उजव्या लाटेचा सांगावा
एक २५ वर्षांपूर्वी ऑस्ट्रियाच्या 'फ्रीडम पार्टी ऑफ ऑस्ट्रिया'ने जेंव्हा १९९९ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये २७% मतं मिळवली आणि ते पुढे तिथल्या सरकारचा भाग बनले तेंव्हा संपूर्ण युरोपातच नाही तर पार अमेरिकन राजनय (डिप्लोमॅटिक) जगात हाहाकार माजला होता. व्हिएन्नाशी राजकीय संबंध तोडून त्यांच्यावर काही निर्बंध पण लादले होते. अगदी आत्तापर्यंत, म्हणजे एक १० वर्षांपूर्वी पर्यंत ऑस्ट्रियन नागरिक मी 'फ्रीडम पार्टी ऑफ ऑस्ट्रिया' चा मतदार आहे हे सांगताना काहीसा कचरायचा. पण ह्या पक्षाचं ध्येय धोरण हे आता ऑस्ट्रियन राजकारणात अगदीच रुळायला लागलं आहे. 'फ्रीडम पार्टी ऑफ ऑस्ट्रिया' चा सरळसरळ झुकाव हा हिटलरच्या नाझी विचारसरणीशी आहे आणि ह्या पक्षाचे पूर्वीचे नेते हे तर हिटलरच्या 'एसएस' ह्या निमलष्करी दलातील अधिकारी होते.
फ्रान्समध्ये 'नॅशनल रॅली' (आधीचा 'नॅशनल फ्रंट') ह्या पक्षाच्या जिन-मेरी -ल-पेन ह्यांच्यासोबत तेंव्हाचे फ्रान्सचे अध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या जॅक शीरॅक ह्यांनी तर, निवडणुकीच्या आधीच्या चर्चांमध्ये 'नॅशनल फ्रंट' सारख्या अतिउजव्या पक्षासोबत बोलणं सुद्धा महापाप आहे असा पवित्रा घेतला होता. त्याच अति उजव्या विचारधारेच्या पक्षाने फ्रान्सच्या मागच्या सार्वत्रिक निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली होती. इतकी जोरात की इम्युनल मॅक्रोन हे पुन्हा फ्रान्सचे अध्यक्ष होतील की नाही अशी शंका निर्माण व्हावी इतकी जोरात ती मुसंडी होती. आणि हो, कदाचित येत्या निवडणुकीत जिन-मेरी-ल-पेन ह्या फ्रान्सच्या अध्यक्ष होऊ शकतात. आणि त्यात नहाल मेरझोउक ह्या १७ वर्षीय अल्जेरियन-मोरोक्कन तरुणाची फ्रेंच पोलिसांनी केलेल्या गोळीबारात हत्या झाल्यावर फ्रान्समधल्या उपनगरांमध्ये ज्या पद्धतीचा वणवा पेटला, तो बघून फ्रेंच नागरिकांमध्ये स्थलांतरितांच्या विरोधातील राग उफाळून येऊन 'नॅशनल रॅली' सारख्या अतिउजव्या पक्षाला अधिक बळ मिळालं तर आश्चर्य वाटायला नको. त्यात एक आकडेवारी असं देखील दर्शवते की आत्ता फ्रान्समध्ये १८ ते २५ वयोगटातील ८३% तरुण-तरुणींच्या आई-वडिलांपैकी कोणीतरी एक निर्वासित आहे. त्यामुळे फ्रेंच नागरिकांच्या मनात राग किती खदखदत असेल ह्याचा विचार पण करवत नाही.
