Posts

'नॉस्टॅलजिया' हा शब्द ऐकला की छे ते दिवस, छे त्या आठवणी, असं म्हणत तो बंद झालेला कप्पा असं सर्वसाधारणपणे मानण्याचा कल आहे. जुन्या आठवणी, जे हरवलं आहे ते पुन्हा मिळणार नाही ह्याची खात्री बाळगत, आता कशाला पुन्हा दुःखाला ऊत आणा ही एकूणच धारणा. पण'नॉस्टॅलजिया'ची पण एक ताकद असते, ती तुम्हाला पुन्हा तरुण करू शकते, एकत्र जोडू शकते हे मी नुकतंच अनुभवलं.  'गतवैभवात रमू नका' असं म्हणणाऱ्या मला पण माझ्या धारणा किती चुकीच्या आहेत ह्याची जाणीव करून दिली. शिवेंद्रसिंह डुंगरपूर नावाचे एक गृहस्थ, सिनेमाची उत्तम समज असलेले, स्वतः काही सिनेमे, जाहिरातींचं, डॉक्युमेंट्रीजचं दिग्दर्शन केलेली व्यक्ती. गेली अनेक वर्ष विस्मरणात ढकललेल्या किंवा निर्मात्यांकडून गहाळ झालेल्या किंवा त्यांची नीट देखभाल न झालेल्या सिनेमांची रीळ घेऊन येतात, त्यावर काम करून त्यांचं डिजिटायझेशन करतात, ह्यासाठी देशाच्याच नाही तर अगदी दक्षिण आशियातील कुठल्याही कोपऱ्यात त्यांना अशी रीळ आहेत असं कळलं तर त्यांची टीम तिकडे पोहचते, ती रीळ ताब्यात घेऊन ती जितकी वाचवता येतील, पुन्हा प्रेक्षकांपर्यंत नेण्याच्या लायकी...

सर !

ग्रॅज्युएशन नंतर पुणे विद्यापीठात मास्टर्ससाठी अर्ज केला तेंव्हा सर्वप्रथम लेखी परीक्षा, मग ग्रुप डिस्कशन, मग मुलाखत असे सगळे सोपस्कार होते. ह्या सोपस्कारांचा एक एक टप्पा पार करत जात असताना मुलाखतीच्या वेळेस समोर मुलाखत घेणारे सगळेच म्हातारे बसले होते. पण त्यात एक पांढरी शुभ्र दाढी असणारा माणूस मात्र, उत्तर ऐकताना खूप काळजीपूर्वक ऐकतोय, मध्येच गालात नाही म्हणता येणार कारण भरघोसदाढी असल्यामुळे दाढीत हसतोय हे जाणवत होतं. पुढे पुणे विद्यापीठात निवड झाल्याचं कळलं मग पुण्याला जायची तयारी सुरु झाली. विद्यापीठात दाखल झालो. आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता अचानक त्या दाढीवाल्या बाबाने वर्गात प्रवेश केला. त्यांची वर्गातील एंट्री काहीशी वादळीच होती. ते धाडकन वर्गात आले, स्वतःच्या हातातील बॅग खाली ठेवली. फळ्यावर लिहायला सुरुवात केली. त्याचा अर्थ असा काहीसा होता की 'ह्या पुढे जे काही तुम्हाला कळेल/कानावर पडेल ते प्रत्येक योग्यच असेल असं नाही त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर प्रश्न विचारा.' हे काहीतरी नवीनच होतं, प्रश्न विचारा? प्रश्न विचारू नका हेच तर ऐकत आलोय आपण. त्यांनी दुसरी गोष्ट ...

