मराठी पाऊल का अडखळते ?
'मराठी माणसाच्या महत्वकांक्षा बोथट झाल्या आहेत का?', 'बरं चाललं आहे की, कितीही मिळालं तरी कमीच असतं' ह्या विचारपद्धतीत मराठी माणूस अडकला आहे का ?,
'उत्तुंग काही तरी करावं, घडवावं अशी एकूणच मराठी समूह मनाची इच्छाच संपली आहे का?'लेखाच्या सुरुवातीलाच तीन प्रश्न जे काहीसे अप्रिय, आणि राग आणणारे वाटतील पण एकूणच चित्र बघितलं तर हे मान्य करायला कितीही जड गेलं ,तरी हे वास्तव आहे. काहीतरी मिळवण्याच्या किंवा घडवण्याच्या महत्वकांक्षेच्या स्पर्धेत एकूणच मराठी समाज मागे पडत चालला आहे.
ह्यात आत्ता अगदी सुरुवातीलाच सांगतो की जे जे मुद्दे मी उपस्थित करणार आहे, त्यात सन्माननीय अपवाद आहेत आणि त्या माणसांविषयीचं कौतुक आणि कृतज्ञता हे दोन्ही आहे. पण म्हणून प्रत्येक क्षेत्रांत हाताच्या बोटावर मोजण्याइतके लोकं हेच जर आपलं यश मानत असू तर मात्र मराठी समूहमनाला आत्मपरीक्षणाची गरज आहे.
ह्यात मराठी म्हणजे कोण, इथे पिढ्यानपिढ्या राहिलेले, वालचंद परिवार, फिरोदिया, बजाज ह्यांना आपण मराठी मानून आणि ते कसे उत्तम मराठी बोलतात इत्यादी बाबींवर समाधान मानून त्यांना आपलं म्हणा, ह्या खटपटीत गुंतणार असू तर मात्र पालथ्या घड्यावर पाणीच म्हणावं लागेल. पण ही असली खोट्या अभिमानाची झूल उतरवावीच लागेल. आज वास्तवाच्या आरश्यात डोकावून जे खरंखरं प्रतिबिंब समोर येईल ते स्वीकारावंच लागेल.
निफ्टी ५०, थोडक्यात नॅशनल स्टॉक एक्सेंजवर सर्वाधिक भांडवल असणाऱ्या ५० कंपन्या ज्यांच्यांतल्या शेअर्सच्या उलाढालीवर शेअर बाजाराचा नूर ठरतो त्या ५० कंपन्यांपैकी एकही कंपनी मराठी माणसाच्या मालकीची नाही. पण ह्याला उत्तर आहे की, 'मराठी माणसाच्या रक्तात व्यवसाय नाही.' धंदा करावा तर गुजराती, मारवड्यानीच. बरं हे म्हणताना ह्या ५० कंपन्यांपैकी सगळ्या कंपन्या ह्या फक्त गुजराती मारवाडी लोकांच्याच आहेत असं नाही.
त्यात तमिळ, आंध्रप्रदेश, पंजाबी, अशा भाषिक समूहातून येणाऱ्या लोकांच्या देखील आहेत. हे सांगायचा उद्देश इतकाच की धंदा रक्तात असावा लागतो हे वाक्य आपण सहजपणे स्वीकरतो आणि एक गोष्ट सोयीस्करपणे विसरतो की ज्यांच्या रक्तात व्यवसाय आहे असं आपण म्हणतो त्यांच्या समाजात व्यवसाय चालला नाही, किंवा धंदा बुडित निघाला अशी ढिगांनी उदाहरणं असतात. एखादं दुकान सुरु असतं आणि एके दिवशी त्या दुकानात सेल लागतो, सगळं सामान ५०% सवलतीत देऊन जे मिळेल ते पैसे घेऊन मालक निघून जातो आणि काही महिन्यांत तिथे नवीन दुकान येतं. हे होत असताना कोणाचा तरी धंदा मनाजोगता किंवा नफ्यात चालला नाही हे आपल्या मनात देखील येत नाही?
बरं निफ्टी ५० सोडूया, काही दश-हजार कोटींचं भांडवल असलेल्या कंपन्यांबद्दल, बोलूयाच नको. पण काही हजार करोडोंची उलाढाल आहे आणि ती कंपनी शेअरबाजारात सूचिबद्ध आहे आणि त्या कंपनीचा पाया एका मराठी माणसाने घातला आहे असं उदाहरण पर्सिस्टंट सिस्ट्म्सचे आनंद देशपांडे, एस.एच. केळकर आणि अर्थात भारत फोर्जचे बाबा कल्याणी आणि असे एखाद दोन अपवाद सोडले, तर मराठी नावं दिसतच नाही.
ह्यावर एक उत्तर कायम समोर येतं ते म्हणजे, 'अरे इतकीच नावं असणार ना? अजून किती हवी नावं?'
पण हे करताना आपण कोण आहोत? आपली परंपरा किती उज्वल आहे, ज्यांनी फक्त महाराष्ट्राला नाही तर देशाला प्रेरणा दिली अशी किती माणसं आपल्याकडे होऊन गेली ह्याचा जर विचार केला तर आपण ज्याला यश मानतो ते खरंच यश मानायचं का? का मान्य करायचं की हो आम्ही समाज म्हणून मागे पडलो.