इटलीमध्ये बेनेतो मुसोलिनीच्या पाडावानंतर पहिल्यांदाच अतिउजवा आणि प्रखर राष्ट्रवादी पक्ष सत्तेत आला आहे, त्याचं नाव आहे 'ब्रदर्स ऑफ इटली'. ह्या पक्षाने तर मुसोलिनीच्या नातीलाच रोमच्या महापालिका निवडणुकांमध्ये उमेदवारी दिली होती. ह्यावरूनच ह्या पक्षाची विचारधारा किती प्रखर राष्ट्रवादी आणि अतिउजवी आहे हे लक्षात येईल. आज इटालियन पंतप्रधान ४६ वर्षांच्या जॉर्जिया मेलॉनी ह्या 'ब्रदर्स ऑफ इटली' ह्या पक्षाच्या पंतप्रधान आहेत. इटलीचं बेरोजगारीचं प्रमाण जवळपास ८% आहे एकूण लोकसंख्येच्या ६० लाख लोकं म्हणजे जवळपास ९% लोकं हे निर्वासित आहेत. निर्वासितांच्या बाजूने असणाऱ्या डाव्या विचाररणीच्या पक्षांवर आरोप करताना मेलॉनी बाई तर प्रचारात सरळ सरळ आरोप करायच्या की ह्या पक्षांना इटालियन माणसाला हद्दपार किंवा नामशेष करून संपूर्ण इटलीला निर्वासित आणि आश्रितांचा देश बनवायचा आहे. त्यात इटलीचा जन्मदर हा १.२ अपत्य इतका खाली घसरला आहे. त्यात जर बाहेरची लोकं अशीच येत राहिली तर इटालियन संस्कृती आणि ख्रिश्चन धर्मच इटलीतून नामशेष होईल असा प्रचार त्यांनी सार्वत्रिक निवडणुकीत केला आणि त्यांचा पक्ष सत्तेत आला. आणि एक गोष्ट विसरून चालणार नाही की हा पक्ष २०१२ साली स्थापन झाला होता आणि त्यांना पहिल्या निवडणुकीत अवघी २% मतं होती आणि दहा वर्षात हा पक्ष सत्तेत आलाय. त्यामुळे युरोपातील एका प्रमुख देशांत राष्ट्रवाद आणि अति उजवी विचारसरणी कशी वेगाने फोफावत आहे हे लक्षात घ्यायला हवं.
दहा वर्षांपूर्वी नॅशनलिस्ट कॅथलिक काँझर्व्हेटिव्ह (व्हॉक्स) पक्ष स्पेनमध्ये जन्माला आला. प्रखर राष्ट्रवाद, कडवा धर्मवाद, परंपरावाद, आणि अर्थातच निर्वासितांच्या विरोधातील राग आणि वेगाने वाढणाऱ्या इस्लामी जगातील निर्वासितांच्या विरोधातील कडवी भूमिका ही ह्या पक्षाची ध्येय धोरणं आहेत. गेल्या ३० वर्षात स्पेनमध्ये राहणाऱ्या मुस्लिमांची लोकसंख्या दहापटीने वाढली आहे. स्पेनमधील स्थानिक निवडणुकांमध्ये कॅथलिक काँझर्व्हेटिव्ह पक्षाला मतदारांचा जोरदार प्रतिसाद मिळाला, इतका की मध्यममार्गी भूमिका घेणाऱ्या पक्षांना ह्या पक्षाशी युती केल्याशिवाय सत्तेत बसणंच कठीण होतं. येत्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये हा अगदी थेट सत्तेत नाही गेला तरी बहुमताच्या जवळ जाईल असा एक अंदाज आहे. थोडक्यात ह्या पक्षाशी युती केल्याशिवाय कुठलाही पक्ष स्पेनमध्ये सत्तेत येऊच शकत नाही.
नेदरलँड्समध्ये 'जिर्त वाईल्डर्स' ह्या नेत्याच्या 'पार्टी फॉर फ्रिडम' ह्या इस्लाम आणि निर्वासित विरोधी भूमिका घेणाऱ्या पक्षाला बरे दिवस येऊ लागले आहेत. मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये जिर्त वाईल्डर्स हे त्यांच्या इतर सहकारी पक्षांच्या मदतीने बऱ्यापैकी मुसंडी मारतील असं चित्र आहे. करांमध्ये सवलत, युरोपियन युनियनचं अवास्तव महत्व कमी करण्यासाठी प्रयत्न करणं, तुर्कस्तानसारख्या देशाला युरोपियन युनियनमध्ये येण्यास कडवा विरोध, नेदरलँड्समध्ये डच शिवाय इतर कोणतीही भाषा शिकवण्यास मज्जाव आणि सत्तेत आल्यास पुढची ५ वर्ष एकही नवीन मशीद उभारण्यास बंदी आणेन आणि इमामांना इस्लामचे धडे देण्यास बंदी घालेन अशी आश्वासनं निवडणुकीत घेऊन उतरणारा पक्ष, २०२५ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये यशस्वी होऊ शकतो.
जर्मनी ज्या देशाने २०१५ च्या सीरियाच्या आयसिस आक्रमणानंतर मोठ्या संख्येने सीरियन निर्वासितांना आश्रय दिला, आणि जो देश दुसऱ्या महायुद्धानंतर ज्यूंच्या छळछावण्या आणि हिटलरच्या युद्धपिपासू वृत्तीची भरपाई म्हणून निर्वासितांच्या बाबतीत कायमच कनवाळू राहिला त्या जर्मनीत 'ऑल्टर्नेटीव्ह फ्युअर डॉइशलँड' हा अतिउजव्या विचारांचा पक्ष लोकप्रिय होऊ लागला आहे. सर्वधर्मसमभाव आणि निर्वासितांविषयीची व्यापक भूमिका घेणारा जर्मनी ही एक अभेद्य भिंत होती, ज्या भिंतीलाच आता तडे जाऊ लागले आहेत.
