे योद्धा आहेत. पण उद्धव ठाकरेंनी कळत-नकळतपणे स्वतःची प्रतिमा ही बिचारी करून ठेवली आणि त्याला कालच्या घटनेनंतर सहानुभूतीचा प्रतिसाद मिळाला. 


पण ही सहानभूती , फक्त उद्धव ठाकरेंच्या बाबतीत नाही तर इन जनरल कोणावरही दाखवून आपण कळत नकळत स्वतःच, त्या माणसाचं आणि एकूणच पुढच्या पिढ्यांचं नुकसान करत नाहीयोत का?

उद्धव ठाकरे राजकारणात आले, त्यांनी शिवसेनेत स्वतःची फळी उभी करायला सुरुवात केली, पुढे त्यांनी 'मी मुंबईकर' नावाची एक कॅम्पेन करून पाहिली. ते स्वतःला रुजवत होते, त्यासाठी त्यांनी थेट वारस असल्याचा फायदा घेतला पण किमान त्यांच्यात काहीतरी मिळवायची इच्छा होती आणि त्यासाठी संघर्ष करायची तयारी होती. हरकत नाही. पण पुढे सन्मा. नारायण राणे, सन्मा. राज ठाकरे ह्यांच्यावर खापर फोडून त्यांनी दीर्घ काळ स्वतःच्या मर्यादांवर पांघरून घालून घेतलं. नारायण राणेंनी किमान उद्धव ठाकरे नाव घेऊन तुफान शाब्दिक हल्ला केला आणि आज देखील करत आहेत, पण राज ठाकरेंनी काही अपवाद वगळता उद्धव ठाकरेंवर थेट बोलणं टाळलं. नारायण राणे आणि राज ठाकरे नसलेली तेंव्हाची शिवसेना, उद्धव ठाकरेंना हवी तशी चालवायची संधी होती. स्वतःच एक नरेटिव्ह सेट करण्याची शक्यता होती. पण त्यांच्याकडून तसं काहीच घडलं नाही. 


पुढे बाळासाहेबांकडून शिवसैनिकांना आवाहन करवून घेतलं गेलं की माझ्या पुढच्या पिढ्याना सांभाळा. (हे आवाहन करून घेतलं असेल असं मी मानतो, कारण बाळासाहेब वयाच्या आणि करिअरच्या ज्या टप्प्यावर उभे होते तिथे माणूस श्रांत झालेला असतो, खूप ऑब्जेक्टिव्हली गोष्टींकडे बघायला लागतो, तो अंतर्मुख होतो. अशी व्यक्ती असं आवाहन मनापासून करणार नाही असं मला वाटतं. पण नक्की काय घडलं असेल हे सांगता येत नाही... असो )


पुढे बाळासाहेबांचं निधन झालं, आता खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरे हे पक्षाचे सर्वेसर्वा होते. केंद्रात आणि राज्यात काँग्रेस- राष्ट्रवादी गाळात जाण्याचा काळ सुरु होता. भाजपचा वारू चौफेर दौडायला लागला होता, सन्मा. नरेंद्र मोदी देशभर पसरत होते. आणि ह्याचा लाभ आपल्याला होणार हे उद्धव ठाकरेंना नक्कीच जाणवलं असणार. अशावेळेस शिवसेनेचं पुनर्निर्माण, काही नवीन नरेटिव्ह आणि अर्थात मुंबईसारख्या महानगरात काहीतरी वेगळं जिद्दीने करून दाखवण्याची संधी आणि वेळ उद्धव ठाकरेंकडे होता. पण व्हिक्टीम कार्ड खेळण्याची टेंडन्सी असलेली व्यक्ती ही कायम इनसेक्यूअर असते, अस्थिर असते. भाजपचा वारू दौडायला लागल्यावर उद्धव ठाकरेंच्या मनात अस्वस्थता दाटून यायला लागली. आपल्यासमोर ज्युनिअर असलेला पक्ष इतका मोठा होतोय हे स्वीकारणं त्यांना अवघड होत असणार. काळ बदलतो, तशी माणसं बदलतात ती मोठी होतात हे न स्वीकारता येणं हे कमकुवत मनाचं लक्षण असतं. जे उद्धव ठाकरेंच्या बाबतीत जाणवलं. 