मागच्या सहस्त्रकात जेंव्हा परकीय आक्रमणांचा धुमाकूळ सुरु होता, आणि स्वराज्याचा विचार सुद्धा देशातील एकाही प्रांताला शिवत नव्हता, तेंव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं, हे तेंव्हाच्या हिंदुस्थानातील स्वकीयांचं पहिलं आणि एकमेव राज्य. पुढे मराठेशाहीने पार अटकेपार झेंडा रोवला. आणि ब्रिटिशांनी सुद्धा भारतावर युनियन जॅक फडकवायच्या लढाईत जो शेवटचा निकराचा संघर्ष केला तो देखील, मरहट्ट्यांच्या साम्रज्याशीच. पुढे १८५७ च्या बंडाच नेतृत्व सुद्धा महाराष्ट्रातच फुललं आणि १८५७ च्या बंडानंतर जेंव्हा ईस्ट इंडिया कंपनीकडून ब्रिटनच्या राजाच्या वतीने बसणाऱ्या प्रमुखाकडे कारभार गेला तेंव्हा सगळ्यात जास्त ब्रिटिश साम्रज्याला भीती जर कोणाची होती तर ती मराठी माणसांचीच.
देशातील स्त्री शिक्षणाचा पाया महात्मा ज्योतिबा फुले आणि सावत्रीबाई फुलेंनी घातला. बाळशास्त्री जांभेकरांना आपण 'दर्पण' कार म्हणून ओळखतो पण 'बालविवाह' प्रथेवर सडकून टीका करत ह्या प्रथेविरुद्ध आवाज उठवला. तिकडे बंगाल प्रांतात , १८५५ साली पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर ह्यांनी विधवा पुनर्विवाहाला मान्यता मिळावी म्हणून सरकारकडे पाठपुरावा केला. पुढे एका वर्षात तत्कालीन ब्रिटिश सरकारने त्याला मान्यता दिली आणि ह्यातून विधवांच्या पुनर्वसनाची एक मोठी चळवळ महाराष्ट्र आणि बंगाल प्रांतात सुरु झाली. ह्यात महाराष्ट्रात पंडित विष्णू परशुराम शास्त्रींनी पुढाकार घेतला.
महादेव गोविंद रानडेंचं तर देशाच्या बौद्धिक आणि सामाजिक जडणघडणीतील योगदान तर अतुलनीय आहे. संततिनियमन हा विषय जेंव्हा बोलणं देखील पाप होतं त्यावेळेस धोंडो केशव कर्वे ह्यांनी ह्या विषयावर जागरूकता निर्माण केली. देशातील महिलांसाठीच पहिलं विद्यापीठ, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) विद्यापीठ महाराष्ट्रात सुरु झालं. पंडिता रमाबाई, डॉ आनंदीबाई जोशी ह्या महाराष्ट्रातल्याच.
इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना मुंबईतीलच आणि त्याच्या सुरुवातीच्या संस्थांपैकी आणि त्याला आकार देणारे हे मराठीच होते. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात दोनच माणसं अशी निघाली की ज्यांना प्रांतांच्या सीमा रोखू शकल्या नाहीत. ज्यांना पहायला, ज्यांचं बोलणं ऐकायला माणसांचा सागर उसळायचा ते म्हणजे, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि अर्थात महात्मा गांधी.
आणि ह्या देशातल्या लाखो शोषितांना ज्यांच्यामुळे शोषणापासून कायमची मुक्ती मिळाली आणि त्यांना माणूस म्हणून जगायचा अधिकार मिळाला तो डॉ. बाबासाहेब आंबेड्करांमुळेच.
हाच काळ होता जेंव्हा महाराष्ट्रात कला-संस्कृती बहराला येत होती. १८६३ ला मराठी रंगभूमीवर पहिली घंटा वाजली आणि तिथून देशातील एक समृद्ध रंगभूमी जन्माला आली. भारतीय चित्रपटसृष्टीचा जन्मदाता धुंडिराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके हे मराठीच. चित्रपट हा एक मोठा उद्योग ठरू शकतो हे १९१० च्या दशकांत वाटणं आणि त्यासाठी प्रयत्न करणं हेच किती मोठं स्वप्न. मराठी रंगभूमीवर तर नाट्य कंपन्या ह्या हॉलिवूडच्या कंपनी सिस्टमच्या देशी मॉडेलच.
अर्थात पुढे हलत्या चित्रांनी म्हणजे सिनेमा आणि रेडिओच्या आक्रमणात ह्या नाट्य कंपन्या बुडाल्या पण काळानुसार काहीतरी बुडणारच हा नियमच आहे. पण दुर्दैव असं की आपल्याला ह्या बुडण्याच्या कथाच लक्षात राहतात.
युरोपात जे रेनेसॉ पर्व आलं आणि त्यातून नव्या कल्पना, वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना मिळाली, कलेसाठी कला हा विचार उदयाला आला आणि चित्रकला, शिल्पकला असो की संगीत असो ह्यात अद्वितीय प्रयोग झाले आणि ह्या सगळ्यातून औद्योगिकरणाचा पाया घातला गेला आणि नव-विचारांनी राजेशाही कोसळल्या आणि लोकशाहीचे वारे युरोपात वाहू लागले.
साधारणपणे महाराष्ट्रात हेच घडलं, देशाच्या इतिहासातील प्रत्येक नव्या कल्पनेचं, सुधारणेचं बीज ह्या मातीत सापडतं. संगीत, कला, विज्ञान ह्या प्रत्येक क्षेत्रांत जे काही अद्वितीय घडत होतं ते इथेच घडत होतं. त्यामुळे देशाच्या औद्योगिकरणाचा पाया इथेच घातला गेला.
