कृपया ह्यांना माफ करा

सॅमसंग ह्या दक्षिण कोरियन उद्योगसमूहाचे अध्यक्ष ली जे यंग हे सध्या भ्रष्टाचार आणि लाच देणे ह्या आरोपांखाली जेल मध्ये शिक्षा भोगत आहेत. फोर्ब्सच्या जगातील सर्वाधिक शक्तिशाली लोकांच्या यादीतील हा मानकरी, पण त्याला सुद्धा शिक्षा होऊन जेलमध्ये जाण्याची वेळ येऊ शकते, हे वाचून दक्षिण कोरियात कायद्याची बूज कशी राखली जाते असं आपल्याला वाटू शकेल. पण तसं नाहीये. सॅमसंग समूहाच्या अध्यक्षाला जेलमध्ये रहावं लागतंय ह्याचं दुःख दक्षिण कोरियन उद्योग जगताला पण आहे आणि तिथल्या व्यवस्थेला पण. कारण सॅमसंगची अफाट आर्थिक ताकद. जवळपास २००बिलियन डॉलर्सचा व्यवसाय करणाऱ्या सॅमसंग समूहात, जरी 'सॅमसंग टेलिकम्युनिकेशन', 'सॅमसंग मेडिसन' सारख्या काही कंपन्या असल्या तरी ह्या समूहाची मानांकित कंपनी म्हणजे 'सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स'. ८८ बिलियन डॉलर्सची गंगाजळी घेऊन बसलेली ही कंपनी दक्षिण कोरियन अर्थव्यवस्थेचा कणा आहे. देशातून होणाऱ्या एकूण निर्यातीपैकी जवळपास २५% निर्यात ही एकट्या सॅमसंगची असते. जगातल्या कुठल्याही देशात असते तशीच स्थिती दक्षिण कोरियात पण आहे. काही मोजक्या अतिबलाढ्य उद्...