चष्मेबहाद्दूर

Image
  मी पाचवीत असताना शाळेत जरा मागच्या बाकांवर बसायचो. एकूणच शाळेत किंवा कॉलेजमध्ये किंवा कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात मागे बसण्याची मजा औरच. मुळात पुढे बसणं म्हणजे शिक्षकांपासून ते वक्त्यांपर्यंत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय असं वाटतं, त्यापेक्षा आपली तंद्री लावायची असेल तर मागचे बाक बरे.   पण अचानक फळ्यावरचं दिसेनासं झालं, मग जरा डोळे ताणून बघ, शेजारच्याच्या वहीत डोकं घाल, असे प्रकार केले, पण एका शिक्षकाच्या लक्षात आलं, त्यांनी डोळे तपासून यायला सांगितलं. पण तोपर्यंत पुढच्या बाकावर बसायला सांगितलं.    घरी येऊन ही बातमी सांगितली. तात्काळ डोळ्याच्या डॉक्टरकडे नेलं गेलं. मला तोपर्यंत काय पुढे वाढून ठेवलं आहे ह्याचा अंदाज आला होता. डोळ्यावर तो एक लोखंडी जड चष्मा ठेवला आणि वाचायला सुरु करायला सांगितलं. चष्मा लागू नये म्हणून मी फार एकाग्रतेने अक्षरं वाचायला सुरु केली. पण जसं जसं ते पुढे जायला लागले आणि अक्षरांचा आकार छोटा व्हायला लागला, म्हणलं मेलो आता ! करा मान्य, लागला चष्मा. मग शांतपणे ते जे काही काचा बदलत जादूचे प्रयोग करत होते, ते सहन करत, चष्मा लागला आहे ही बातमी ऐक...

सिनेमाचं मंदिर

Image
  अगदीच महिना-वर्ष सांगायचं झालं तर ऑगस्ट २००२. पुण्यात मी मास्टर्सला शिकायला होतो, तेंव्हाची गोष्ट. आम्हाला सिनेमा हा विषय शिकवायला एक प्रोफेसर होते. सिनेमाच काय पण जवळजवळ सगळ्या कलाप्रकारांचा गाढा अभ्यासक. पण फक्त अभ्यासक नाही तर स्वतःचा अभ्यास शिकवण्याची/उलगडून दाखवण्याची कमालीची क्षमता असलेले हे आमचे प्रोफेसर. तर असंच ऑगस्ट महिन्यातल्या एका रविवारी संध्याकाळी, रिमझिम पाऊस पडत होता. आम्ही ४ मित्र ह्या प्रोफेसरांसोबत 'कमला नेहरू पार्क' येथे गप्पा मारत होतो. तेवढ्यात त्यांनी विचारलं की किती वाजले असतील. आम्ही म्हणलं ६. तर म्हणाले चला मला जावं लागेल, तुमचा काय प्लॅन आहे? काही विशेष नसेल तर चला माझ्यासोबत.   त्यांनी एक पत्ता सांगितला, आमच्यापैकी एका मित्राला तो माहित होता. आमचे प्रोफेसर पुढे गेले आणि आम्ही चालत चालत त्यांनी सांगितलेल्या पत्त्यावर आलो. एक बैठी वास्तू.काहीशी जुनी दिसणारी, बाहेर लोकं रांगेत उभी होती. संस्थेचा बोर्ड पाहिला तर कळलं की ह्याला 'नॅशनल फिल्म आर्काइव्ह' म्हणतात. म्हणजे नक्की काय असेल कळलं नाही. पण गर्दीच्या सोबत आत गेलो. आमच्या सरांनी खूण केली की ...

आटपाट नगराची कथा

Image
  एक आटपाट नगर असतं ! आटपाट नगरच का ? कारण काहीच नाही. पण सगळ्या जुन्या गोष्टींमध्ये ऐकलेलं असतं, म्हणून आटपाट नगर. इथे जे घडलंय, ते फक्त आटपाट नगरातच घडतं असं नाही तर ते सर्वत्र घडत असतं. फक्त तऱ्हा वेगळ्या.   तर संपन्न, कीर्तिवान असं हे नगर. अनेक थोरमोठे ह्या नगराने घडवलेले असतात, किंवा ती लोकं त्यांच्या त्यांच्या कर्तृत्वाने मोठी झालेली असतात. पण यश नेहमी वाटून घ्यावं म्हणून, इथल्या थोरामोठ्यांनी आपल्या कर्तृत्वात या नगराला पण वाटेकरी बनवून टाकलं. ह्या नगराबद्दल, इथल्या थोरामोठ्यांबद्दल सर्वत्र एक कुतूहल.  इथली माणसं अनेक क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी केलेली, पण त्या उत्तुंगतेकडे घेतलेली झेप ही मात्र अस्तित्वाच्या संघर्षातून आलेली, आणि जे कसब पदरात आलंय त्याच्या जोरावर सर्वस्व झोकून देऊन करायचं ह्यातून घेतलेली झेप. काळ पुढे सरकतो. त्यातील अनेक मान्यवरांचा पंथ निर्माण होतो, तर काही दैवतं बनून जातात. हे दैवतीकरण ह्या थोरामोठ्यांच्या नकळत घडत जातं पण ते थांबवण्याची शक्ती उतारवयात कमी झाली होती आणि त्यांना पण ते काहीसं आवडू लागलं होतं. अर्थात ह्या दैवतांवर पहिला अधिकार कोणाचा...