थोडक्यात काहीतरी उतुंग करण्यासाठी, घडवण्यासाठी अत्यंत पोषक जमीन जर कुठे होती किंवा आजही आहे ती महाराष्ट्रातच. आज मुंबईत कमला मिल्स, फिनिक्स मिल्स, एम्पायर मिल्स म्हणलं की डोळ्यासमोर येतात मोठे मॉल्स, रेस्टोरंटस, पब्स, काही कोटींच्या किंमतींची घरं असलेल्या उंच इमारती आणि अर्थात कंपन्यांची ऑफिसेस. पण इथे कपड्यांच्या गिरण्या होत्या आणि ह्या गिरण्या ह्या मुंबईच्या भाग्यविधात्या ठरल्या हे लोकं विसरलात जमा आहेत.
१८५४ ला कावसजी नानाभाई दावर ह्यांनी बॉंबे स्पिनिंग मिल सुरु केली आणि त्यानंतर एका मागो एक जवळपास ८५ मिल्स सुरु झाल्या. ह्यातल्या अनेक मिल्सनी विसावं शतक पण नाही पाहिलं, काही मिल्स टिकल्या. त्यात खटाव, टाटा, मफतलाल, कासलीवाल, ह्यांच्यासारखे अनेक जण यशस्वी झाले. ह्या मिल्समध्ये प्रचंड मोठ्या संख्येने मराठी माणूसच कामाला होता. त्यात कोकणातून आलेल्यांची संख्या मोठी होती. बहुसंख्य मिल्समध्ये कामगारांचं शोषणच होत होतं पण तो रोजगार होता,त्यामुळे आहे ते सोसत पुढे जाण्याशिवाय पर्याय नव्हता.
पण ह्या सगळ्याकडे बघताना एकच प्रश्न पडतो की, ह्यांच्यातील एकाही माणसाला किंवा त्यावेळच्या अगदी मिलमध्ये काम करत नसलेल्या पण आर्थिकदृष्ट्या त्यातल्या त्यात संपन्न असलेल्या व्यक्तीला का वाटलं नसेल की आपण पण एक मिल सुरु करावी. मुळात तेंव्हाही बहुसंख्य मराठी लोकांचं हे शहर होतं, कुठल्याही व्यवसायाला लागते ती जागा मराठी माणसाचीच. अगदी काही परवानग्या किंवा तत्सम काही लागलं तर तो काळ असा होता की एकापेक्षा एक मोठी माणसं ज्यांच्याबद्दल ब्रिटिशांच्या मनात आदर होता ती देखील मराठी होती. त्यांना शब्द टाकून आपण आपली मिल सुरु करावी, असं का वाटलं नसेल. ह्यावर एक प्रश्न समोर आणला जाणार हे माहीतच आहे, तो म्हणजे भांडवलाचं काय? पण भांडवल काय ह्या सगळ्या मिल मालकांनी घरातून थोडंच आणलं असेल, ते त्यांनी पण उभं केलं असेल, मग आपण पण दहा लोकांकडून भागभांडवल उभं करावं असं का वाटलं नसेल?
बरं, धंदा हा फक्त मराठी माणसांचाच बुडतो असं नाही तर तो कालानुरूप नसेल तर कोणाचाही बुडू शकतो. मी लहान असताना श्रीमंत म्हणलं की टाटा, बिर्ला, मफतलाल अशी नावं लोकं सहजपणे घेत. ह्यातले टाटा बिर्ला राहिले पण मफतलाल ह्यांचं काय झालं? आज जवळपास विस्मरणात गेलेला उद्योगसमूह. मफतलाल हे जरी पुढे त्यांचा आवाका टिकवू नाही शकले तरी त्या काळात कवडीमोल भावाने घेतलेल्या जमिनी आज त्यांच्या पिढ्या विकून, त्यातून नवं काहीतरी उभं करण्याची शक्यता तर निर्माण होते.
आपल्या मराठी माणसाच्या एकूणच उदासीन वृत्तीतला एक महत्वाचा भाग म्हणजे, त्याच्याकडे असलेली जमीन ह्याबद्दलची नसलेली कल्पनाशक्ती. आणि खेदाने असं म्हणावं लागेल की ती तेंव्हाही नव्हती आणि आज देखील नाही. 'जमीन' ह्या शब्दाचा अर्थ शब्दर्थाने न घेता तो लक्षार्थाने घ्यायला हवा. जमीन म्हणजे महाराष्ट्राची जमीन, जिचं आकर्षण देशातील सगळ्या प्रांतातील लोकांना आहे. इथे काहीतरी चांगलं करता येऊ शकतं हा विश्वास आहे. ह्या आपल्या महाराष्ट्राच्या 'जमिनीच्या' सुपीकतेचं कौतुक आणि कुतूहल आपल्याला का नाही?
कुठलाही व्यवसाय उभा करायला कल्पना लागते जी प्रत्येक वेळेला अगदी 'ओरिजिनल' असावी लागते असं नाही. आपल्याकडे सुरु झालेले तेंव्हापासून आजपर्यंतचे सगळे उद्योग हे परदेशातील उद्योगांची कॉपीच आहेत. बरं बाहेरच्या माणसाला इथे येऊन रुजाव लागतं, आपल्याला तर सगळंच परिचित. आख्ख आयुष्य एखाद्या शेठच्या झेरॉक्सच्या दुकानावर झेरॉक्स काढणारा किंवा साड्या विकणारा मराठी माणूस, शेठ पगार वाढवत नाही म्हणून खंतावतो. पण मी स्वतःचा पगार स्वतः कमवेन आणि चार लोकांना पगार देईन हा विचार का नाही करत?