२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालं पण उद्धव ठाकरेंना पण जोरदार लॉटरी लागली. स्वतःचे १८ खासदार दिल्लीत असणं, ह्याचा फायदा स्वतःला रुजवायला खूप उत्तम पद्धतीने करून घेता आला असता. पण मुळात काही अजेंडाच नव्हता, तो देतील अशी माणसं सोबत नव्हती आणि देऊ शकणारी माणसं जवळ पण करायची नव्हती. त्यामुळे खुज्यांची फौज होती जी फक्त एकच करू शकतात तुम्हाला अधिक इनसेक्युअर करू शकतात आणि अस्थिर करू शकतात. 


पुढे २०१४ च्या विधानसभेत शिवसेना भाजप वेगळी लढली आणि शिवसेनेचे ६५ आमदार निवडून आले. तेंव्हा स्वतंत्र अस्तित्व दाखवायची संधी होती पण सत्तेच्या लालसेपोटी तेंव्हाची शिवसेना सत्तेत सामील झाली. जर तेंव्हा शिवसेना ठाम राहिली असती तर कदाचित एनसीपी आणि भाजपने सरकार स्थापन केलं असतं. 


पण विरोधी पक्ष नेतेपद शिवसेनेकडे आलं असतं आणि त्यांना राज्यभर पसरण्याची संधी मिळाली असती. मुळात विरोधी पक्षाचं राजकारण करण्यात हयात गेलेला पक्ष असल्यामुळे अजून ५ वर्ष सत्तेच्या बाहेर राहिले असते तर फरक पडला नसता. पण तेंव्हा कच खाल्ली आणि भविष्यातील बंडाची बीज रोवली. सत्ता न बघितलेल्या आमदाराला ५ वर्षांची सत्ता मिळाली आणि चटक लागली... 


२०१४ ते २०१९ राज्यात आणि केंद्रात सत्तेत राहून विरोधी पक्षासारखे वागत होते. पक्षाच्या मुखपत्राचा संपादक अजेंडा ठरवत होता. आणि सत्तेचा फायदा संघटनेला होत नव्हता कारण ह्यांचं सत्तेत पण मन रमत नव्हतं आणि सत्तेबाहेर जायची तयारी नव्हती कारण पुन्हा एक निगेटिव्ह विचारसरणी, की मी खायला तर देईन शेळीला पण तिच्या अंगाला अन्न लागेल अशी शांतता पण देणार नाही. 


त्यात २०१७ ला मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत स्वबळावर शिवसेना लढली. भाजपपेक्षा ४ का ५ नगरसेवक जास्त निवडून आले. तेंव्हा माझी माहिती असं सांगते की भाजपचा महापौर बसायची तजवीज झाली होती. पण युती टिकायला हवी म्हणून देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेचा महापौर बसू दिला आणि भाजप वॉचडॉगच्या भूमिकेत गेला. पुढे पुन्हा एकदा अस्थिर मानसिकतेतून मनसेचे ६ नगरसेवक फोडले. आपण काय कृती करतोय ती का करतोय ह्याचं उत्तर जर फक्त अस्वस्थता असं असेल तर जे होतं ते उद्धव ठाकरेंचं होतं. 


२०१९ साल उजाडलं. २३ जानेवारी २०१९ ला पंढरपूरला उद्धव ठाकरेंनी केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात वाट्टेल तशी गरळ ओकली आणि २९ जानेवारीला युतीची घोषणा केली. ६ दिवसांत मतपरिवर्तन व्हावं असं काय घडलं? तर उत्तर आहे, मनातील न्यूनगंड, ज्याला अमित शाह ह्यांनी प्रत्यक्ष घरी येऊन गोंजारलं. 

अजून एक कारण ज्यामुळे युतीची घोषणा केली असेल ती म्हणजे,  'आपण इतकी वर्ष वाया घालवली, आपण काहीच नवीन उभं केलं नाहीये तर घ्या संधी साधून दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिण्याची' ही दुसरी मानसिकता. 


पुन्हा एकदा भाजपला विक्रमी यश मिळालं. आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथविधीच्या वेळेस पुन्हा अपशकुन केला. जर रामविलास पासवान ह्यांना किंवा अकाली दलाला किंवा अनुरप्रिया पटेल ह्यांच्या पक्षाला जर बरं खातं मिळू शकतं तर १८ खासदार निवडून गेलेल्या शिवसेनेला का नाही ? ह्याला कारण असं की संवाद नाही, दिल्लीत सोडा राज्यात सुद्धा कोणाशी बोलायचं नाही आणि भाजप हा पक्ष मोठा झाला आहे हे न स्वीकारणं आणि नसलेल्या शक्तीवर विश्वास ठेवणं. 