अतिरेक श्रम प्रतिष्ठेचा

Image
  काही वर्षांपूर्वी दिल्लीतल्या हिमाचल भवन मध्ये अनेकदा रहायचो.  एकदा इथला मुक्काम जरा दीर्घ होता. सुट्टीच्या दिवस होता. ज्यांच्यासोबत काम करत होतो त्यांचा फोन आला की माझा एक मित्र तुला भेटायला येईल. भेटून घे त्याला.   दुपारी १२ वाजता त्या मित्राचा फोन आला की मी आलोय, खाली ये. मी म्हणलं तुम्ही वर या इथे एक चहा पिऊ. तर त्याने स्पष्ट नकार दिला.  मी खाली गेलो. चाळीशीच्या आसपासचा एक मुलगा समोर आला.  धारदार नाक, त्याहून धारदार नजर, अंगकाठी शिडशिडीत. त्याने स्वतःची ओळख करून दिली. आणि म्हणाला की हे सरकारी गेस्ट हाऊस आहे इथे कसली कसली लोकं येत असतील, राजकारणात बरबटलेली, असल्या जागेत जाणं मी टाळतो म्हणून मी वर नाही आलो.  ह्या मुद्द्यावर तो १० मिनिटं बोलला.  मग मला विचारलं, खाना तो खाओगे ना मित्र? मी म्हणलं हो. तर समोर एका ढाब्यासारख्या दिसणाऱ्या खोपटात घेऊन गेला. म्हणाला मी अशा जागा शक्यतो निवडतो कारण इथे येणारी माणसं ही कष्ट करून अन्न कमवतात, आणि त्याहून महत्वाचं अन्न वाढणारा चांगल्या मनाचा असतो. हे असले निष्कर्ष त्याने कुठून काढले माहित नाही. पण एक कळलं होतं ...
Image
 कट्टा  काही दशकांपूर्वीचा एका कात टाकत असलेल्या छोट्या शहरातील एक कट्टा. कट्टा म्हणजे काय तर एका दुकानाच्या पायऱ्या. हे दुकान त्यावेळी किंचितसं आडोश्याला होतं. तो काळ असा होता की गाव दूरदर्शनच्या बातम्यांच्या आधी म्हणजे ७ च्या आत घरात असायचं. त्यामुळे ह्या दुकानाचा मालक संध्याकाळी सहाला बंद करायचा. गावात मुळात सरकारी दिवे कमीच आणि त्यात पुन्हा ह्या दुकानाच्या भागात एकच दिवा जो कधी लागायचा कधी नाही, त्यात पुन्हा वाहनांची वर्दळ तुरळक त्यामुळे कमालीची शांतता आणि त्याहून महत्वाचं म्हणजे काहीसं गूढ वाटणारं वातावरण. त्या काळात बहुसंख्य कट्टे असेच जरा आडोश्याला असायचे. राजकीय चर्चांपासून ते चावट गप्पा मारण्यापर्यंत आणि कुठूनतरी पैदा केलेली सिगरेट चार जणांच्यात ओढण्यासाठी सगळ्यात सेफ जागा. थोडक्यात कोणाचं सहज लक्ष जाणार नाही, माफक आणि कोणाला त्रास होणार नाही अशी साहसं करण्यासाठी आणि टारगटपणा करण्यासाठीची ती उत्तम जागा.  कॉलेजमधून नुकतीच बाहेर पडलेली आणि पुढे काय ह्या विवंचनेत असलेली मुलं ह्या कट्ट्यावर जमू लागली. तिथल्या शांततेमुळे आणि आपल्याकडे कोणी बघत नाहीये ह्यामुळे ही जागा ...