मुळात 'लुळ्यापांगळ्या श्रीमंतीपेक्षा धडधाकट गरिबी बरी' अशा आशयाचं वाक्य हे मराठी मनांनी कायम ऐकलेलं असतं, आणि श्रीमंती हे लुळंपांगळ पण का आणते हा प्रश्न आपल्याला कधीच पडला नाही. ह्यात 'पैसा' ह्या गोष्टीबद्दल एकूणच मराठी मनांमध्ये एक अढी असते. पैसा हे साधन असावं पण साध्य नसावं हे अजून एक वाक्य सतत आपल्याला शिकवलं जातं. पण पैसा हे साध्य का नसावं ह्याविषयी आपण कधीच प्रश्न विचारत नाही. खूप पैसा हा कुठल्यातरी वाममार्गानेच कमवावा लागतो असं आपल्याकडे सहज म्हणलं जातं.
पण व्यवसाय करताना कुठेतरी त्या त्या काल-प्रदेशानुसार काही तडजोडी कराव्या लागतात आणि त्या तडजोडी करून जर तुम्ही एखादं उत्तम प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस जन्माला घालत असाल तर त्यात चुकलं काय किंवा कमीपणा तो काय? आज भारतातील मध्यम ते मोठे आकाराचे उद्योगसमूह व्यवसाय करताना काही तडजोडी करत असतील तर तो त्यांच्या इच्छेचा नसून आणि अपरिहार्यतेचा भाग असतो.
ही वाक्य किंवा ही विचारपद्धती कशातून येते, तर मोठ्या यशाची भीती वाटणं ह्यातून येते. एकूणच आपल्याला भव्य यशाची, ते यश तितकंच भव्यपणे साजरं करण्याची आणि त्या यशाचं 'स्टेटमेंट' म्हणून एखादं भव्य घर किंवा तत्सम काहीही जगासमोर दाखवण्याची भीती वाटते. एखाद्याने समजा ४ माणसांसाठी ६ बेडरूमचं घर घेतलं तर आपल्याकडे सहजपणे प्रश्न उपस्थित होतो की, खरंच गरज आहे का इतक्या मोठ्या घराची? ४ माणसंच राहणार ना ? पण ते तुमच्या यशाचं स्टेटमेंट आहे हेच अमान्य असतं. ह्यात अजून एक भाग म्हणजे, समजा उद्या हे सगळं गेलं तर ? गेलं तर गेलं... पुन्हा येईल, किंवा नाही येणार.. पण जेंव्हा ते उपभोगण्याची ताकद आहे तेंव्हा ते जाईल ह्या भीतीने का उपभोगायचं नाही? म्हणूनच मग महत्वकांक्षाना मुरड घाला, माफक यश मिळवा आणि ते मिळालं तरी त्याचा गाजावाजा करू नका ही आपली वृत्ती.
यशाचं एक प्रतीक हे 'पैसा' असतं. मुबलक पैसा ही अतिशय व्यक्तिसापेक्ष संकल्पना आहे हे मान्य. त्यामुळे किती पैसा कमवून काय पातळीवरचं सुख घ्यायचं ही देखील व्यक्तिसापेक्ष संकल्पना आहे. म्हणजे माझ्याकडे एखादी छोटी कार असावी का जरा आरामदायी कार असावी का अतिशय महागडी कार असावी, मला शक्यतो लांबचे प्रवास विमानानेच करता यावेत, मग त्यात अगदी इकॉनॉमी क्लास पण चालेल. का मला कुठेही जाताना बिझनेस क्लासनेच जायचं आहे का मला इतके पैसे किंवा संपत्ती उभी करायची आहे की मला माझं स्वतःच खाजगी विमान वापरता येईल, हा प्रत्येकाच्या कल्पनाशक्तीचा आणि इच्छेचा भाग आहे.
पण मी माझ्या पिढीपुरतं छोटी कार ते बिझनेस क्लास हा प्रवास करेन आणि पुढच्या पिढ्यांसाठी स्वतःच खाजगी विमान वापरता येईल असा पाया उभा करून जाईन असा पाय उभारून जाईन असा विचार करणं काय चुकीचं आहे. ह्यात खाजगी विमान हे लक्षार्थाने घ्यायला हवं. आहे त्यापेक्षा अधिक वरच्या पातळीवर आयुष्य नेईल असं काहीतरी उभं करणं.
आणि इथेच मला अनेकदा असं वाटतं की मराठी माणसांच्या महत्वकांक्षा खुंटतात, कारण आपली legacy किंवा वारसा पुढे काही पिढ्या रहावा असं वाटत नाही.
पुण्यात एकदा एका माझ्या एका व्यावसायिक असलेल्या स्नेह्यांच्या ऑफिसला बसलो होतो. त्या स्नेह्यांचं वय तेंव्हा ५५ च्या आसपास होतं. व्यवसायात माफक यश मिळवलं होतं आणि त्यांची निवृत्तीची भाषा सुरु झाली होती. त्यांच्या ऑफिसमध्ये एक मारवाडी व्यावसायिक बसले होते. दोघांचा व्यवसाय सारखाच, पण त्या मारवाडी माणसाने प्रांजळपणे मान्य केलं होतं की माझे मराठी स्नेही हे जास्त चांगला आणि सचोटीने व्यवसाय करतात. त्यामुळे ते माझ्या स्नेह्यांना निवृत्त होण्याच्या विचारांपासून परावृत्त करण्याच्या धडपडीत होते.
मराठी स्नेह्यांचं उत्तर एकच की अजून पैसे कशाला कमवू, आता मी मनासारखं जगेन, मला जे आवडतं ते करेन इत्यादी. त्यावर मारवाडी गृहस्थ म्हणाले की व्यवसाय मोठा करून पण सगळं करता येईल की. आत्ता आहे त्यापेक्षा अधिक चांगला पगार देऊन सक्षम माणसं ठेव, तुझी मुलं इच्छुक नसतील तर तुझ्या नात्यातील मुलगा शोध त्याला उत्तम पगार आणि नफ्यातील भाग दे, त्याला व्यवसाय सांभाळू दे. कदाचित तुझ्या मुलांना नाही पण नातवाला असं वाटेल की आजोबांचा व्यवसाय पुढे चालवावा. पण ह्या सगळ्यालाच मराठी मित्राचा विरोध होता.