स्वीडन, फिनलंड, डेन्मार्क ह्या देशांमध्ये काही फार वेगळी परिस्थिती नाही. अगदी २०१६ मध्ये युरोपियन युनियनमधून बाहेर पडलेल्या ब्रिटनमध्ये देखील हीच भावना घर करू लागली आहे.
थोडक्यात युरोपात प्रखर राष्ट्रवादी राजकीय पक्ष व विचारसरणीचा उदय होत आहे व त्याला जनमताचा पाठिंबाही हळूहळू वाढत आहे. एकेकाळी ह्या देशांनी, इथल्या मानवतावादी संघटनांनी बहुसांस्कृतिकवाद, मानवतावाद ह्याचे दाखले देत इराक, सीरिया, अफगाणिस्तान, मोरोक्को, अल्जेरिया आणि आफ्रिकेतील अनेक देशांतील निर्वासितांना आश्रय दिला. त्यावेळेला शब्दशः रस्त्यावर आलेला हा निर्वासित स्वस्तात, पडेल ते काम करायला तयार होता. जगण्याचा भीषण संघर्ष पाहिलेला, पोटात आगडोंब घेऊन आलेला निर्वासित जसा इथे रुळायला लागला तसा त्यांनी त्यांचा धर्म, परंपरा ह्या देखील त्या त्या देशांत रुजवायला सुरुवात केली. त्यातून पुढे हक्काची भावना निर्माण झाली आणि संघर्षांला सुरुवात झाली.
२००८ च्या जागतिक आर्थिक मंदीच्या सावटातून युरोपातील अनेक देश आज देखील पूर्ण बाहेर पडलेले नाहीत. त्यात युरोपियन युनियनच्या देशांतील जर्मनी, इटली, फ्रान्स आणि आधी इंग्लंडसारखे देश वगळले तर बाकी देशांची आर्थिक स्थिती यथातथाच, पण ह्या सधन देशांना, उधळपट्टी करणाऱ्या देशांचं ओझं वाहव लागत होतं. २००८ च्या जागतिक आर्थिक मंदीपर्यंत सगळं ठीक होतं, मग मात्र सधन देशांमध्ये युरोपियन युनियन ह्या कल्पनेच्या विरोधात आवाज तीव्र होऊ लागला. त्यात आधी २००१ ला अमेरिकेवरचा अतिरेकी हल्ला, अल-कायदा, आयसिसचा उदय, आणि २०१५ ला सीरियातून आलेल्या निर्वासितांच्या लोंढ्यानी तर युरोपात राग खदखदू लागला. बाहेरचे आणि मूळचे हा संघर्ष सुरु झाला. मुळातच धर्मप्रसारासाठी ख्रिश्चन आणि इस्लाम ह्यांच्यात अनेक शतकं लढाया झाल्या आहेत. त्यात बाहेरच्यांनी येऊन आमच्या रोजगारावर, आमच्या साधनसंपत्तीवर दावा सांगायला सुरुवात केली आहे हे दिसल्यावर तर हा राग टोकाला जाऊ लागला. आज पण युरोपातील एका वर्गाची भूमिका बहुसांस्कृतिकवादाची आणि मानवतावादाची आहे पण त्यांना पण जाणवू लागलं आहे की लोकभावना दुसरीकडेच जात आहे.
त्यातच ब्रिटनने घेतलेली ब्रेक्झिटची भूमिका आणि २०१६ ला डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून येणं ह्यातून तर युरोप अधिक वेगाने अति-उजव्या विचारसरणीकडे झुकू लागला आहे.
डोनाल्ड ट्रम्प येण्याच्या आधी ट्रम्प येतील हे आक्रीत वाटावं अशी परिस्थिती होती, पण ट्रम्प आले, ते गेले ,पण आता बदलेल्या परिस्थितीत एका सर्वेक्षणानुसार ५ पैकी २ अमेरिकन उघडपणे १८६१ ते १८६५ च्या अमेरिकन सिव्हिल वॉरचं समर्थन करतो, इतकंच नाही अमेरीकेत एखादा हुकूमशाह आला आणि त्याने सगळ्या निर्वासितांना धडा शिकवला तरी चालेल असं म्हणण्यापर्यंत मजल गेली आहे. त्यामुळे युरोपात जी अति-उजवी विचारधारा मूळ धरू लागली आहे ती अधिक घट्ट होईल हे नक्की. हां फक्त ही फक्त मुस्लिम निर्वासितांपुरती मर्यादित राह्त्ये का ती गोऱ्या गोऱ्या वर्णवर्चस्ववादाकडे जाईल हे बघणं उत्सुकतेचं आहे
Comments
Post a Comment