चष्मेबहाद्दूर

मी पाचवीत असताना शाळेत जरा मागच्या बाकांवर बसायचो. एकूणच शाळेत किंवा कॉलेजमध्ये किंवा कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात मागे बसण्याची मजा औरच. मुळात पुढे बसणं म्हणजे शिक्षकांपासून ते वक्त्यांपर्यंत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय असं वाटतं, त्यापेक्षा आपली तंद्री लावायची असेल तर मागचे बाक बरे. पण अचानक फळ्यावरचं दिसेनासं झालं, मग जरा डोळे ताणून बघ, शेजारच्याच्या वहीत डोकं घाल, असे प्रकार केले, पण एका शिक्षकाच्या लक्षात आलं, त्यांनी डोळे तपासून यायला सांगितलं. पण तोपर्यंत पुढच्या बाकावर बसायला सांगितलं. घरी येऊन ही बातमी सांगितली. तात्काळ डोळ्याच्या डॉक्टरकडे नेलं गेलं. मला तोपर्यंत काय पुढे वाढून ठेवलं आहे ह्याचा अंदाज आला होता. डोळ्यावर तो एक लोखंडी जड चष्मा ठेवला आणि वाचायला सुरु करायला सांगितलं. चष्मा लागू नये म्हणून मी फार एकाग्रतेने अक्षरं वाचायला सुरु केली. पण जसं जसं ते पुढे जायला लागले आणि अक्षरांचा आकार छोटा व्हायला लागला, म्हणलं मेलो आता ! करा मान्य, लागला चष्मा. मग शांतपणे ते जे काही काचा बदलत जादूचे प्रयोग करत होते, ते सहन करत, चष्मा लागला आहे ही बातमी ऐक...