शेवटी मी त्या मारवाडी माणसाला प्रश्न विचारू लागलो की, तुम्ही ह्यांच्याच वयाचे. तुम्ही का व्यवसाय वाढवायचा म्हणताय, तर ते म्हणाले की एकतर हा माझा तिसरा व्यवसाय आहे, हा मी नातवासाठी उभारतोय, आणि मला माझ्या गावात एक शाळा उभारायची आहे त्याची तरतूद व्यवसायातून करेन. पुढे ते एक वाक्य म्हणाले की मी त्या शाळेच्या आसपास ज्या भावाने मिळेल त्या भावाने एकरांनी जमीन घेईन आणि माझा नातवाने ती गुंठ्यांनी विकली तरी चालेल किंवा एखादा व्यवसाय सुरु केला तरी चालेल.
मराठी माणसाच्या महत्वकांक्षेला ज्या मर्यादा येतात त्या मर्यादांमध्ये आपण पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या पिढ्यांसाठी काही उभारावं, किंवा प्रत्येक वेळेला पैसे फक्त चंगळ करण्यासाठी नाही तर एखादी संस्था उभी करण्यासाठी आणि त्या संस्थेतून समाजाचं आणि अर्थात स्वतःच्या कुटुंबीयांचं हित सांभाळावं असं वाटत नाही.
खरंतर स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्रात सहकारातून खूप संस्थात्मक उभारणी झाली आणि त्यातून पश्चिम महाराष्ट्राचा कायापालट झाला. पण पुढे ही भावना पण लोप पावताना दिसली. संपत्ती हाताशी असेल तर तुम्ही स्वतःसाठीच नाही समाजासाठी पण काहीतरी भव्य करू शकता. टाटा समूह हे त्याचं उत्कृष्ट उदाहरण आहे.
आज टाटा समूहाच्या देणग्यांवर किंवा मदतीवर अनेक संस्था उभ्या आहेत, अगदी बेंगळुरूमधल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सपासून ते टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस ते टाटा कॅन्सर हॉस्पिटलपर्यंतच्या अनेक संस्था ह्या संस्था उभारणीची उत्तम उदाहरणं आहेत. बिर्ला परिवाराचं बिट्स पिलानी हे अभिमत विद्यापीठ असो की त्यांनी उभारलेली भव्य मंदिरं असोत. अगदी आत्ता नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर हे मुंबईच्या बीकेसी परिसरातील कल्चरल सेंटर हे बहुदा देशातील अत्युच्च पातळीवरच सेंटर असेल. ह्या सेंटरकडे बघून ह्याचा काय उपयोग असं नाकं मुरडणारे लोकं अनेक आहेत. पण मुळात संपत्ती उभी करून त्यातून स्वतःच्या ब्रँडला जिवंत ठेवणारी आणि मोठी करणारी 'सॉफ्ट पॉवर'ची प्रतीकं उभी करायला जी इच्छा असणे आणि तितकी संपत्ती उभी करणं हेच महत्वाचं आहे.
आणि ह्या सगळ्यापलीकडे जाऊन पैसा हा आयुष्यातील सर्वोत्तम अनुभव विकत घेण्यासाठी मदत करतो हे मान्य करायलाच हवं. जितकं अधिक जग बघाल, उपभोगाल, तितकं मन समृद्ध होतं आणि कदाचित अधिक सृजनशील पण होऊ शकतं.
ह्यासाठी प्रत्येकाने व्यवसायच करायला हवं असं नाही. आणि अगदी निफ्टी ५० कंपन्या समजा तुम्हाला उभ्या नाही करता आल्या तरी त्या कंपन्यांचे सीईओ किंवा बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये मराठी प्राबल्य दिसतं का? तर उत्तर, फारसं नाही असंच आहे. फारसं नाही ह्याचा अर्थ अजिबात नकारात्मक घेऊ नये कारण अगदी हिंदुस्थान युनिलिव्हर सारख्या कंपनीत सध्या चीफ ट्रान्सफॉर्मेशन ऑफिसर म्हणून आणि आधी सुद्धा तितक्याच महत्वाच्या पदांवर काम करणारे नितीन परांजपे असोत की महिंद्रा समूह किंवा टाटा मोटर्ससारख्या कंपन्यांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये मराठी नावं आहेत. पण ज्या पद्धतीने महाराष्ट्रात शिक्षणाच्या संधी गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ उपलब्ध आहेत ते लक्षात घेता हे प्रमाण जितकं लक्षणीय असायला हवं त्या प्रमाणात हा टक्का दिसत नाही.
महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल हा अनेक अर्थानी खूप सारखा आहे. इथली माणसं कलासक्त आहेत, काहीशी संथ आहेत, स्वातंत्र्य चळवळीत ह्या दोन प्रांतांनी खूप मोठं योगदान दिलं. पश्चिम बंगालमध्ये पण व्यापार हा बंगाली माणसाच्या हातात रहायच्या ऐवजी तो मारवाडी व्यापाऱ्यांकडे गेला. पण गेल्या काही दशकांत बंगाल प्रांत सोडून देशात आणि जगभरात गेलेल्या बंगाली लोकांनी खूप मोठी घौडदौड केली. आज कॉर्पोरेट जगात मोठ्या पदांवर बंगाली लॉबी दिसते. ही बंगाली लॉबी एकमेकांना खूप मदत करते. कॉर्पोरेट जगात सुद्धा आपली म्हणावी तशी प्रगती दिसत नाही ह्याला कारण म्हणजे एकदा का वर्षाला ५० ते ७५ लाखांच्या पॅकेजचा टप्पा गाठला की कशाकरता हा सगळा अट्टहास करायचा, कशाला स्वतःला ऑफिसच्या राजकरणात ओढून घेऊन ताण वाढवायचा. एकदा वरचं पद आलं की राजकारण आलं आणि त्यातून येणारा ताण नको. चांगला पीएफ जमा होत आहे, ईएमआय मुक्त घर हे आहे, ह्यावर समाधानी मानणारी अनेक कर्तृत्ववान माणसं आपल्या सगळ्यांच्या पाहण्यात असतील. इथेही सीईओ किंवा मॅनेजिंग डायरेक्टर होऊन हजारो, किंवा लाखो माणसांचं थेट आणि तितक्याच संख्येने असलेल्या गुंतवणूकदारांचं हित जपणं, त्यांचं नेतृत्व करण्याची मजा काही औरच. ह्याचा ताण असणारच, पण हा ताण जर इतरांना जमतो तर मराठी जनांना झेपणार नाही का?
ह्यात अजून दोन कारणं आहेत ती म्हणजे, आपलं शहर, राज्य सोडून बाहेर जायला मराठी माणूस पटकन तयार होत नाही. आणि त्यामुळे विविध वृत्तीच्या आणि प्रवृत्तीच्या लोकांना हाताळण्याच कौशल्य आपल्यात विकसित होत नाही आणि त्यामुळे कॉर्पोरेट जगातलं राजकारण हाताळण्यात आपली क्षमता कमी पडते.
ह्यातलं राजकारण आणि स्थलांतर हे दोन मुद्दे फार महत्वाचे आहेत. मधू लिमये हे एकमेव मराठी नेते किंवा म्हणूया मराठी व्यक्ती जी देशाच्या पार दुसऱ्या टोकाला रुजली. मधू लिमये हे चार वेळा बिहारमधून खासदार म्हणून निवडून आले. महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून मराठी माणूस बाहेरच्या एखाद्या राज्यात इतका रुजला, ह्याचं एकमेव किंवा चला दुर्मिळ उदाहरण म्हणूया.
व्यवसाय असो की राजकारण किंवा कुठल्याही क्षेत्रांत मोठी घौडदौड करायची असेल तर आपल्या 'कम्फर्ट झोन' मधून बाहेर पडावं लागतं. आपला प्रांत, आपली माणसं, आपल्या परिचयाचं हवामान हा सगळा कम्फर्ट सोडल्याशिवाय आणि नव्या अपरिचित मातीत रुजल्याशिवाय प्रगती होत नाही. थोडक्यात दोर कापून टाकायची तयारी हवी. मला नेहमी प्रश्न पडतो की मरहट्ट्यानी पार अटकेपार झेंडा फडकवला, दिल्लीच्या तख्ताला हलवलं पण तिकडे स्वतः न बसता पुन्हा बादशहा का बसवला असेल? ह्यासाठीची कारणं इतिहासकारांकडे असतील, त्यात न जाता, एकच प्रश्न पडतो की आपल्याला अपरिचित गोष्टींचं आकर्षण का वाटत नाही किंवा का वाटेनासं झालं आहे. 'कम्फर्ट झोन' हेच ह्याचं उत्तर आहे.
आज महाराष्ट्रातील हजारो, लाखो मुलांचा, दुर्दैवाने कम्फर्ट हा, कुठल्यातरी, 'दादा', 'भाऊ' 'भाई', 'तात्या' ह्यांच्या मागेपुढे फिरणे, त्यांनी दिलेले टीशर्ट घालून, डीजेवर नाचणं, निवडणुकांमध्ये बिर्याणी, दारुपार्टी, आणि उरलेल्या वेळात मोबाईलचा रिचार्ज ह्यातच आहे. सोशल मीडियावरचे किंवा व्हाट्सअप वरचे मेसेजेस फिरवणे, जात, धर्म ,पंथ ह्यांच्याबद्दलच्या भावना भडकवणारे मेसेजेस एकमेकांच्यात फिरवणे आणि खूप काम करावं लागतं म्हणून नोकऱ्या सोडण्यात ह्यातच जातोय.
ह्यात मराठी अभिजनांमध्ये राजकारणाबद्द्दलची काहीशी घृणाच आढळते. पण राजसत्ता आणि व्यापार किंवा संपत्ती उभी करणं ह्यांचं पूर्वापार नातं आहे हे आपण विसरतो. एअरटेलच्या सुनील मित्तल ह्यांचे वडील हे राजकारणी होते, दोन वेळेस राज्यसभा खासदार होते. सन टीव्ही नेटवर्कचे मारन बंधू हे करुणानिधींचे नातेवाईक तर कॅफे कॉफी डे चे व्हीजी सिद्धार्थ हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस.एम. कृष्णा ह्यांचे जावई. ही तीनही माणसं १००% कर्तृत्वान, त्यांच्या क्षमतांबद्दल शंका घेताच येणार नाही इतके मोठे ब्रँड्स त्यांनी उभे केले, पण राजसत्ता ही व्यवसायाला अगदी अल्प का होईना हातभार लावू शकते हे कसं विसरता येईल. बाकी सोडा 'इन्फ्रास्ट्रक्चर' मध्ये काम करणाऱ्या कंपन्यांमध्ये आंध्रप्रदेशातील कंपन्या दिसायला लागल्या आहेत. मोठे मोठे हायवे ते विमानतळं बांधण्याची कामं त्यांच्याकडे आहेत. आंध्र प्रदेशच्या राजकीय नेतृत्वांच्या मदतीशिवाय हे झालं असेल का ?