पुढे २०१९ च्या विधानसभेनंतर जे घडलं त्यात नवीन काही सांगण्यासारखं नाही. देंवेंद फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे ५ वर्ष ज्यांच्या सोबत सत्ता राबवलीत त्यांचा फोन पण तुम्ही घेणार नसाल आणि फसवणूक करणार असाल, तर भाजप हातात ग्लोव्जह घालून रिंगणात उतरली आणि मारला प्रतिउत्तराचा ठोसा, तर व्हिवळयाचं का? भाजप बरोबर अकाली सत्तेत होते, नितीश कुमार सत्तेत होते, ते पण बाहेर पडले पण त्यांना संपवायच्या आकांताने भाजप का नाही उतरली? कारण अकाली दलाबद्दल एक आदर असावा असं मला नेहमी वाटतं आणि नितीश कुमार इत्यादी हे घनघोर मेहनत करणारे नेते आहेत.


भाजप पूर्ण ताकदीने सूड उगवेल ह्याचा अंदाज जर उद्धव ठाकरे आणि राऊतांना आला नसेल तर ते कोणत्या तरी कल्पनाविलासात रमणारे आहेत आणि अशांच्या राजकारणात किंवा कुठेच काय उपयोग? ममता बॅनर्जी ते तेजस्वी यादव ते भारत राष्ट्र समितीचे केसीआर हे घनघोर मेहनत करू शकतात आणि २४ तास सतर्क असतात, अशांना फारसा दगाफटका पण करणं शक्य नाही. इथे सत्तेत असून देखील तुम्हाला आमदार अस्वस्थ आहेत, ते फुटू शकतात हे कळत नसेल तर तुमचं तुमच्या कामावर म्हणजे राजकारणावर प्रेम नाही. आणि ज्यांचं कामावर प्रेम नाही अशांना कधीच कुठल्याच महत्वाच्या जबाबदाऱ्यांवर ठेवू नये हा वैश्र्विक नियम आहे. 


पण इतकं होऊन देखील उद्धव ठाकरेंना जर सहनभुतीची अपेक्षा असेल तर त्यांचं कठीण आहे. हे करून ते स्वतःच नाही तर आदित्य ठाकरेंचं राजकारण धोक्यात घालत आहेत. मुळात उद्धव ठाकरे हे रिलक्टंट पॉलिटिशियन. फार आतून वाटत नसताना एखाद्या क्षेत्रांत उतरल्यावर, सर्वसाधारणपणे अशी लोकं जे करतात, ते उद्धव ठाकरेंनी केलं. त्यांनी सहानभूती हा पाया बनवला. उद्धव ठाकरेंकडे फार कल्पना कधी आहेत असं जाणवलं नाही, पण आदित्य ठाकरेंकडे त्या


आहेत असं वाटतं आणि राजकारणाबद्दल एक कुतूहल मिश्रित प्रेम आहे असं जाणवतं. पण आज सहानभूती मागून उद्धव ठाकरे पुन्हा जर ह्या वादळातून बाहेर पडायचा प्रयत्न करणार असतील तर त्यांना थोडाफार फायदा होईल पण ह्यातून आदित्य ठाकरेंच्या राजकारणाचं अतोनात नुकसान आहे. 


मी पण चुकलो, जे झालं ते झालं, आता नवी सुरुवात असं केलं तर लोकं स्वीकारतील... पण जर जुनी रडगाणी लावलीत तर उद्धव ठाकरे ह्यांचं राजकीय करिअर कठीण आहे. आणि असं झालं तर खेद वाटायला नको, कारण ह्यापुढे फक्त उद्धव ठाकरेच नाही तर कोणीही फक्त सहानभूती मागत असेल आणि आपण त्यांना ती देणार असू तर होणाऱ्या नुकसानाची मनाची तयारी करा. अफाट आणि प्रामाणिक मेहनत करून अपयश आलं तर एकदा सहानभूती जरूर द्यावी, पण शॉर्टकट्स घेणाऱ्यांना, नो वे... 












Comments

Popular posts from this blog

तर्कबुद्धीचा उतारा

ट्रम्प आणि देशीवाद

मराठी जगाची खिडकी युट्युब व्हावी