दुसरीकडे दरवर्षी लाखो मुलं प्रचंड मेहनतीने आणि आशेने एमपीएससीची तयारी करतात. पण शेवटी सरकारी भरती होणार काही हजारांमध्ये आणि परीक्षा देणाऱ्या तरुणांची संख्या ही काही लाखांमध्ये. पण सरकारी नोकरीचं गारुड आजही मराठी मनावर आहे. एमपीएससीची तडफेने तयारी करणारी मराठी मुलं, त्या तडफेने बँकांच्या परीक्षा देत नाहीत, रेल्वेपासून अगदी इन्शुरन्स कंपन्यांमध्ये काम करण्यासाठीच्या परीक्षा देत नाहीत. ह्याचं उत्तर पुण्यात परीक्षेला आलेल्या काही मुलांनी दिलं ते म्हणाले, ह्या नोकऱ्या मिळाल्या तर महाराष्ट्रातच पोस्टिंग मिळेल ह्याची खात्री नसते. त्यापेक्षा एमपीएससी कसं, महाराष्ट्रातच पोस्टिंग होईल ह्याची खात्री देते. अर्थात हे एकमेव कारण असेल असं नाही, पण इथेही काहीतरी वेगळं शोधण्याची महत्वकांक्षा आणि अपरिचीताच कुतूहल नाही हे महत्वाचं कारण आहे.
ह्याचं प्रतिबिंब अजून एका ठिकाणी दिसतं ते म्हणजे केंद्रीय पातळीवरच्या नोकरशाहीत. इंदिरा गांधींच्या काळात काश्मिरी लोकांचा पगडा दिल्लीच्या नोकरशाहीवर होता, एका टप्प्यावर पंज्याबांचा आला, मग कधी केरळीय तर कधी तामिळ आणि सध्या ओडिया लॉबीचा प्रभाव दिसतो. पण मराठी लॉबी दिल्लीत खूप ताकदवान आहे हे कधीच दिसत नाही. इथेही तीच अडचण आहे की दुसऱ्या राज्याच्या केडरमधून आलेला मराठी अधिकारी तिथे रुजत नाही, त्याला वेध असतात महाराष्ट्रात येता येईल का ह्याचे. त्यामुळे दिल्लीत जाऊन स्वतःच प्रस्थ तयार करायचं, दिल्लीश्वरांशी जुळवून घ्यायचं आणि हळूहळू स्वतःची लॉबी तयार करायची हे आपल्याला जमत नाही. दिल्लीत बसून एखाद्या खात्याचा मुख्य सचिव होऊन आपल्या आसपासच्या माणसांच्या जाणिवांच्या कक्षा रुंदावण शक्य आहे, बरं इतकं काही नसेल करायचं तर निवृत्तीनंतर कॉर्पोरेट जगात जाऊन बोर्ड ऑफ डायरेक्टरवर काम करणं शक्य आहे हे आपल्या लक्षातच येत नाही. आज निरुपमा राव ह्यांच्यासारख्या माजी अधिकारी ह्या २ मोठ्या कंपन्यांच्या संचालिका आहेत. पण दिल्लीत गेलो तरी आपली अवस्था घार उडे आकाशी, चित्त तिचे पिलापाशी अशीच असते.
मराठी माणूस हा व्यक्तिगत क्षमतेत खूप उत्कृष्ट काम करतो पण जेंव्हा समूह म्हणून काम करायची वेळ येते त्यावेळेला त्याच्यातला 'इंडिव्हिज्युलिस्टिक' स्वभाव डोकं वर काढतो. त्यामुळेच मराठी माणसं एकत्र आली आहेत आणि त्यांनी मोठा व्यवसाय उभा केला आहे किंवा संस्था उभ्या करून त्या चालवल्या आहेत हे दिसत नाही. आणि इथेच आपण मागे पडायला सुरुवात होते. दोन गुजराती, मारवाडी, बंगाली, पंजाबी हे एकत्र आले तर त्यांना त्यांची भाषा आणि संस्कृती दिसायला लागते आणि तो त्यांना जोडणारा धागा बनतो, नेमकं उलट आपल्याकडे आपल्याला एकमेकांची जात दिसायला लागते आणि त्यातून त्यांच्यात दरी पडायला सुरुवात होते.
ह्याला कारण हेच की, स्वतःचा प्रांत सोडून कधी बाहेर पडला नाही, कधी मोठं स्वप्न पाहिलं नाही, त्यामुळे 'पणाला लागलंय' अशी परिस्थिती येतच नाही, आणि आपल्याच भूमीत असल्यामुळे दोन वेळच्या जेवणाची सोय होईल ह्याची खात्री असल्यामुळे देशाच्या कुठल्याही प्रांतात मराठी माणूस गेला आणि तिकडे तो राजकारण, अर्थकारण, व्यवसाय ह्यात रुजला आहे आणि खूप मोठं काही करतोय हे दिसतच नाही.
'इंडिव्हिज्युलिस्टिक' स्वभाव हा समूह शक्तीची ताकद कधीच ओळखू शकत नाही, आणि माझ्या बरोबर चार माणसं मोठी झाली तर माझ्या ओहोटीच्या काळात ह्या चौघांपैकी कोणाची तरी भरती मला तारून नेईल हा विचार मनात येऊ शकत नाही. त्यामुळे अशी मनं मोठी स्वप्न पाहू शकत नाहीत.
स्थलांतराच्या मुद्द्यावर मतभेद दर्शवणारा एक मुद्दा समोर येऊ शकतो तो म्हणजे परदेशात स्थायिक झालेला मराठी माणूस. हे स्थलांतर नाकारता येणार नाही आणि त्यातल्या काही मराठी लोकांनी इंग्लंड, अमेरिकेत घेतलेली आर्थिक आणि व्यावसायिक झेप ही मोठी आहे आणि त्याबद्दल कौतुक आहे.
पण, पुन्हा इतर भाषिकांनी ज्या पद्धतीने स्वतःला त्या त्या देशांमध्ये मग व्यावसायिक किंवा तिथल्या सामाजिक क्षेत्रांत रुजवलं तशी उदाहरणं आढळत नाहीत. पंजाब्यांनी कॅनडाचा जवळजवळ ताबा घेतला. गुजरात्यांनी इंग्लंडमध्ये फक्त आर्थिक नाही तर राजकीय वर्चस्व मिळवलं.
वॉरेन बफे ह्यांचा उत्तराधिकारी असू शकतो असं कित्येक वर्ष जगाला वाटायचं ते अजित जैन हे ओडिशामधले. पेप्सीपासून गुगल पर्यंतच्या कंपन्यांचे सीईओ दक्षिण भारतीय. अमेरीकेत तर 'मोटेल्स तिथे पटेल' असं म्हणावं इतका हॉटेल किंवा मोटेल व्यवसाय पटेल लोकांच्या ताब्यात. रघुराम राजन ते गीता गोपीनाथ हे दक्षिण भारतीय. विक्रम सेठ, झुम्पा लाहिरी, अरुंधती रॉय, विक्रम चंद्रा, ह्यांच्यासारखे परदेशस्थ भारतीय लेखकांच्या यादीत एकही मराठी नाव नाही. अमेरिकेत किंवा इतर देशांत जाणाऱ्यांना बहुतांश वेळेस डॉलर आणि रुपयाच्या विनिमयाच्या दरातील तफावत हा आकर्षणाचा बिंदू.
अमेरिकेत एक अपार्टमेंट, गाडी, अजून पैसे साठले तर शक्यतो पुण्यात गुंतवणूक म्हणून घर किंवा घरं ह्यात एक मोठा वर्ग अडकला आहे. अमेरिकेत चांगली कल्पना अफाट पैसा उभा करू शकते किंवा इथे कॉर्पोरेट जगातील स्पर्धा भीषण जरी असली तरी गुणवत्तेला बऱ्यापैकी संधी देणारी आहे ह्याचा विसरच पडतो.
मला मान्य आहे की apple किंवा मायक्रोसॉफ्ट किंवा गुगलमध्ये चांगल्या पदावर काम करणारे अनेक मराठी आहेत, आणि ह्याचा आनंद आणि अभिमान आहे. पण त्यातून ज्या दिवशी एखादा मराठी सीईओ निघेल किंवा एखाद्या मराठी मुलाने/मुलीने अमेरिकेत जाऊन एखादा युनिकॉर्न उभारून, तो विकून बिलियन डॉलर्स कमावले असं वाचायला मिळेल तो आनंदाचा दिवस असेल.
देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष उलटून गेली, पण आज देखील मराठी माणूस पंतप्रधान पदावर बसला नाही ही खंत आहे. पण आता प्रचंड मार्केटिंग आणि ब्रँड उभं करण्याच्या काळात जर आपल्या प्रांतातील एखादा माणूस दिल्लीच्या दिशेने पाठवायचा असेल तर प्रचंड आर्थिक आणि सॉफ्टपॉवर ताकद त्या नेत्याच्या पाठी उभी करावी लागेल. पुढच्या काळात अशी रसद उभी करू शकणारे प्रांत दिल्लीत स्वतःचा जम बसवतील हे जाणवायला लागलं आहे.
काळ झपाट्याने बदलतोय. आशियातील देशांनी जागतिकरणाचे वारे १९९० च्या दशकांत अनुभवायला सुरुवात केली. तेंव्हापासून थॉमस फ्रीडमन ह्यांच्या पुस्तकाचं नाव आहे, 'World is Flat' त्याचा अनुभव यायला लागला आहे. आज संधी ही एका समूहाची किंवा व्यक्तीची मक्तेदारी राहिलेली नाही आणि त्याचवेळेला जगात आता यशस्वी व्हायचं असेल तर एकमेकांना धरून राहणं (Synergy) आणि पुढे जाणं हे अपरिहार्य आहे.
आपल्याला मराठी भाषा, संस्कृती ह्याचं प्रेम आहे आणि ते टिकेल पण त्याचा आदर व्हावा असं वाटत असेल तर पैशाची, यशाची भाषा ही मराठी असावी लागेल त्यासाठी मोठी स्वप्न पाहणारी आणि स्वतःचा कम्फर्ट झोन तोडणारी मनं मराठी असावी लागतील. आत्ताच जग हे अर्थकारणाच आहे, ज्याच्या हाती पैशाच्या किंवा संपत्तीच्या दोऱ्या असतील ती माणसं, तो समूह ह्यांची भाषा, संस्कृती, अगदी खाद्यसंस्कृती स्वीकारायला जग आतुर असतं. कारण जेत्यांनी लिहिलेला इतिहास आणि रुजवलेली संस्कृती हीच कायम राज्य करते हा इतिहास आहे आणि हे असंच राहील.
म्हणून म्हणेन मराठी जनांनी जागतिक पातळीवर स्वतःला सिद्ध करण्याची स्वप्न पहावीत, त्या स्वप्नांना चौकट आपल्या भाषेची आणि संस्कृतीची असावी. असं झालं तर आज कायम इतिहासात, भूतकाळाच्या वैभवात रमलेलं मराठी मन भविष्य घडवण्याची स्वप्न पाहील.
खुप छान लेख आहे, वास्तव समोर मांडले आहेत तुम्ही.
ReplyDelete